नवीन लेखन...

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स – भाग – ३

मला जर कोणी विचारले की “स्वर्गीय सौंदर्य म्हणजे काय?” एका क्षणाचाही विलंब न लावता मी हिमालयाचे नाव घेईन. या नगाधिराजाचे रूप दिवसाच्या प्रत्येक प्रहरात, प्रत्येक ऋतूत आगळे वेगळे असते. विशेषत: ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात त्याचे दिसणारे रूप अतिशय मोहक असते. निळ्याभोर आकाशात रेंगाळणाऱ्या मेघमाला, काही मेघ पर्वत शिखरांभोवती रुंजी घालत असतात. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर आकाशाचा वेध घेणारी हिमशिखरे, सर्वत्र पसरलेली हिरवाई, जमिनीवर उठलेला रंगीबेरंगी फुलांचा कशिदा, पर्वतावर उठलेल्या प्रपाताच्या शुभ्र रेषा! हे सौंदर्य अनुभवायचे असते. त्याचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे.

हा काळ फुलांचा-फळांचा बहराचा काळ! दरी-खोरी फुलांनी बहरून . जातात. कुठे कमी तर कुठे जास्त. गढवाल हिमालयातील असेच एक स्थळ, ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’. आज सर्व जगातील निसर्गप्रेमींना, पर्यावरणप्रेमींना या स्थानाचे खूप आकर्षण वाटते.

अपघाताने, हवे तर योगायोगाने म्हणा या स्थानाचे सौंदर्य नजरेस पडले व जगाच्या नकाशावर एका सौंदर्यस्थळाची नोंद झाली.

ही १९३१ सालातील घटना आहे. फ्रँक स्मिथ नावाचा ब्रिटिश गिर्यारोहक व त्याचे सहकारी बद्रीनाथ परिसरातील ‘कामेट’ हे २५,४४७ फूट उंचीचे शिखर सर करण्याच्या प्रयत्नात होते. सर्व परिसर उंच पर्वतशिखरांचा. धुक्याने वेढलेला. घनदाट जंगल, अवघड वाटा. परत येत असताना ते वाट चुकले व धुक्याने दाटलेल्या एका दरीत आले. स्मिथच्या तुकडीत आर.एन. होल्डस्वर्थ नावाचा वनस्पती जाणकार होता. सहज त्याचे लक्ष जमिनीकडे गेले. तो ओरडला, ‘ते पहा.’ सर्वांचे लक्ष जमिनीकडे गेले. खडकावर, जमिनीवर निळ्या रंगाचे अनेक ठिपके दिसत होते. मंद निळ्या प्रकाशाच्या दिव्यासारखे त्यांचे रूप होते. जणू जमिनीवर कुणीतरी निळ्या रंगाचे, मंद प्रकाशाचे दिवेच लावले आहेत. ती प्रिमुलाची निळी फुले होती. धुके निवळत होते. आता पाहावे तिकडे फुलेच फुले दिसत होती. स्मिथ या सुरंगी, सुपुष्पी, सुदर्शन फुलांनी वेडावला व तिथेच त्याने आपला मुक्काम ठोकला.

पुढे इंग्लंडला गेल्यावर त्याने ‘द टाइम्स’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या दैनिकात, ‘वर्ल्डस् रिचेस्ट ट्रेझरी ऑफ फ्लॉवर्स’ या नावाने लेख लिहिले. आपल्या लेखात तो लिहितो, ‘We were wading knee deep through an ocean of flowers, ranging in colours from sky-blue of the poppies to the deep wine-red of the potentillas. To us Bhyunder valley will always remain the “Vally of flowers.” It is a place of escape for those wearied by modern civilisation…’

१९३७ साली फुलांच्या प्रेमाने फ्रँक स्मिथ परत भारतात आला व फुलांच्या स्वर्गीय महासागरात स्वत:ला हरवून गेला. जवळजवळ ३ महिने त्याने व्हॅलीत मुक्काम ठेवला. व्हॅलीच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्याने फुलांचा अभ्यास केला. या भेटीवर आधारित त्याने, “Valley of flowers” हे सचित्र पुस्तक लिहिले. या पुस्तकाला खूप प्रसिद्धी मिळाली. जगाला एका अनमोल ठेव्याची ओळख झाली. आपल्या या भेटीत त्याने एडिंबरो येथील बागेसाठी खूप पुष्पबीजे गोळा केली.

पुढे जुलै १९३९ साली लंडनची वनस्पतीतज्ज्ञ जॉन मागरिट लेगी, लंडनच्या क्यू गार्डनसाठी हिमालयातील दुर्मीळ बीजे व कंद गोळा करण्यासाठी येथे आली. दुर्मिळ फुलांचा शोध घेत ती कडेकपारीत फिरत होती. ४ जुलै रोजी ती बारा हजार फूट उंचीवर पोहोचली. कोब्रालिलीचा कंद काढत असताना तिचा पाय घसरला व ती १०० फूट खाली कोसळली. एका खडकावर तिचे डोके आपटले व ती जागीच गतप्राण झाली. तिच्या सहकाऱ्यांनी तिचा देह बेसकॅम्पवर आणला व त्यावर व्हॅलीतच अंत्यसंस्कार केले. त्यानंतर एक वर्षाने तिची बहीण मेरी, तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी व्हॅलीत आली. तिने लेगीच्या थडग्यावर फरशी बसवली. फरशीवर लिहिले होते, “I will lift-up mine eyes unto the hills from whence cometh my help.” ‘ज्या शिखराकडे मी नजर टाकते तेथूनच मला शक्ती मिळाली आहे.’ पण काही उपद्रवी लोकांनी ही फरशी तोडून टाकली. आता त्या ठिकाणी एक लहान फरशी आहे. तसेच “For the love” असे लिहिलेला पांढरा ध्वज आहे.

स्मिथमुळे जगाला या व्हॅलीची ओळख झाली. व्हॅलीला प्रसिद्धी मिळाली. पण रामायण-महाभारतातसुद्धा या व्हॅलीचे संदर्भ आले आहेत. राम-रावण युद्धात एका अमोघ शक्तीमुळे लक्ष्मण मूर्च्छित झाला. लक्ष्मणावर इलाज करण्यासाठी संजीवनी मुळीची आवश्यकता होती. संजीवनी मुळी नेण्यासाठी हनुमान इथे आला होता, असे सांगितले जाते. तर नदीतून वाहत आलेले एक सुंदर फूल पाहून त्या फुलांनी श्रीकृष्णाच्या मूर्तीची पूजा करण्याची द्रौपदीला इच्छा झाली. तिने भीमाला आपली इच्छा सांगितली व फुले आणण्याची विनंती केली. नदीच्या काठाने शोध घेत भीम एका दरीत आला. दरीत असंख्य फुले फुलली होती. भीम फुले तोडायला वाकला, तोच आवाज आला, “थांब, ज्याने फुले लावली नाहीत, वाढवली नाहीत, त्यांना कधी पाणी घातले नाही, त्याला फुले तोडायचा काय अधिकार?” भीमाने समोर पाहिले, तिथे चित्ररथ गंधर्व उभा होता. भीमाने त्याला आपली ओळख दिली. आपण युधिष्ठिराचे बंधू असून द्रौपदीला ही फुले कृष्णाच्या पूजेसाठी हवी आहेत, असे सांगिततले. हे ऐकून चित्ररथ गंधर्वाला खूप आनंद झाला. त्याने स्वत: फुले तोडून भीमाला दिली. ही फुले म्हणजे ‘ब्रह्मकमळे.’

अशी ही ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ किंवा पुष्पघाटी! देखण्या हिमालयातील देखणे स्थळ. या पुष्पघाटीतून ‘पुष्पगंगा’ नदी वाहते. व्हॅलीला भेट देण्याचा सुयोग्य काळ म्हणजे १५ जुलै ते सप्टेंबरचा पहिला आठवडा! एप्रिलपासून बर्फ वितळू लागते. मेपर्यंत खूप बर्फ वितळतो. बर्फाची चादर दूर होते. जून महिन्यातील हलकासा पाऊस व उबदार वातावरण! सर्व परिसर हिरवी शाल पांघरतो तर जुलै-ऑगस्टमध्ये या शालीवर फुलांचा कशिदा खुलतो. शुभ्रधवल प्रपातांची किनार या शेल्यावर शोभिवंत दिसते. सप्टेंबर महिन्यात फुले मावळतात. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हवामान बदलते. डिसेंबरपासून पुष्पबिजे हिमाची चादर अंगावर पांघरून धरतीमातेच्या कुशीत विश्रांती घेतात.

घांगरियाकडून १ कि.मी. वाट चालल्यावर लक्ष्मणगंगा नदी ओलांडायची व डावीकडे वळायचे तर उजवीकडची वाट हेमकुंडकडे जाते. शीख भाविक उजवीकडे तर निसर्गाचे भक्त डावीकडे वळतात. व्हॅलीत जाण्यासाठी नागरिकांना प्रवेश फी द्यावी लागते. व्हॅलीत मुक्काम करता येत नाही.

घांगरिया ते व्हॅली हे अंतर ४ कि.मी. आहे. परत थोडा चढ-उताराचा रस्ता. रस्त्याच्या सभोवती सर्व फुले उमललेली! नाजूक फुले माना वाकवून आपले स्वागत करतात. वाटेवर जंगली फुलांचा परिमळ दरवळत असतो. पुष्पगंगेचा पूल ओलांडल्यावर परत चढ सुरू होतो. आता जास्त संख्येने फुले सामोरी यायला लागतात. एका खिंडीतून व्हॅलीत प्रवेश केला की एक अद्भुत विश्व आपल्यासमोर उभे ठाकते. लहान, अरूंद रस्ता! रस्त्याच्या आजूबाजूला, परिसरातं सर्व फुलेच फुले! निरनिराळ्या रंगाची, आकाराची! फुलांवरील दंवबिंदू चमकत असतात. मंद वाऱ्याच्या झुळकीने फुले डोलत असतात. फुलपाखरे नाचत असतात. मधूनच वाऱ्याची एखादी झुळूक वातावरणात सुगंध पसरवत असते. मनात विचार येतो, ‘याचसाठी केला होता अट्टाहास.’ हीच ‘व्हॅली १३०/ हिमशिखरांच्या सहवासात ऑफ फ्लॉवर्स किंवा पुष्पघाटी.’ शेजारून पुष्पगंगा नदी व्हॅलीचे सौंदर्य सर्वांना सांगण्यासाठी पळत असते. खडकावरून उड्या मारत असते, तर कधी कड्यावरून स्वत:ला झोकून देत असते.

जवळजवळ १० कि.मी. लांब व २ कि.मी. रूंद असलेली ही व्हॅली व आजूबाजूचा परिसर असे ८७.५ चौ.कि.मी. क्षेत्रफळ १९८२ साली राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. ३२५० मीटर्स उंचीपासून ६७५० मीटर्स उंचीपर्यंत हा भूभाग पसरला आहे. रातबन (उंची ६१२६ मीटर्स), नर पर्वत (उंची ५२४७ मीटर्स), निलगिरी पर्वत (उंची ६४७९ मीटर्स), गौरी पर्वत (उंची ६५९० मीटर्स), खिलिया घाटी (उंची ५०३४ मीटर्स) सबशिरीन इ. उंच गगनचुंबी हिमाच्छादित पर्वताच्या गर्दीत तर रातबन पर्वत सिंहासनाधिश्वर चक्रवर्ती राजासारखा शोभिवंत दिसतो, तर इतर पर्वत दरबारी मानकऱ्यासारखे रूबाबात बसलेले असतात. स्वर्गीय सौंदर्याने नटलेली विविधफुलांचे अलंकार ल्यालेली गळ्यात पुष्पगंगेची रत्नजडीत माला घातलेली ही व्हॅली एका नर्तकीच्या रूपात सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकत असते. होल्डस्वर्थ म्हणतो, ‘परदुःख दूर करून परोपकारी वृत्तीने जगणारे ऋषितुल्य जीव हिमालयातील उंच पर्वतशिखरावर वास्तव्य करतात. ते फुलांवर उत्कट प्रेम करतात. जगाला शांती, प्रेम, सुंदरता व परोपकाराचा संदेश देणारे हे जीव या व्हॅलीचे रक्षण करतात.

मे-जूनपासून फुलांचा हंगाम व्हॅलीत सुरू होतो. सर्वप्रथम बहरतो ‘होडोडेंड्रॉन’. याला गढवालीत ‘बुरांश’ म्हणतात. हे नेपाळचे राष्ट्रीय फूल आहे. या लाल रंगाच्या फुलांचा वापर धार्मिक कार्यात, औषधात करतात. त्यानंतर व्हॅलीत फुलते ‘फ्युली’ हे सुंदर फूल! हे फूल म्हणजे व्हॅलीत वसंत ऋतूचे आगमन सांगणारे दूत आहे. म्हणून याला वसंतदूती म्हणतात. लाल जंगली गुलाब, जांभळ्या रंगाची आयरिस, पिवळी लिली इ. फुले जूनपासून फुलू लागतात. पण खरा बहर सुरू होतो तो जुलैच्या २-३ आठवड्यापासून! सर्व व्हॅली फुलांनी मढून जाते. पहावे तिकडे फुलेच फुले! निरनिराळ्या रंगाच्या पॉपीज विशेष करून ब्ल्यू पॉपीज तर फारच सुंदर दिसतात. एकाच रंगाच्या निरनिराळ्या छटा! तसेच निळी लिंडीफोलिया, हिमालयीन यलो पॉपी, गर्द पिवळी मार्श मेरी गोल्ड, लाल चेरीज, मार्श आर्किडस, अरिग्रॉन, पोन्टेटीला, जेरूसलेम शेज, एलिनियचम, लॉग लिव्हड् मोरीना, अपिलोनियम, लॅटिवोनियम, जांभळ्या रंगाचे अॅस्टर, पिवळ्या रंगाची शितीशीयो, गडद गुलाबी रंगाची गोल्डन लीली, सदाफुलीसारखे अपिलोनियम मॅगझम, जांभळी जिरेनियम, ऑर्किडस् इ. निरनिराळ्या रंगाची, आकाराची, रचनेची फुले पाहायला मिळतात. साधारण या फुलांचे आयुष्य ८-१० दिवस असते. मग ही फुले मावळतात व नवी फुले उगवतात, नवा रंग नवे रूप घेऊन!

अशा या स्वर्गीय फुलांचे दर्शन घेत केलेल्या वाटचालीत वाटेचा अवघडपणा लक्षातच येत नाही. २-३ कि.मी. अशी फुलांतून वाटचाल केल्यावर परत पुष्पगंगा लाकडी पुलावरून ओलांडायची. आजूबाजूच्या पर्वतातून निर्झर उड्या मारत असतात. उंच कड्यावरून झोकून देत असतात. समोरचा रातबन पर्वत हे वैभव अभिमानाने न्याहाळत असतो तर उजव्या बाजूच्या पहाडावरील हिरव्या मखमलीवरील भूर्जपत्र वृक्षाचे जंगल या सौंदर्यवतीचे कौतुक करण्यात मग्न झालेले असते. पुष्पगंगेचा पूल ओलांडल्यावर रस्ता संपतो व पाऊलवाटा सुरू होतात. फुले तर आता आणखी जवळ येतात.

व्हॅलीतील काही वनस्पती अत्यंत औषधी व उपयोगी आहेत तर काही अत्यंत विषारी आहेत. विशेषत: बिसतोली नाल्याजवळ अत्यंत विषारी वनस्पती उगवतात. म्हणूनच कदाचित या नाल्याला बिसतोली नाला म्हणत असावेत. ‘बिस म्हणजे विष’. व्हॅलीत असलेल्या फुलांचे व वनस्पतींचे सर्वेक्षण व बीज गोळा करण्याचे कार्य भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या वतीने सुरू करण्यात आले आहे.

व्हॅलीत खडकावर लाल, पांढऱ्या, हिरव्या रंगाच्या बुरशी पाहायला मिळतात. त्यांचे शरीर तंतुमय असते व मृत प्राण्याच्या किंवा वनस्पतींच्या कुजलेल्या अवशेषांवर या बुरशी वाढतात तर काही खडकावर ‘रॉक अनिमेशन’ची सुंदर पांढरी फुलझाडे वाढतात. ममेरी, मॅपल, रागा फरटी, चीड, देवदार, भूर्जपत्र, कांचुरा अशा अनेक वृक्ष-वल्ली या व्हॅलीत दर्शन देतात. कांचुरा हा तर कॅनडाचा राष्ट्रीय वृक्ष आहे तर ममेरीपासून ‘सुरमा’ बनवतात. वनपाशा, पाषाणभेदी सुगंधबाल, रतनज्योत, अतीष, विषकठार इ. अनेक वनस्पती इथे पाहायला मिळतात. ही व्हॅली म्हणजे औषधी वनस्पतींचे भांडार तर वनस्पतीतज्ज्ञांचा स्वर्ग आहे.

व्हॅलीत कस्तुरीमृग, निरनिराळ्या रंगांची व आकाराची फुलपाखरे, अस्वले, जंगली मेंढ्या, लाल तोंडाची माकडे, हिमचित्ते, डोक्यावर पांढरा ठिपका व तपकिरी शेपटी असलेले ब्राऊन बर्डस, ब्ल्यू रॉक पीजन, अल्पाईन चफ, गरूड, ससाणे इ. पशु-पक्ष्यांचा वावर असतो. छोट्या आकाराचे हिमालयीन व्हिसल हे प्राणी तर जमिनीत बिळे करून राहतात व्हॅलीत जेव्हा बर्फ नसेल तेव्हा ते जमिनीवर येतात. फुलझाडांचे कंद, लहान कीटक इ. हे त्यांचे खाद्य! या काळात ते गवत जमा करतात व जमिनीतील बिळात त्यांचा साठा करून ठेवतात. जमिनीखाली अशी त्यांची असंख्य बिळे असतात. बर्फवृष्टी सुरू होते. सर्व परिसर हिमाच्छादित होतो व मग हे प्राणी भूमिगत होतात. आता जमा केलेले गवत हेच त्यांचे खाद्य! गवतामुळे त्यांची बिळेपण उबदार राहतात. संपूर्ण शीतकाल त्यांचे या बिळात जमिनीखाली वास्तव्य असते. या प्राण्याला स्थानिक लोक नेवला या नावाने ओळखतात. साधारण १-१.५ फूट लांबीचा हा प्राणी मुंगुसासारखा दिसतो तर याची शेपटी जायंट स्क्विरलसारखी झुपकेदार असते.

फ्रँक स्मिथने ७० वर्षांपूर्वी जवळजवळ २५०० प्रकारची फुले पाहिली होती. ५००-५५० प्रकारच्या फुलांचा त्याने सखोल अभ्यास केला होता. इतक्या विविध फुलांचे बीज प्रथम येथे कसे आले? हे वैज्ञानिकांनाही अद्याप न उलगडलेले कोडे आहे. आज मात्र व्हॅलीत २००-२५० प्रकारची फुले पाहायला मिळतात. व्हॅलीत पॉलिगोनम नावाची वनस्पती प्रचंड प्रमाणावर वाढते. ही वनस्पती इतर वनस्पतींच्या वाढीला प्रतिबंध करते. ही वनस्पती शेळ्या-मेंढ्यांचे आवडते खाद्य आहे. पूर्वी मेंढपाळ या भागात मेंढ्या चरण्यासाठी घेऊन येत. त्यामुळे पॉलिगोनमची वाढ मर्यादित असे. तसेच वनस्पतींना खतपण मिळत असे. पण आता मेंढपाळांना व्हॅलीत प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे पॉलिगोनमची वाढ फार मोठ्या प्रमाणावर होत आहे तसेच लोकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे प्रदूषण! कदाचित फुलांची संख्या कमी होण्याची ही कारणे असावीत.

एक धुंदावलेल्या मन:स्थितीत ३-४ कि.मी. अंतरावरील जॉन लेगीची समाधी कधी येते हेच समजत नाही. अशा स्वर्गीय निसर्गात जॉन चिरविश्रांती घेत आहे. खरंच, तिच्या भाग्याचा हेवा वाटतो. क्षणभर डोक्यात विचार येतो, ‘आपल्या नशिबी हे भाग्य लाभेल का?’ नकळत समाधीकडे पाहून हात जोडले जातात.

सभोवती उंच बर्फाच्छादित पर्वतशिखरे, स्फटिक जलाने वाहणारे निर्झर, गर्द वनराई, मधूनच येणारा हलकासा पाऊस, मंद वाऱ्याची झुळूक, आकाशात विहरणाऱ्या, पर्वतशिखरांच्या गळ्याला बिलगून बसलेल्या मेघमाला! तर पाहावे तिकडे रंगीबेरंगी फुले. मनात विचार येतो, या भूतलावरच हा स्वर्ग आहे व हा स्वर्गीय आनंद उपभोगणारी मी जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहे. नकळत मन एका वेगळ्याच विश्वात जाते.

-प्रकाश लेले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..