कोण म्हणतं वनवास दःखाचा होता?
तिथे तर राम फक्त माझा होता।
ती पर्णशाला उभारलेली त्याच्या समर्थ बाहूंनी
मीच तर होते – तिथली अनाभिषिक्त महाराणी
तिला प्रीतीच्या सुवास होता.. कष्टाचा सुगंध होता
कोण म्हणतं वनवास दुःखाचा होता?
कधी तो जायचा रानात दूर..
तेव्हा उरायचे मी नि माझं घर
मला एकांत सुसह्य व्हावा म्हणून
लता हसायच्या सुरेख फुलांच्या पाकळ्यातून
नि एखादा उतरायचा अंगणात दिगंचर
साद घालायचा मला हलकेच खुणावून
तिथला एकांत इथल्या परक्या गर्दीहून
फार वेगळा होता!
कोण म्हणतं वनवास दु:खाचा होता?
प्रत्येक दगडाशी पाऊल अडखळलं
राजधानीत परतताना
माझे मृत्तिकाकुंभ… तीन दगडांची चूल..
माझा संसार सोडताना
डोळ्यात अश्रू दडला होता
कोण म्हणतं वनवास दुःखाचा होता?
राजधानीत कृत्रिम कुंज नि उपवनं…
या नृत्यशाला – चित्रशाला मनोरंजनासाठी
यातलं काहीच नाही माझ्यासाठी
माझा रामसुध्दा
तो इथे फक्त एक सम्राट
निमी… ‘महाराणी’ ..फक्त जनकल्याणासाठी
मखमली पायघड्यांवर अदबीनं चालताना
मी आठवते – ते मुक्त विहरण
फुलातून… काट्यातून
त्यांचा हात तेव्हा माझ्या हातात होता।
कोण म्हणतं वनवास दुःखाचा होता?
तिथेच फक्त माझ्या स्वप्नांचा संसार होता!
–सौ. राजलक्ष्मी देशपांडे
Leave a Reply