नवीन लेखन...

वनस्पतींच्या बीजप्रसाराचे रहस्य

बीजप्रसार: प्राणी जसे त्यांच्या अस्तित्वासाठी व वाढीसाठी अधिवास बदलू शकतात, तसे वनस्पतींना अधिवास बदलता येत नाही. आपला प्रसार बीजांद्वारे व्हावा या उद्देशाने वनस्पती उत्क्रांत झालेल्या आहेत. मात्र अंकुरणासाठी व वाढीसाठी अनुकूल परिस्थिती असेल अशा ठिकाणी त्यांच्या बीजांचे आगमन व्हावे लागते.
बीज म्हणजे व्यावहारिक भाषेतील बी. बीज म्हणजे भ्रूण स्वरूपातील वनस्पती असून ती संरक्षक बाह्यकवचाने आच्छादलेली असते. बीजाचे अंकुरण घडून आले की, त्याच जातीची वनस्पती निर्माण होते.

१) आवृतबीजी असलेले फळ : नारळ
२) अनावृतबीज असलेली फळे: सायकस
३) आवृतबीजी वनस्पती सु. २,५०,००० आहेत. या वनस्पतींना फुले येतात. फुलांतील अंडाशयापासून फळे बनतात. फळांच्या आत बीजे असतात. उदा., गवते, झुडपे, वृक्ष, महावृक्ष व वेली. सु. आठशे अनावृतबीजी वनस्पती आहेत. बहुधा अनावृतबीजी वनस्पती शंकू निर्माण करतात. उदा., सायकस, देवदार, पाईन इत्यादी.

पण त्यांतील आकार, रंग, वासाचं वैविध्य असते.. नुसत्या फुलांच्याच नव्हे तर बियांच्यामधलं वैविध्य पाहून तर मती गुंगच होईल. ह्या बियांमध्ये, त्यांच्या पोतांत, रंगांत, आकारांत असतात. जणू कांही माणिकमोतीच. आणि या बियांमधल्या पंखपऱ्यांची विविध रुपं असतात. ह्यांचे रंग पाहून कोणीही हरखून जाईल अशाच आहेत. आकार, आकारमान व संरचना अशा बाबतींत वनस्पतींच्या बियांमध्ये फरक दिसून येतो. जहरी नारळाचे बीज सर्वांत मोठे असून त्याचा व्यास सु. ३० सेंमी. व वजन सु. १८ किग्रॅ. असते. याउलट, ऑर्किडच्या सुमारे आठ लाख बीजांचे वजन जेमतेम २५-२८ ग्रॅ. भरते. प्रत्येक वनस्पतीमध्ये बीजाच्या आकारमानानुसार बीजांची संख्या ठरते. नारळाचा वृक्ष मोठ्या फळामागे एकच बीज निर्माण करतो, तर ऑर्किडसारख्या वनस्पती लहान आकारांची लाखो बीजे निर्माण करतात. मात्र वनस्पतींचा आकार आणि बीजाचा आकार यांच्यात काहीही संबंध नसतो. उदा., रेडवुड या महावृक्षाचे बीज केवळ १•६ मिमी. लांब असते.

भ्रूण: बिया पाण्यात ठेवल्यास त्या फुगतात. त्या सोलून पाहिल्यास बीजावरणाखाली असलेले वनस्पतीच्या भ्रूणाचे भाग दिसतात. भ्रूणाचे बीजपत्र, उपरिबीजपत्र, प्रांकुर (कोंब), अधोबीजपत्र आणि मूलांकुर (मोड) हे भाग असतात. गहू, बाजरी, मका इ.च्या बीजांमध्ये एक बारीक अक्ष म्हणजे भ्रूणाक्ष दिसून येतो. त्याला एकच बीजपत्र असते. एकच बीजपत्र असलेल्या वनस्पतींना ‘एकदलिकित वनस्पती’ म्हणतात. एरंड, वाटाणा, पावटा इत्यादींच्या बीजांमध्ये दोन बीजपत्रे असतात, त्या वनस्पतींना ‘द्विदलिकित वनस्पती’ म्हणतात.
अनावृतबीजी वनस्पती : बहुतेक अनावृतबीजी वनस्पतींच्या बाबतीत प्रजननाचे कार्य त्यांच्यावर वाढणारे शंकू करतात. या वनस्पतींना फुले येत नाहीत. काही वृक्षांवर नर व मादी अशा दोन्ही प्रकारचे शंकू, तर काही वृक्षांवर फक्त नर शंकू किंवा मादी शंकू असतात. प्रत्येक शंकूमध्ये खवल्यासारख्या संरचना असतात. मादी शंकूच्या प्रत्येक खवल्याच्या वरच्या पृष्ठभागावर दोन बीजांडे तयार होतात. नर शंकूच्या खवल्यापासूनही बीजाणू तयार होतात आणि या बीजाणूंपासून परागकण तयार होतात.

बीजप्रसार:
पर्यावरण अनुकूल असताना म्हणजे योग्य तापमान व पुरेशी आर्द्रता असताना देखील काही वेळा बीजे अंकुरत नाहीत, असे दिसून येते. बीजांची ही सुप्तावस्था असते. बीजांच्या सुप्तावस्थेची दोन कार्ये असतात; (१) तयार होणारे रोप जगण्यासाठी पर्यावरणाची इष्‍ट स्थिती असताना अंकुरण घडवून आणणे आणि (२) एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे आपली सर्व संतती एकाच क्षणी नाश होऊ नये यासाठी बियांचे अंकुरण टप्प्याटप्प्याने घडवून आणणे. थोडक्यात बीजांची सुप्तावस्था पर्यावरणावर अवलंबून नसून ती बीजांची अवस्था असते.
बीज प्रसार हेच खरी वनस्पतींचे वंश वृद्धी करण्यासाठी असणारी व्यवस्था आहे. त्यासाठी त्यांना आप आपल्या बीजात वैविद्धे आणून असणाऱ्या परिसराशी जुळवून घ्यावे लागते.
(१) पाण्यामार्फत: नारळ; कमळ इ.
(२) तडकल्याने : धोतरा; फुटाणी, अबोली, इ.
(३) प्राण्यांमार्फत : लांडगा; शेळी, माणूस, वटवाघूळ, खार, पक्षी इ.
(४) वाऱ्या मार्फ़त : गवत, धान्ये, ऑर्किड, व बहुसंख्य वृक्ष
आता आपण वरील प्रत्येकाची उदाहरणासहित बीज प्रसारण कसे होते ते पाहू.

(१) पाण्याद्वारे बीजप्रसारण: नारळ हे पाण्या द्वारे बीज प्रसाराचे उत्तम उदाहरण आहे. नारळाचे वृक्ष हे समुद्रकिनारी असल्यामुळे नारळ हे समुद्रात पडतात त्या ठिकाणापासून दूर वाहून नेले जातात व तेथे जाऊन रुजतात आणी बीज प्रसारण होते. तसेच कमळ, पाण लिली, हायड्रीला या सारख्या पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींची बीजे पाण्याच्या लहरीं व वेगामुळे ते दूर वाहून जाऊन बीज प्रसारण होते.

(२) तडकल्याने: हवामानातील तापमानाच्या फरकामुळे बिया तडकतात. धोतरा, फुटाणी, अबोली इ. बहुतेक वृक्षांच्या लांबसडक शेंगा ह्या हवेतील उष्णतेने वाळतात
व फूटतात. त्यामुळे त्यांचे बीजप्रसारण होते. जसे कि मुरुडशिंग, गुलमोहर, बहावा, नीलमोहोर, पावटा, वाल, मटार इ.

(३) प्राण्यांमार्फत : वाघनखी, लांडगा, आघाडा, गोखरू इ. काही बीजांवर किंवा फळांवर अंकुश किंवा तीक्ष्ण काटे असतात. लांडगा अथवा शेळी, अस्वल यांच्या केसाळ त्वचेमुळे त्यात बिया अडकतात व असे प्राणी दुसऱ्या क्षेत्रात जातात व बीजप्रसार करतात. उदा. विंचू व खाजकुयलीचे बीज.

उंडी (Calophyllum) या वृक्षाचा बीजप्रसार वाटवाघुळांच्या मार्फत होतो. माणसे ज्या वेळी दाट शेतात किंवा दाट गवतात काम करतात त्यावेळी तेथे असलेल्या वनस्पतीच्या बिया त्यांच्या कपड्यावर चिकटतात व बीजप्रसार होतो. खारोटी पावसाळ्यासाठी बियांचा वेगवेगळ्या ठिकाणी साठा करून ठेवते आणी नंतर त्या जागा विसरून जाते. यामुळे त्या बिया पावसाळ्यात रुजतात. मुंग्यादेखील बीजप्रसार करतात. ज्या बियांपासून तेल मिळते अशा बिया मऊ व मांसल असतात. मुंग्या त्यांच्या वारुळात अशा बिया वाहून नेतात, त्यातील पोषक घटक खातात व त्यांना अखाद्य असलेला बीजाचा उरलेला कठीण भाग तसाच ठेवतात. त्यांपासून वनस्पती वाढतात.

(४) पक्ष्यांमार्फत: चिमणी, खंड्या, पोपट इत्यादी पक्षी झाडांची फळे खातात व वहनही करतात. उदा. पेरू, डाळिंब असे करताना ते फळांच्या बिया खातात व काही न खाल्लेल्या बियाना चोची मारून टणक बिया मऊ करतात त्यामुळे बी उगवून यायला मदत होते.

(५) वाऱ्यामार्फत बीजप्रसार: रूई, अर्जुन वृक्षांच्याच्या बिया, काटेसावर, गवत, इ.
काही बीजे दूरवर वाऱ्यावर उडत जातात. अशा बीजांना पंख किंवा केसांचा झुपका असतो. पाईनच्या बीजांना पातळ व पापुद्र्यासारखे पंख असतात. शेवगा, कोयनेल व तामण यांच्या बीजांना पंख असतात. रुई व कापूस यांच्या बीजांच्या एका टोकाला केसांचा झुपका असतो. ऑर्किडच्या बिया धूलिकणांसारख्या हलक्या असल्याने वाऱ्यावर उडून जातात. काही बीजे फळांतच राहतात. अशा फळांना पंख असतात. उदा., साल, मधुमालती इ. ‘केंजळ’ वृक्षाचा ‘बिजोरा’ म्हणजे बियांचा गुच्छ आणि त्याचे लहानलहान पंख एकमेकांलगत असतो. एका मोठय़ा ‘बिजोरा’चा पसारा लालभडक असतो. कालांतरानं काळा पडतो. जमिनीवर पसरून मातीशी एकरुप होतो. ओर्चीड या मनमोहक फुलाच्या बियांचे प्रसारण सुद्धा वाऱ्यामार्फत होते. ‘बी’ हाताशी, नव्हे केसाशी धरून उडणाऱ्या ‘म्हाताऱ्या’ ही आपण कधीतरी पाह्य़ल्या असतीलच. निदान काटेसांवरीच्या नक्कीच. प्रत्येक म्हातारी म्हणजे पांढऱ्या केसांचा मऊ पुंजका असतो, त्याच्या टोकांशी कारळ्यासारखं काळं बी असतं. बाहेर पडताना या म्हाताऱ्याचे केस फुलून उलटे होतात आणि पांढऱ्या पॅराशूटसारख्या त्या धरतीवर विसावतात. निसर्गातील वैविध्य, रचनाचातुर्य, रंगाची योजना, हे झाडांत, फुलांत दिसते. तसे ते ‘बी’ मध्येही दिसते. पुनर्निर्मिती, वाढ, प्रसार, म्हणजे उत्पत्ति, स्थिति, विलय यांतून पुन्हा नवनिर्मिती अशा निसर्ग चक्रांतून निसर्ग वंशसातत्य टिकवत असते.

बीजप्रसारण आणी पर्यावरण
आपण पावसाळ्यात बरेच वेळा बघतो की एखाद्या वृक्षाखाली बऱ्याच बिया पडलेल्या असतात. त्यांचे अंकुरही उगवतात पण त्याचे वृक्षात रूपांतर होत नाही. कारण तेथे अन्न मिळवण्याची कठीण स्पर्धा असते. त्यामुळे त्या बिया आपोआप मारून जातात. वनस्पतींचे बीज प्रसारण हे पर्यावरण रक्षणाचे काम करते बीज दूरवर वाहून नेल्यामुळे ते नवीन परिसरात उगवते. यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होते. व हाच बीजप्रसारणाचा उद्देश असतो.

संदर्भ :
Dutta, A. C. A Class-Book of Botany, Calcatta, 1959. ISBN: 9780195637489

मराठी विकिपीडिया परांडेकर, शं. आ.
“Seed Dispersal” from William James Beal Originally published: 1898. गूगल बुक्स
Seed Dispersal Theory and Its Application in a Changing World. R J Green. 2007
गूगल . वरील बरेच लेख.
सर्व फोटो गूगल वरून साभार

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 79 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

4 Comments on वनस्पतींच्या बीजप्रसाराचे रहस्य

  1. जहरी नारळाचे बी एक फुट व १८ कि.आहे, वाचुन आश्चर्य वाटले. फोटो दिला असता, तर कल्पना आली असती. असो, खूपच वाचनीय लेख आहे. डॉ.कुळकर्णी ह्यांचे, मनःपूर्वक धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..