हिंसा परमो धर्म: नावाची, डोळ्यात अंजन घालणारी एक सुंदर कथा मुन्शी प्रेमचंद यांनी लिहिली आहे. एका प्रसंगी नीचवृत्ती मौलवीच्या तावडीतून एका हिंदू युवतीला साधाभोळा जामीद वाचवतो व घरी सुखरुप पोहचवतो. या उपकाराची परतफेड कशी करु असे तिचा पती विचारतो. त्यावर जामीद म्हणतो, ” संकटात सापडलेल्या कुणाचीही मदत कर. तीच माझी परतफेड असेल.” या कथेतून माझ्या विचारचक्रास गती मिळाली.
जामीद पासून सुरू झालेले उपकाराचे चक्र त्याची परतफेड होईल तेव्हा पूर्ण होईल असा विचार माझ्या मनात आला.आपल्याला झालेली मदत स्मरुन आपण कोणालातरी मदत करतो. आपण कोणाच्यातरी सावलीत वाढतो आणि मग स्वतः झाड बनून इतरांना सावली देण्यास प्रवृत्त होतो. परोपकार सहकार्य मैत्री प्रेम या सद्भावनांची ही वर्तुळेच तर असतात. एकातून दुसरे अशी ती निर्माण होतात व जीवनाला मानवतेचा मंगल स्पर्श होतो. ज्याला जे हवे ते मिळण्यास मदत केली तर आपल्याला हवे ते मिळते हे आपल्याला समजते. एक संपते तेव्हा दुसरे वाढत असते हे शाश्वत सत्य शिकवणारे ऋतुचक्र आपण पाहतो. बीज, रोप, वृक्ष, फळे, पुन्हा बीज आणि पुन्हा तेच आवर्तन सातत्याने होत राहते. सहा ऋतूंचे चक्रही फिरत राहते. जल,बाष्प, ढग आणि पुन्हा जल ..हे जलचक्र. सृजन,वर्धन आणि विलय म्हणजे जन्म विकास आणि मृत्यूचे हे वर्तुळ सूत्र फक्त निसर्गालाच नाही तर, संपूर्ण ब्रह्मांडाला लागू पडते. मनुष्य ब्रह्मांडाचा एक अणुमात्र अंश असल्यामुळे ते मनुष्यालाही लागू पडते. काय आहे वर्तुळ? फक्त एक भौमितिक आकृती? अजिबात नाही. तो तर फार त्रोटक अर्थ झाला. व्यापक अर्थाने वर्तुळ हे विश्वाचे, पूर्णत्वाचे, अनादि अनंत शाश्वततेचे प्रतीक आहे. तसेच ते निराकार ईश्वराचेही प्रतीक आहे. बायबल मानते की देव एक असे वर्तुळ आहे ज्याचे केंद्र तर सर्वत्र आहे पण त्याचा परीघ कुठेही नाही इतके ते अमर्याद आहे.(हर्मिस ट्रिसमेगिस्टस) वैदिक संस्कृतीही अद्वैत ईश्वराचे चराचरात असणे मान्य करते. कालिक व भौगोलिकरित्या हजारो योजने अंतरावर असणाऱ्या संस्कृतीतील हे समान तत्व निव्वळ योगायोग कसे म्हणणार? माणसाचे जीवन जन्म मृत्यूच्या बृहद वर्तुळात फिरते. त्याच्या कर्मांची,कर्मफलांची छोटी-मोठी वर्तुळे अविरत गतिमान असतात. जन्म हा त्या वर्तुळाचा प्रारंभबिंदू. जन्मतःच गरजा, भावना, अपेक्षांच्या मागे जिवाची प्रवास रेषा धावत रहाते. बाल्य, शैशव, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व हे टप्पे पार करीत ती वेडीवाकडी वळणे घेत पुढे पुढेच लांबत राहते. कधीतरी एक स्थिती येते की धावणारा जीव शिणतो, थांबतो, मागे वळून पाहतो. त्याला सगळे निरर्थक तरी वाटते किंवा तृप्त तरी वाटते. पुढे धावणारी रेषा मागे वळते आणि शांत शांत होत प्रारंभबिंदूला मिळते. ही भावना ज्याच्या अंतकरणात निर्माण होते त्यालाच गवसते ती निरपेक्ष शांतता. मग सगळ्याच आशा अपेक्षा संपतात आणि एक मोठे वर्तुळ पूर्ण होते.
सरळ रेषेची टोके कितीही लांब जातात,जुळत मात्र नाहीत. रेषा ताठर तर वर्तुळ लवचिक. कारण वर्तुळ छोटे असो की मोठे.. व्यापक असून बध्द…जिथून सुरु तिथेच संपूर्ण होणार. दोन्ही बिंदू मिळणारच.
माणसेही तशीच. काही रेषांसारखी तर काही वर्तुळासारखी. ताठर माणसे कुणाच्या जवळ जात नाहीत तर लवचिक स्वभावाची माणसे इतरांशी सहज जवळीक साधतात. मैत्र जोडतात. लाक्षणिक आणि प्रत्यक्ष दोन्ही अर्थांनी वर्तुळे आपल्या जीवनात कशी आलीत पहा. आपली भाषाच घ्या. पूर्णविराम,विसर्ग, अनुस्वार तसेच काही अक्षरेही वर्तुळाकार.
‘वर्तुळ’ या शब्दातच पहा ना किती वर्तुळे आहेत. आपल्या अनेक अंकरचनाही वर्तुळाकार आहेत. शून्य तर अनन्यसाधारण! ब्रह्मांड, त्यातील सूर्य, त्या भोवती फिरणारे ग्रह, उपग्रह सर्व वर्तुळाकार. या सर्वांची भ्रमण कक्षाही वर्तुळाकार.सूक्ष्म बिंदू ते ब्रह्मांड वर्तुळाकार .. यात नक्कीच अर्थपूर्णता आहे. हे सारे ब्रह्मांड…व्यापक मानले तर अनंताला कवेत घेणारे, आणि शून्य मानले तर काहीच नाही.. संपूर्ण रिक्तता! म्हणजे अनंत असूनही काहीच नाही व काहीच नाही तरीही अनंत. सगळी मायाच म्हणायची की!
आराधना कुलकर्णी
Leave a Reply