भावगीताची राणी असा वंदना विटणकर यांचा लौकिक होता. मुंबईतील बालनाट्यनिर्मिती करणाऱ्या ’वंदना थिएटर्स’च्या त्या संचालिका होत्या. त्यांनी बालरंगभूमीसाठी लिहिलेली रॉबिनहूड, टिमटिम टिंबू बमबम बगडम, बजरबट्टू इत्यादी बालनाट्ये गाजली. त्यांच्या रॉबिनहूड या नाटकातून शिवाजी साटम, विलास गुर्जर, मेधा जांबोटकर, विजय गोखले, विनय येडेकर अशा अनेक कलाकारांनी रंगभूमीवर पर्दापण केले.
वंदना विटणकर यांनी प्रेमगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते अशी ७०० हून अधिक गाणी व सुमारे १५०० कविता लिहिल्या आहेत. महंमद रफी यांनी त्यांच्या भावगीतांचा केलेला अल्बम प्रचंड लोकप्रिय झाला. “हा रुसवा सोड सखे’, “हा छंद जिवाला लावी पिसे’, “हे मन आज’ यासह वंदनाताईंची अनेक गाणी रफी यांनी गायली. कृष्णा कल्ले यांनी गायिलेले “परी कथेतील राजकुमारा’, “नाते जुळले मनाचे’ (सुधीर फडके) ही सतत आठवणीत राहणारी गाणी त्यांचीच. “अगं पोरी संबाळ दर्याला’, “ऐ आई मला पावसात जावू दे’,”कुहू कुहू येई साद’, “चित्र जयाचे मनी रेखिले’, “आम्ही दोघे राजा राणी’, “पीर पीर पावसाची’, “उजळू स्मृती कशाला’, “स्वप्नामध्ये सत्य गवसले’, “नको आरती नको पुष्पमाला’, “नाते जुळले मनाचे’, अशी सुरेल शब्दरचना करणाऱ्या वंदनाताईंच्या गीतांना सुधीर फडके, श्रीकांत ठाकरे, श्रीनिवास खळे, अरुण पौडवाल, अनिल मोहिले यांच्यासह आघाडीच्या संगीतकारांनी संगीतसाज दिला होता.
हेमंत कुमार, आशा भोसले, सुधीर फडके, प्रभा अत्रे, शोभा गुर्टू, सुलोचना चव्हाण, सुरेश वाडकर, जयवंत कुलकर्णी यांसह ख्यातनाम गायकांनी त्यांची भावगीते, भक्तीगीते गायिली आणि ती रसिकांत लोकप्रिय ठरली. मा.वंदना विटणकर यांचा पहिला विवाह चित्रकार चंद्रकांत विटणकर यांच्याशी झाला होता. चंद्रकांत विटणकरांच्या निधनानंतर १९८६ साली त्यांनी किशोर पनवेलकर यांच्याशी पुनर्विवाह केला होता. वंदना विटणकर यांचे ३१ डिसेंबर २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
वंदना विटणकर यांची लोकप्रिय गीते
खेळ कुणाला दैवाचा कळला
नाते जुळले मनाशी
मी प्रेम नगरचा राजा
परिकथेतील राजकुमारा
राणी तुझ्या नजरेने नजरबंदी केली गं
आज तुजसाठी या पावलांना
अधिर याद तुझी जाळीतसे रे दिलवरा
हा रुसवा सोड सखे
हे मना आज कोणी
अगं पोरी संबाल दर्याला
तुझे सर्वरंगी रूप
शोधिसी मानवा राऊळी मंदिरी
खेळ तुझा न्यारा
वंदना विटणकर यांची गाणी.
https://www.youtube.com/playlist…