ही मजेशीर गोष्ट WhatsApp मधून मिळाली. मजा वाटली. तुम्हीसुद्धा मजा घ्या.
पुण्यातल्या मुलगा अ्स्सल विदर्भातल्या मुलीच्या प्रेमात पडला, आणि त्यांनी लग्न करायचे ठरवले.
मुलाच्या घरचे ह्या बातमीने हैराण झाले, “अरे पण तू असे कसे करू शकतोस?”
मुलाने पुन्हा आपला निर्णय जाहीर केला. “लग्न करेन तर मालू शी नाहीतर संन्याशाशी” !
त्याचे बाबा जोरात ओरडले “अरे तू सन्याशाशी पण लग्न करायला तयार आहेस , मग मालूशीच लग्न कराचे का म्हणतोस ?”
मुलगा म्हणजे, बाळू वैतागून म्हणाला “नाही हो बाबा ! संन्यासी म्हणजे ते दाढी मिशा वाढवून फिरतात तसे..”
मुलाच्या आईने माघार घेत शेवटी लग्नाला परवानगी दिली…
लग्न थाटात पार पडले. नवीन सून बाई सासरी निघाल्या. तिच्या आईने कान मंत्र दिला,” बायवो लग्न तं तू तुह्या मर्जीन केलं, पन आपला वऱ्हाडी बाना राखून ठेव गड्या. नायतर होऊन जाशीन पुनेवाली.”
पोरीने आईला मिठी मारली आणि सांगितले “मी मरून जाईन पण वऱ्हाडीच राहीन तू नको काळजी करू.”
आईने प्रेमाने निरोप दिला,मालू सासरी आली.
“नवीन सूनबाई !”.. सासूबाई म्हणाल्या, “आता मी मोकळी झाले गं बाई… मोकळी झाले?”
मालू ने कान टवकारले, मनातच म्हणाली.. “ह्या बाईच्या मनात का का लपून हाय ते पयले तपासा लागन मंग आपन आपले इचार सांगू तिले.. नाहीतर तूहं काही खरं नाही माले..तुले आईचा मंतर याद कराच लागते बाई “वऱ्हाडी रायजो “..ठरलं”
रात्री उशिरा पर्यंत गप्पाटप्पा मारून सासरची मंडळी सकाळी थोडी उशिराच उठली.. मालू मात्र आधी उठून कसे काय आहेत बाकीचे हे बघायला गेली. सासूबाई पण झोपल्याच होत्या. मालू त्यांच्या कानाशी जाऊन जोरात ओरडली “आई चा मांडू का?”
सासूबाई तडफडतच उठल्या. “अगं, हे काय मांडू? नाही मालू, सकाळी सकाळी कानात काय ओरडतेस?”
मालू म्हणाली, “मी का म्हटल, का मी ‘पहाटेच” उटले नं त मले आता कंटाळा येऊन ऱ्हायला त चा मांडू का बा, असं इचारत होते. मन्जे सर्वे लोक आता उठूनच र्हायले न…. म्हनून” सासू बाईना काहीच कळेना. ही पहाटेच उठली आणि हीला कंटाळा आला आणि म्हणून मांडू का ? काय असतं ते ? सासू बाईनी परत विचारले “म्हणजे काय करणार आहेस?”
मालू म्हणाली “आवो आई, मी म्हटलं, का चा मांडू का?”
तेवढ्यात मुलगा उठला सासू बाई म्हणाल्या, “अरे बाळू ही काय बोलते ते काही कळत नाही तूच विचार.”
तशी मालू म्हणाली “आवो मी त पहाटेच उठून बसली. मले काही रातभर झोप लागली नाही बा.. मच्चर भाय डसे मंग मी उठूनच गेली” ..
बाळू चक्रावला. हे काय ! ही तर रात्रभर जोरजोरात घोरत होती. आता तासा पूर्वी माझा डोळा लागला.
तोच मालू ओरडली “आवो असे बह्याडावानी कावून पाहून राह्यले… मी म्हटलं, का चा मांडू का?”
सासू बाई परत बाळूवर ओरडल्या “अरे ती काय बोलते आहें?”,असे किंचाळून, “ते बघ ना, शुंभा !”
बाळू भानावर आला. अग ती म्हणते आहे कि चहा ठेऊ का ? “असं होय ! मग ठेव की त्यात अस किंचाळायच कशाला”.
“आमी असंच बोलत असतो” मालू म्हणाली. सासुबाईनी हात जोडले, “बरं आता कोणाला चहा कि कॉफी ते विचारून घे”.
मालू बाहेर, गेली “कोनकोन चा घेनार हाय ते सांगा बरं पट पट. आन कोनकोन कॉफी घेनार ते बी, आताच सांगून द्या. मन्जे तशी मले मांडाले.”
आता मांडू ह्याचा अर्थ घरात कळला होता, प्रत्येकाने आपली फर्माईश पेश केली, लगेच मालू ओरडली “दातगीत घासले का गुरल्या करूनच बसून ऱ्हायले.”
सगळे परत आं….? आता हे काय गुरल्या , बाळू पुढे आला आणि म्हणाला “अरे, दात घासलेत कि नुसती चूळ भरूनच बसलाय सगळे असे विचारतिये ती..”
ओके! मालू चहा, कॉफी घेऊन आली, “घ्या एकदम बढीया बनाया है” म्हणाली.
चहा घेता घेताच मालू तिच्या टोन मधे म्हणाली “नाष्ट्याले काय बनवू ते सांगा नं आई??
सासू बाई म्हणाल्या मी करते तू बैस.. मालू कसली ऐकतीये, परत जोरात म्हणाली , “कावोन अशा करता… मी देते न बनवून. का बनवू ते सांगा. उकरपेंडी बनवू का बढीया !”
बाळूचे डोळे चमकले, सासूबाई विचारात पडल्या, सासरे पेपरात डोके खुपसून बसले. इतर मंडळी सोयीस्कर रित्या आपापल्या कामाला लागली. सासूबाई प्रेमाने म्हणाल्या, “आज पोहेच कर,”
मालू परत बोललीच, “आवो आलू पोहे, बनवू का? पोपट त आता भेटनार नाही. त सांबार च टाकते.”
सासरेबुवा वैतागले. “अरे, हे काय चाललय ? पोपट काय, सांबर काय ? सकाळ पासून पोह्यात कोणी खात का? आपले साधे पोहे कर नाहीतर माझी बायको करेल. अन ए बाळ्या ! तू काय असले पदार्थ करायला परवानगी देणार आहेस? , असले भयानक प्रकार नकोत, उगाच कोणी ऐकल तर आपल्या घरावर प्राणीमित्र संघटना, मोर्चे काढतील”
बाळू काही बोलणार तो मालू मध्ये ओरडली, “बरं…. मी बनवते आलुपोहे. पन सांबार त टाकाच लागते ते काही भयानक गीयानक नसते.”
सासरे मान डोलावून पेपर वाचायला लागले,आणि म्हणाले ” घाला सांबर, शेळी कोंबडी,आता काय काय पुढ्यात येईल देव जाणे.”
मालू जोरात हासली.. “तुमी बी बम मजाक करता जी, मले वाटल नवत”. सासरे हताशपणे हसले. बाळू खुश ! क्या बात है सुग्रण बायको..
मालूने बटाटे, कोथिंबीर घालून पोहे केले. ते पाहून घरातील मंडळींचा जीव भांड्यात पडला. पोहे खात खातच मालू सासूबाईना म्हणाली “आई, आता तुमी आंग धून घ्या न पटकन, अन आवो तुमी काल म्हनत होते ना म्हाल्या कड जातो आन येताना वठ्या कडून कपडे घेतो… त जा बरं पटकन फुकट इथ बह्याडा सारखं बसून राहू नका.”
सगळे परत आं….. आता हा कुठ जातोय बाळू म्हणाला, “जरा सलून मध्ये जाऊन, आणि येताना धोब्याकडून कपडे घेऊन येतो.”
आता घरातल्या सगळ्यांना प्रश्न पडू लागले ही कोणती भाषा बोलतीये, मराठी आहे असे तर वाटते.
तेवढ्यात मैनाबाई आल्या, कामाला. काय सुनबाई ! मजेत का ?” त्यांनी प्रश्न विचारला. “मी त सादरी हावो तुमी? बाहेर उन् चांगलच पडून ऱ्हायला न तुमी कानपट गिनपट बांधून डोक्यावर शेव घेऊन फिराबर नाहीतर झाव लागून तरास होते न …खूप उन असन त कांदा बी ठेवाव जवळ… झाव नाही लागत”..
सासूबाई सगळं ऐकत होत्या. ही बया काय बोलतेय काही कळत नाही आता डोक्यावर शेव न कांदा घेतल्याने उन लागत नाही, म्हणे नुसती लाज काढणार आहे. मैनाबाई काहीतरी समजल्या सारखी मान हालवून कामाला लागल्या.
मालू परत सासूबाईंच्या पुढे गेली तश्या त्याच म्हणाल्या ” थोडं सावकाश बोल गं बाई ! मी ऐकतीये.” मालू म्हणाली, “आता सैपाकाच पहा लागते नं.. का बनवू आता फोड्नीच वरण, भात, पोळ्या अन भाजी कोनती बनवू ?”
सासूबाई म्हणाल्या “मी बघते, तू थांब.” ऐकेल तर ती मालू नाहीच, “आवो, असं कसं म्हनता तुमी? मी केलं त का झालं ? तुमी करा आराम, बरं त सांगा न भाजी कायची बनवा लागते, मी फ्रीज मदी पायल भेद्र, वांगे, अन खिरे पडून हाय, आलू न कांदे गिंदे घालून काही जमवू का, का नुस्त वरण कलसू ?”
“अरे देवा.. ही काय बोलतीये एकदा समजल नं तर नारळ ठेवीन रे बाबा..” सासूबाई नि मनात देवाला नवसच बोलला. “काय करायचं ते कर पण जरा जपून. बोलणी मला खावी लागतील, तुझ्या रेसिपीमुळे”. “आसं कसं म्हनताजी तुमी…. मी त आमच्या वेटाळात एक नंबर सैपाक बनवो न…. तवाच हे माह्या प्रेमात पडले. माहया आई न मले सांगितलच होतं का जे विद्यार्थी शिकाले येऊन राहते, त्यायची खान्या पेन्याची जबाबदारी घे. एखांदा पटतेच !”
सासूबाई थक्क होऊन पहात राहिल्या. “कर बाई काही पण …”
मालू ने स्वयंपाक केला तिखट तर्रीदार , आवडला सगळ्यांना पण सासरे म्हणाले “सुनबाई मला थोडा तिखटाचा त्रास होतो, जरा जपून. मालू ओरडली “आसं हाय का! मंग पयलेच कावून नाही सांगितल मी तुमच्या साठी गोळा वरण पन ठेवल असत नं!” ….
सगळे हताश झाले. “अग बाई, थोड हळू बोल आणि कमी तिखट कर बास..”
जेवल्यानंतर सगळे थोडे पडले हे वऱ्हाडी जेवणाची गुंगी चढू लागली होती, दुपारचा चहा झाला.
सासूबाई टीवीवर सिरीयल बघत होत्या, मालू तिच्या टोन मधे म्हणाली, “आई तुमी संध्याकाळी घुमता का?”
” काय?” त्या घाबरूनच गेल्या. आता ही बया काय करायला सांगतेय कोण जाणे. “नाही, मंजे मले संध्याकाळी घुमाची सवय हाय ना, म्हनून विचारलं.”
“अगं बाई ! हीला संचार बिंचार होतो कि काय संध्याकाळचा?” त्या घाबरूनच गेल्या. उठून बाळूच बखोट धरून त्याला फरपटच आतल्या खोलीत घेऊन गेल्या “अरे मुर्खा, आता हे काय ऐकतीये मी..”?
बाळू गोंधळला “काय झाल?”
“मालू संध्याकाळी घुमते म्हणे आधी माहित नव्हतं का तुला बावळ्या कसा रे तू आता ही रोज संध्याकाळी घुमायला लागली तर कसे होणार ?.”
बाळूला सगळा गोंधळ लक्षात आला, अग ती घुमायला म्हणजे बाहेर फिरायला जाऊ या का असे विचारत असेल सासूबाई हताशपणे खाली बसल्या बाळू ला म्हणाल्या “अरे कुठे वऱ्हाडी मराठी – पुणेरी मराठी अशी डिक्शनरी मिळते का ते बघ, एकाच दिवसात भितीने जीव अर्धा झाला पुढे अख्खा जन्म आहे रे. ती सुधारतेय का बघ नाहीतर मला बिघडायला…”
Leave a Reply