क्ष-किरणांचा शोध १८९५ साली लावला. त्यानंतर या शास्त्राची घोडदौड | जोरात सुरू झाली. आज क्ष-किरणशास्त्र रेडिओलॉजी हे फक्त क्ष-किरणांनी काढलेल्या प्रतिमेपुरते मर्यादित राहिले नाही तर निरनिराळ्या पद्धतींनी काढलेल्या प्रतिमा बघून निष्कर्ष काढण्याचे शास्त्र झाले आहे.
क्ष-किरण, अल्ट्रासाऊंड लहरी, चुंबकीय लहरी, इन्फ्रारेड लहरी इत्यादी लहरींनी काढलेल्या प्रतिमा यामध्ये सामावल्या जातात. बऱ्याच तपासण्यांमध्ये शरीराबाहेरून सोडलेल्या तरंगांमुळे निर्माण झालेल्या प्रतिमांचा अभ्यास केला जातो. तर काही तपासण्यांत शरीरातून उत्सर्जित लहरींचा अभ्यास केला जातो. उदा. एम. आर. आय. थर्मोग्राफी. न्यूक्लिअर वैद्यकात आयसोटोप्स शरीरात शिरेवाटे देतात व त्यामुळे किरणोत्सर्ग निर्माण होऊन त्याचे मापन खास कॅमेराद्वारे केले जाते.
शरीरातील प्रत्येक भागाचे कोठल्या ना कोठल्या पद्धतीने चित्रण केले जाऊ शकते. फक्त आपण त्या विशिष्ट भागासाठी व रोगासाठी लागणारी पद्धत वापरली पाहिजे. क्ष-किरण पद्धती- सर्वात स्वस्त पद्धत. काही वेळा ही एकमेव पद्धती वापरली जाते. या पद्धतीत द्विमिती
चित्र मिळते. अस्थिभंग (फ्रॅक्चर) हाडामधील असामान्यत्व (अॅबनॉर्म्यालिटी) फुप्फुसांचे परीक्षण, हृदय आणि काही पेशींचा अभ्यास यासाठी हे उपयोग पडते. याखेरीज काही अन्य तपासण्यांची रोगनिदानासाठी आवश्यकता असते. रक्तवाहिन्यांच्या चित्रणासाठी क्ष-किरणरोधक (एक्स-रे
ओपेक) रंजक द्रव्य वापरले जाते. ते शिरेवाटे टोचून चित्रण केले जाते. याला अॅन्जिओग्राफी म्हणतात. जठर, लहान व मोठे आतडे यांच्या अभ्यासासाठी रुग्णाला बेरियम पिण्यास देऊन क्ष-किरण चित्रण करतात.
मूत्रपिंड व मूत्राशयातील दोष बघण्यासाठी क्ष-किरणरोधक द्रव्य नीलेतून टोचतात व जसे ते द्रव्य मूत्रपिंडातून बाहेर सोडले जाते त्या वेळी क्ष-किरण चित्रण करतात. अल्ट्रासोनोग्राफी मृदू पेशींच्या अवयवांच्या अभ्यासासाठी उदा. पोटातील अवयव, स्तन, डोळे, स्नायू, रक्तवाहिन्या यासाठी अल्ट्रासोनोग्राफीचा उपयोग होतो.
डॉ. आनंद परिहार
मराठी विज्ञान परिषद,
Leave a Reply