आज तू अगदी पहाटेच्या सूर्यकिरणांसोबत आलासच .तिलाही तूझ्या येण्याची चातका सारखी ओढ असतेच अरे…….आणी हे लिखीतच जणू युगानूयुगे चालत आलेले ……पण तरीही हे गुपीत शहाण्यापेक्षा वेड़्यांनाच जास्त उमगलेलं.
तूझ्या अशा अवेळी येण्याने सगळ्यांचे आणी सोबत तिचेही नूकसान होणार असतेच. पण तू मनमौजी,वेड़ा,लहरी, ना तूला जगाची पर्वा, ना लोकांच्या दुषणांची पर्वा .
तूला फक्त एकच ध्यास तिला भेटायचा .न सांगता अचानक यायचं आणी तिला मनसोक्त अंतर्बाह्य भिजवायचं . आणी न सांगताच निघूनही जायचं .
किती हा लहरीपणा ….शहाणी लोकं याची वेड़ात गणना करतात. आणी तूला अचानक आलेला म्हणून वळीव वैगरे म्हणतात. पण तिला आणी मलाही तू मात्र कायमच मनातला वाटत आलास.
खरंतर तिच्याकडे तिचं असं स्वतःच आकाश असल्यावरही ती तूझीच आतूरतेने वाट पहाते. कारण तिचं मन आणी त्यातील जखमा तूझ्याच फुंकरीने ब-या होतात. हे तूलाच कळतं फक्त……….. कारण तू आहेस तिच्याच मनातला विश्रब्ध
तू
वळीवाचा पाऊस
भावना झंकारीत आलास
रेशमी पिसारा फुलवत गेलास
तू
गगनी कृष्णमेघ
शामरंगी रंगातून आलास
आयुष्य चिंब भिजवूनी गेलास
तू
सूर ओळखीचा
गझलेच्या गळी आलास
ह्रदयीचे स्पंदन होऊन गेलास
तू
निरागस चंद्रमा
धुंद आसमंती आलास
युगायुगाचे बंध जोड़ूनी गेलास
— © वर्षा पतके थोटे
25-01-2019