नवीन लेखन...

वर्षा ऋतुचर्या

अंगाची लाही लाही करणाऱ्या वैशाखाच्या रणरणत्या उन्हात सर्वजण पावसाळयाची आतुरतेने वाट पाहत असतात. आगमनाविषयी अनिश्चितता असली तरी जूनच्या सुरुवातीला आपल्याकडे धडकणारा पाऊस येताना आल्हाद, गारवा घेऊन येतो. मात्र हा गारवा, ओलावा येताना अनेक आजारही घेऊन येतो. जरा एक दोन सरी पडल्या नाही की लगेच जवळच्या पर्यटन स्थळी जाऊन भिजायचं, भजी, वडापाव सारख्या पदार्थावर ताव मारायचा, असा जणू काय सध्या ट्रेंड झालेला दिसतो. त्याचा आपल्या आरोग्यावर काही परिणाम होतो का? याचा त्यावेळी काही गंधही नसतो याच पावसाळ्यात आपल्याकडे चातुर्मास व इतर सणांची सुरुवात होते. वेगवेगळया आहार व उपवासादीच्या पदार्थांचा भडिमार सुरू होतो. हा सर्व आहार, विहार आपल्यासाठी योग्य आहे किंवा नाही याची शास्त्रीय माहिती आपल्याला असत नाही.

आपल्या आरोग्यासाठी हितकर काय आणि अहितकर काय? याचे समग्र मार्गदर्शन करणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद होय. आलेल्या रुग्णाला औषध देऊन झालेल्या आजारातून त्या ची मुक्तता करणे, याचाच विचार करत नाही तर ते पुन्हा होऊ नयेत व मनुष्याचे स्वास्थ्य टिकून कसे राहील याचेही मार्गदर्शन करते. किंबहुना तेच आयुर्वेदाचे मुख्य प्रयोजन आहे.

आहाराच्या, व्यायामाच्या, झोपेच्या बाबतीत तत्पर असणाऱ्या व्यक्तीनादेखील ऋतु बदलला की काही ना काही आजार उदभवताना दिसतात. कालचक्र बदलले की केवळ

निसर्गातच बदल होतो असे नव्हे तर त्याचे काही परिणाम हे शरीरावर देखील होत असतात. विशेषतः पावसाळ्यात इतर ऋतुंच्या मानाने या बदलांचा परिणाम अधिक होताना दिसतो. हा शरीरावर होणारा परिणाम, त्याची कारणमीमांसा व ते कसे टाळावेत याचा आपण या लेखात विचार करणार आहोत.

उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे व रुक्षतेमुळे शरीरामध्ये रुक्षता उत्पन्न होते. परिणामत: शरीरातला कफ दिवसागणिक क्षीण होत जातो व वायु वाढत जातो. केवळ वातावरण उष्ण असल्यामुळे हा वायु अपायकारक होत नाही. मात्र पावसाळयात आकाश ढगांनी व्याप्त झाल्यामुळे, एकदम गार वारे सुरू झाल्यामुळे, पावसाच्या शिडकाव्याने जमीनीतून वाफा येऊ लागल्यामुळे, आम्लविपाकी व गढूळ पाण्यामुळे शरीरातील पाचकाग्नि दूषित होतो. व प्रामुख्याने वातासह सर्वच दोष दूषित होतात. सोप्या भाषेत सांगायचे तर शरीर क्षीण झालेले असते, पचनशक्ती, भूक मंदावलेली असते व वातादी दोष वाढलेले असतात. याचाच अर्थ कोणत्याही आजारांना अगदी अनुकूल स्थिती शरीरामध्ये तयार झालेली असते. विविध प्रकारचे ताप, दमा, खोकला, श्वसनाचे विकार, आम्लपित्त, संधिवात इ. काही या काळात अगदी हमखास वाढणारे आजार होत या सर्व परिणामांना टाळायचे असल्यास काही नियमांचे पालन करावे लागेल. आहार, विहार, व्यायाम, झोप यांचा विचारपूर्वक यथायोग्य अवलंब करावा लागेल. काही आहार, विहार हे शरीराला अनुकूल, शक्ती वाढवणारे, फलदायी असतात.

त्यानांच पथ्थ म्हटले जाते. तर काही आहारविहार आजारांना अनुकूल, आजार वाढवणारे असतात. त्यां अपथ्थ म्हटले जाते. म्हणून पथ्यकर आहारदिकांचे सेवन करावे व अपथ्यकर गोष्टी आवर्जुन टाळाव्यात. ती पथ्यं, अपथ्य काय आहेत ते जाणून घेऊ-

स्निग्ध आणि उष्ण गुणांच्या आंबट व खारट चवीच्या पदार्थाचा वापर करावा. आहारामध्ये जुन्या धान्याचा वापर करावा.

फोडणी दिलेल्या मूग, मसूर इ. डाळींचे सार घ्यावे.

मूगाचे वरण, हुलग्याचे पिठलं, भाकरी, चपाती असे अगदी सहज पचणारे पदार्थ आहारात असावेत.

भाज्यांना फोडणीसाठी हिंग, सुंठ, धने, मिरे, लिंबू, पुदीना, कोथिंबीर, लसूण यांसारख्या रुची वाढवणाऱ्या, भुक वाढवणाऱ्या तसेच वातादी दोषांचे शमन करणाऱ्या पदार्थाचा वापर करावा.

या काळात पालेभाज्यांचा वापर कमीतकमी करावा. त्याऐवजी दुधी भोपळा, पडवळ, दोडका, भेंडी, कोबी, शेवगा यासारख्या फळभाज्यांचा वापर अधिक प्रमाणात करावा.

वाढलेल्या वाताला व त्याचबरोबर वाढलेल्या पित्तासाठी शामक असे गाईचे तूप आहारामध्ये निश्चीतपणे असावे.

डाळींब, सफरचंद, संत्री, मोसंबी, पपई, अंजीर इ. फळे ताजी, कापून व अल्प प्रमाणात खावीत. फ्रुट सलाड, मिल्कशेक्स इ. प्रकारे केलेले फळांचे सेवन हे सर्वच ऋतुंमध्ये हानीकारक आहे.

मासांहारी व्यक्तींनी चिकन, मटन, अंडी यांचे पचन शक्तीला अनुसरुन सेवन करावे. मासे खाणे टाळावे.

उकळलेले, उकळून गार केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. कुठेही नदी, तलाव इ.चे पाणी पिऊ नये. नाईलाज असल्यास पाणी गाळून घेऊन, उकळून वापरावे. अशा अपरिचीत पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरू नये.

हवेत असलेल्या आर्द्रतेमुळे पूर्णतः न सुकलेले कपडे वापरात आल्यामुळे त्वचेला खाज सुटणे इ. विकार होण्याची शक्यता असते. अशा वेळी स्वच्छ, कोरडे, शक्य असल्यास धूपन केलेले कपडे वापरावेत.

या काळात शारीरिक शक्ती कमी असते. त्यामुळे व्यायाम अल्प प्रमाणात करावा. सूर्यनमस्कार, पायी चालणे किंवा योगासने असा व्यायाम करावा. किमान भोजनानंतर शतपावली करावी.

रात्री वेळेवर झोपावे. सकाळी लवकर उठावे. दिवसा झोपू नये. जेवल्या जेवल्या तर लगेच मुळीच झोपू नये.

या काळात वाढलेले वातादी दोष याप्रकारे आहार, विहार यांच्या यथायोग्य सेवनाने नियमित करता येतील. यांच्या जोडीला जर पंचकर्म चिकित्सा व औषधी चिकित्सा केल्यास फारच उत्तम आरोग्य प्राप्ती होऊ शकेल. पंचकर्मापैकी बस्ती ही वातासाठी अत्यंत प्रभावकारी चिकित्सा आहे. आपल्या तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने ती आपण जरुर करून घ्यावी.

पोटात घेण्याच्या औषधांच्या बाबतीत सांगायचे तर मध १ चमचा रोज साध्या पाण्यासोबत घ्यावा.

जेवणापूर्वी १ छोटा तुकडा आलं आणि सैंधव मीठ चावून खावे. याने मंदावलेली भूक सुधारण्यास मदत होते.

हिरडयाचे चूर्ण सैंधव मीठासोबत घेतल्यास देखील उत्तम परिणामकारक ठरते.

आपापल्या आजारांनूसार बस्ति कर्माची कालमर्यादा, त्यातील द्रव्यांची निवड तसेच पोटातील औषधे यांचे सेवन आपल्या वैद्यांच्या सल्याने व देखरेखीखाली करावे.

कोणताही ऋतु बदलला की त्याच्या आधीच्या ऋ शेवटचे ७ दिवस व नवीन ऋतुच्या सुरुवातीचे ७ दिवस यांना ऋतुसंधी असे म्हणतात. आधीच्या ऋतुच्या आहारविहाराच्या सवयी क्रमाक्रमाने कमी करत नवीन ऋतुच्या सवयींचे क्रमाक्रमाने सेवन करावे.

अशाप्रकारे आयुर्वेदात सांगितलेली ऋतुचर्या आपण आचरणात आणल्यास आपल्याला निश्चितच आरोग्याची प्राप्ती होईल आरोग्य उत्तम राहिल्यास पावसाळयाचा, निसर्गाचा, सणांचा आपल्याला निश्चितच मनमुराद आनंद घेता येईल.

वैद्य घनश्याम डोंगरे
सहयोगी प्राध्यापक, पुणे

संकलन : सुरेश खडसे 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..