मराठी संगीताच्या इतिहासात वसंत या नावाला काही आगळंवेगळं महत्त्व असावं, अन्यथा या एकाच नावाच्या तीन संगीतकारांनी इतकं सुरेल संगीत कसं काय दिलं असतं? वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार हे तीन संगीतकार. त्यांचा जन्म १९ जानेवारी १९२४ रोजी झाला. या तिघांनी दिलेल्या संगीतावर मराठी गीत रसिकांच्या चार पिढ्या आजवर तृप्त झाल्या आहेत. त्यातील एक संगीतकार वसंत प्रभू.
वसंत प्रभू यांनी सुरुवातीला हिंदी चित्रपटात‘बाल अभिनेता’ म्हणून काम केले.मा.वसंत प्रभू यांचे मूळ नाव व्यंकटेश प्रभू. पण हिंदी चित्रपटासाठी हे नाव चालणार नाही म्हणून त्यांचे ‘वसंत’ असे नामकरण करण्यात आले. मूळ गाव पाणे मंगरूळ, वडीलांचा हॉटेल व्यवसाय, बालवयापासूनच मेळ्यात गाणं-नृत्य-अभिनय करून ह्यांत रसिकमान्य झालेला “वसंत प्रभू‘ नावाचा तरुणही संगीतात काहीतरी करण्यासाठी धडपडत होता. त्याच वेळी “एचएमव्ही‘चे वसंतराव कामेरकर ह्यांनी प्रभू ह्यांची योग्यता ओळखून त्यांना एचएमव्हीत संगीतदिग्दर्शक म्हणून नोकरी दिली होती. दामूअण्णा माळी म्हणून प्रभू ह्यांचे एक मित्र होते. दामूअण्णा आणि पी. सावळाराम ह्यांचीही मैत्री होती. दामूअण्णांनी सावळाराम ह्यांची प्रभू ह्यांच्याशी ओळख करून दिली. ही “शब्द‘-“स्वरा‘ची भेट म्हणजे रसिकांसाठी “सुवर्णयोग‘च ठरला. कारण, भावगीत विश्वा्त सावळाराम-प्रभू ह्या द्वयीनं सोन्यासारखी एकाहून एक गाणी दिली. माणूस जसा नशीब घेऊन जन्माला येतो, तशीच गाणीसुद्धा नशीब घेऊनच जन्माला येतात! ह्या द्वयीची अशी अनेक गाणी नशीबवान ठरली. त्यातल्या एका गाण्याचं नशीब जास्तच जोरावर होतं. ते प्रचंड गाजलं. वर्षानुवर्षं वाजत राहिलं. अनेक वेळा ऐकूनही ताजंतवानंच राहिलं. प्रत्येक पिढीला आवडणारं ते गाणं आहे “गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का?
जा, मुली जा, दिल्याघरी तू सुखी रहा…
आचार्य अत्रे ह्यांनी ह्या गीताचं कौतुक करताना म्हटलं होतं “गंगा-जमुना‘ हे गाणं एका पारड्यात व इतर सगळी गाणी दुसऱ्या पारड्यात घातली तरी “गंगा-जमुना‘चं पारडं जड होईल!‘‘
‘सखी शेजारीणी’ हे गाणे गाण्यासाठी वसंत प्रभू यांनी अरुण दातेच पाहिजेत अशी खास फर्माईश केली होती. तेव्हा अरुण दाते हे प्रसिद्धीस आले नव्हते. वसंत प्रभू यांनी एकूण २२ चित्रपटांना संगीत दिले. संगीतकार वसंत प्रभू, जनकवी पी. सावळाराम आणि लता मंगेशकर या त्रयीने मराठी भावसंगीताची मुहूर्तमेढ रोवली. या त्रयीची अजरामर गीते अजूनही आपल्या ओठी आहेत. वसंत प्रभू यांचे चरित्र मानसीचा चित्रकार तो या नावाने मधु पोतदार यांनी लिहिले आहे.
वसंत प्रभू यांचे १३ ऑक्टोबर १९६८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ मधु पोतदार
वसंत प्रभू संगीत दिलेली काही गाणी
चाफा बोलेना
चंद्र तोच अन् तेच तारे
चंपक-गोरा कर कोमल
चांद मोहरे चांदणे
जन पळभर म्हणतिल
जन्मोजन्मीं तुम्हीच यावे
जय देवी मंगळागौरी
जिथे सागरा धरणी मिळते
जीर्ण पाचोळा पडे तो
तुझे डोळे पाण्याने भरले
तूच कर्ता आणि करविता
तें दूध तुझ्या त्या
दिनरात तुला मी किती
Leave a Reply