भारतात आज निर्माण होणाऱ्या एकूण वीजेपैकी मोठा भाग हा औष्णिक ऊर्जेद्वारे निर्माण होणाऱ्या विजेचा आहे. औष्णिक पद्धतींनी निर्माण केल्या जाणाऱ्या वीजेचं प्रमाण हे एकूण वीज निर्मितीच्या 65 टक्के इतकं आहे. सुमारे 22 टक्के वीज ही जलविद्युत प्रकल्पांद्वारे तर 3 टक्के वीज ही अणुऊर्जेद्वारे निर्माण होते. उर्वरित 10 टक्के वीज ही पवनऊर्जा, सौरऊर्जा यासारख्या इतर अपारंपारिक स्रोतांद्वारे निर्माण होते.
औष्णिक प्रकल्पांद्वारे निर्माण होणाऱ्या ऊर्जेपैकी सुमारे पांच-षष्ठांश वीज (म्हणजे एकूण वीजनिर्मितीच्या 54 टक्के) दगडी कोळसा जाळून, तर सुमारे एक-षष्ठांश वीज (एकूण वीज निर्मितीच्या सुमारे 11 टक्के) ही नैसर्गिक वायू जाळून निर्माण केली जाते.
खनिज तेल जाळून निर्माण केल्या जाणाऱ्या वीज निर्मितीचं प्रमाण एकूण वीजनिर्मितीच्या 1 टक्क्यापेक्षा कमीच आहे.
भारतातील एकूण वीजनिर्मितीत महाराष्ट्राचा वाटा हा सुमारे 13 टक्क्यांचा आहे. यात औष्णिक प्रकल्पांद्वारे कोळसा जाळून निर्माण केलेल्या वीजेचं प्रमाण राज्यातील एकूण वीजनिर्मितीच्या 53 टक्के इतकं आहे. नैसर्गिक वायुद्वारे निर्माण केलेल्या विजेचे प्रमाण हे 17 टक्के इतकं आहे.
महाराष्ट्रात कोराडी (जि. नागपूर), नाशिक, भुसावळ, पारस (जि. अकोला), परळी (जि. बीड), खापरखेडा (जि. नागपूर), चंद्रपूर, तुर्भे (मुंबई), डहाणू (जि. ठाणे), वरोरा (जि. चंद्रपूर), इत्यादी ठिकाणी कोळशावर आधारलेली वीजनिर्मिती केंद्रे आहेत. याशिवाय उरण येथे नैसर्गिक वायुद्वारे वीजनिर्मिती केली जाते. तुर्भे येथील वीजनिर्मितीकेंद्रातही वायू जाळून काही प्रमाणात वीजउत्पादन केलं जातं.
महाराष्ट्रात जल विद्युतप्रकल्पांद्वारे होणारी विजेची निर्मिती ही सुमारे 15 टक्के आहे. यात कोयनानगरसारख्या मोठ्या प्रकल्पाबरोबर भाटघर, भिरा, भिवपुरी, येलदरी, पेंच अशा विविध ठिकाणच्या मध्यम व लहान आकाराच्या अनेक जलविद्युतप्रकल्पांचाही समावेश होतो.
याबरोबरच तारापूर (जि. ठाणे) येथील अणुऊर्जेवर आधारीत वीजनिर्मिती केंद्रातून महाराष्ट्राच्या वीजपुरवठ्यात 3 टक्क्यांची भर पडते.
Leave a Reply