‘वास्तुशास्त्र पेंटिंग’ हा शब्द आपल्यापैकी बर्याच जणांनी ऐकला नसेल. ‘पेंटिंग’ हा शब्द सर्वज्ञात आहेच. मग ‘पेंटिंग’मध्ये अनेक प्रकार आहेत जसे वास्तववादी पेंटिंग, अवास्तववादी पेंटिंग म्हणजे मूर्त पेंटिंग – अमूर्त पेंटिंग. मग पुढे अर्धमूर्त किंवा सेमी फिगरेटिव्ह आणि अर्धअमूर्त म्हणजे सेमी ऍबस्ट्रक अशी विविध प्रकारची पेंटिंग असतात. पुन्हा त्यांच्या विविध शैली किंवा स्टाइल्स असतात. तंत्र म्हणजे टेक्निक्स असतात. तो भाग निराळा.
आपणास उत्सुकता आहे ती ‘वास्तुशास्त्र पेंटिंग’ म्हणजे काय ? आणि त्या पेंटिंग्स मुळे खरंच काही अपेक्षित परिणाम मिळतो काय? अशा विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची…!! बरोबर ना… !! तेच आता आपण पाहू.
वास्तुशास्त्र या शब्दातच ‘वास्तू’ येते. मग ती वास्तू स्वतःचे आपले घर फ्लॅट-बंगला-प्रासाद-वाडा काही असेल वास्तूमध्ये इंडस्ट्री – कंपनी, अगदी आपली छोटीशी व्यवसायाची जागाही असेल. या प्रत्येक प्रकारच्या वास्तूला स्वतःचा स्वभाव असतो. स्वतःची प्रकृती असते. गृहिणी ज्या प्रकारे आणि ज्या मानसिकतेतून स्वयंपाक करते ते गुण त्या तिने शिजवलेल्या अन्नात असतात. तद्वतच `वास्तू’ ज्यांनी बांधली आहे, ज्यांच्या नावावर आहे आणि ज्या मुहूर्तावर बांधकामाचा शुभारंभ होऊन पूर्ण झालेली आहे या बाबींचा विचार केला जातो. कारण ते ते गुण त्या वास्तूत परावर्तित झालेले असतात हे निरीक्षणांनी प्रमाण झालेले आहे. आता त्या पूर्ण बनवलेल्या वास्तुची अवस्था इतके दिवस गर्भावस्था असते. पुढे जेव्हा तिचे दुय्यम निबंधकाकडे रजिस्ट्रेशन झालेले असते ती वेळ म्हणजे त्या वास्तूचा `जन्म’. या जन्मवेळेवरून त्या वास्तूची कुंडली बनवली जाते. सदर वास्तू ज्याच्या किंवा ज्यांच्या नावावर आहे त्या व्यक्तीची व व्यक्तींची कुंडली आणि ज्या क्षणाला मालकाने वा इच्छुकांनी, `वास्तुशास्त्र पेंटिंग’ बनवायला सांगितले त्या क्षणाची वेळ घड्याळात पाहून त्यावेळेची कुंडली – होरा कुंडली बनवून या तीनही कुंडलीचा अभ्यास आणि निरीक्षण करून, त्या वास्तूला आणि त्या वास्तूच्या मालकाला वा मालकांना लाभदायक ठरणार्या रंगांची – आकारांची यादी बनवली जाते. त्यात राशी नक्षत्र – नक्षत्र वृक्ष – नक्षत्रस्वामी – राशीस्वामी – जपजॉब इत्यादींचा विचार करून लाभदायक घटकांद्वारे पेंटिंग बनवले जाते. ते म्हणजेच वास्तुशास्त्र पेंटिंग. त्याचे लाभ आपण पुढील लेखात पाहू.
शुभम भवतु
— प्राध्यापक गजानन सिताराम शेपाळ
Leave a Reply