निरर्थक शब्दांची दाटी, का होते
कुणास ठाऊक काहीच कळत नाही
सजवलेली शय्या, ताटी का होते
कुणास ठाऊक काहीच कळत नाही ॥ १ ॥
मनातले उमटत नाही
कुणास ठाऊक का म्हणून
सुटा पसारा जुळतच नाही
कुणास ठाऊक का म्हणून ॥२ ॥
वेड्यागत हव्यास का हा
सामान्यतेहून दूर जाण्याचा
धडपडूनही जेव्हा फसतो
प्रयत्न हिमालयाला छेदण्याचा ॥ ३ ॥
कोरडे अश्रू, ओले शब्द
का एकमेकात मिसळत नाहीत
एकमेकांत गुंतलेली जाळी
भावनांची सुटत नाहीत ॥ ४ ॥
जनावराकडून जनावराकडे
मार्ग वाटोळा चक्राचा
कुणामागे कुणी धावावे
प्रश्न आहे का सुटण्याचा ॥ ५
कुणाचे मरण का असावे
लक्ष्य एखाद्या आयुष्याचे
एकमेका छेदण्याचे
ध्येय का हे जीवनाचे ॥ ६ ॥
माणुसकीला माणसानेच
का लाजावे कळत नाही
प्रयत्नांतीही औषधाला
‘माणूस’ तेव्हा मिळत नाही ॥ ७ ॥
अंधारात विरलेला असतो
अर्थ माणूस या शब्दाचा
शोधूनही सापडत नसतो
मार्ग माझ्या जीवनाचा ॥ ८ ॥
अगतिक होतो दीनवाणा मी
माझ्यासोबत माझी विफलता
सरपटत येते हळू अचानक
ग्रासून टाके अपूर्णता ॥ ९ ॥
— यतीन सामंत
Leave a Reply