महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं नाट्यक्षेत्रातील एक नाव म्हणजे वसंत कानेटकर. वसंत कानेटकर यांचे शिक्षण पुणे व सांगली येथे झाले. त्यांचा जन्म २० मार्च १९२२ रोजी झाला. इंग्रजी विषय घेऊन एम. ए. पदवी मिळविल्यानंतर नाशिक येथे हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालयात सुमारे २५ वर्षे त्यांनी अध्यापन केले. नाटककार म्हणून ओळख असलेल्या कानेटकरांनी सुरुवातीला कथा, कादंबरीपासूनच आपल्या लेखनाला सुरुवात केली. वि. स. खांडेकर यांचा सहवास मिळाल्याने साहित्याचा दर्जेदारपणा कळत नकळत रूजला गेला. नाशिकला आल्यावर कुसुमाग्रजांच्या सहवासातूनही त्यांच्यातील साहित्यिक आणखी फुलत गेला.
३० वर्षांच्या काळात त्यांनी सुमारे चाळीस नाटकं आणि काही एकांकिका रंगभूमीच्या ओटीत घातल्या. प्रेक्षकांची आवडनिवड जाणणारा एक प्रयोगशील नाटककार म्हणून ते लोकप्रिय होते. वेड्याचं घर उन्हात हे त्यांचे पहिले नाटक म्हणजे मनोविश्लेषणाचा एक नवीन प्रयोग होता. त्यानंतर देवांचं मनोराज्य, प्रेमा तुझा रंग कसा, रायगडाला जेव्हा जाग येते, लेकुरे उदंड जाहली, मत्स्यगंधा, हिमालयाची सावली, विषवृक्षाची छाया, कस्तुरीमृग, वादळ माणसाळतयं, अश्रूंची झाली फुले, मला काही सांगायचयं इ. अनेक नाटके त्यांनी लिहिली. १९८८ मध्ये ठाणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळाला होता. वसंत कानेटकर यांचे ३१ जानेवारी २००४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कानेटकर यांच्या मला काही सांगायचय नाटकाच्या पहिल्या प्रयोगात कोणते कलाकार होते?