शेंगदाणे, मोहरी, तीळ, मका, जवस या बियांपासून काढलेली तेलं, आपण आपल्या दैनंदिन जीवनात, पौष्टिक आहार म्हणून वापरतो. या बियां आपण, त्यातील तेल न काढताही खाण्यासाठी वापरतो. आपल्या दैनंदिन जीवनात वापरता येतील असे अनेक अुपयोगी पदार्थ आणि वस्तू या तेलांपासून बनविल्या जात आहेत. सततच्या वापरामुळं या बियांचं खरं स्वरूप आणि त्यांचं दिव्यत्व आपणास जाणवत नाही.
वनस्पतींच्या बियात, सर्व पोषणमूल्यं असलेली तेलं किंवा अन्य पदार्थ का साठविलेले असतात? अंकुराची कोवळी मुळं, आणि कोवळी पानं यांना, जोपर्यत निसर्गातून आपलं अन्न मिळविण्याची क्षमता येत नाही, तोपर्यंत त्या अंकुराचं पोषण व्हावं, यासाठी निसर्गानं केलेली ही तजवीज किंवा योजना आहे. फळांमध्ये बिया तयार होत असतांनाच, झाडासाठीचा हा पोषक आहार तयार होण्याच्या आनुवंशिक आज्ञावल्या असणारंच. हेच त्या बियांत असलेलं दिव्यत्व.
सजीवांच्या बाबतीतही निसर्गानं अशीच योजना केली आहे. जोपर्यंत आअीच्या गर्भाशयात गर्भ वाढत असतो तोपर्यंत त्याचं पोषण, आअीनं घेतलेल्या आहारातूनच, नाळे द्वारे, केलं जातं. पण मूल गर्भाशयाबाहेर आलं की, जरी ते स्वतंत्रपणे श्वास आणि अुश्वास करू शकत असलं तरी अन्न खाअू शकत नाही. त्यासाठी आअीच्या स्तनातील दूधग्रंथी, आअीच्या रक्तापासून, सर्व पोषणमूल्ये असलेलं दूध निर्माण करतात आणि ते कसं प्यायचं याचं ज्ञान बालकाला अुपजत असण्याच्या आनुवंशिक जनुकीय आज्ञवल्याही बालकाच्या मेंदूत आलेल्या असतात. ते बालक, स्तनाला ओठ लावून, तोंडात व्हॅकूम म्हणजे हवेचा कमी दाब निर्माण करतं. त्यामुळे, स्तनातून दूध खेचलं जातं. ते दूध बालकाच्या फुफ्फुसात न जाता सरळ पोटात जाण्यासाठी अेक कार्यक्षम झडप असते तीही कार्यान्वित होते आणि बालक, आअीचं दूध पोटभर पिअू शकतं. हे सर्व नीट समजणं देखील मानवी मेंदूच्या मर्यादेपलिकडचं आहे.
बी रुजली म्हणजे तिच्यात झाडाचा अंकूर निर्माण होतो. शेंड्यापेक्षा देठ जास्त ताकदवान असल्यामुळे, देठ कमानीसारखा वाकलेल्या स्थितीत, बी चं कवच फोडून बाहेर येतो. दुसरी महत्वाची पायरी म्हणजे जमीन फोडून, अंकुराला जमिनीबाहेर यावयाचं असतं. ही पायरी पूर्ण झाली म्हणजे देठ सरळ होतो आणि झाड जमिनीवर वाढू लागतं. जमिनीखाली मूळं वाढू लागतात. ती, जमिनीतून पाणी आणि खनिजद्रव्यं शोषून अन्नाचा साठा करू लागतात. पानं, वातावरणातला कार्बन डाय ऑक्साअीड शोषू लागतात. पानात हरितद्रव्य निर्माण झालं की, सू्र्यप्रकाशात, प्रकाशसंश्लेषण क्रियेमुळे झाडाचं अन्न तयार होअू लागतं.
सजीव जसे पेशींनी बनलेले असतात तसेच वनस्पतीही पेशींनी बनलेल्या असतात. प्रत्येक पेशीत अेक केन्द्रक असतं. या केन्द्रकात, झाडाचं आनुवंशिक तत्व असतं आणि या आनुवंशिक तत्वातच त्या झाडाचं अुत्तरायुष्य कसं असावं याच्या आज्ञावल्या असतात. या आनुवंशिक तत्वातच, सजीवांप्रमाणेच, डीअेनअे, गुणसूत्रं, जनुकं वगैरे असतात. वनस्पतीच्या प्रत्येक प्रजातीचं आनुवंशिक तत्व वैशिष्ठ्यपूर्ण असतं.
— गजानन वामनाचार्य.
Leave a Reply