वासुदेव गायतोंडे हे भारतातील सर्वाधिक नावाजलेले अमूर्ततावादी चित्रकार होते. अमूर्त घटनांना दृश्यरुप देण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांचा जन्म २ नोव्हेंबर १९२४ रोजी नागपूर येथे झाला.
झेन फिलॉसॉफी आणि आध्यात्मिक शिकवणुकीने प्रेरित झालेले ख्यातकिर्त, मराठमोळे भारतीय वासुदेव गायतोंडे यांचा गोव्यातील एका खेडेगावात जन्म झाला. त्यांचे घरातील टोपणनाव ‘बाळ’ होते आणि मित्रांमध्ये ‘गाय’ ह्या नावाने ते प्रसिद्ध होते.
म्हापसा शहराजवळील उस्कुई गावचे हे मूळ कुटुंब. गायतोंडे यांचे वडील बोल्टन प्रेसमध्ये सहाय्यक व्यवस्थापक होते. त्यांच्या वडिलांचे प्रेसशी संबंधित काम असूनही विज्ञानापासून कायद्यापर्यंत आणि ज्योतिषापासून आयुर्वेदापर्यंत त्यांचा दांडगा अभ्यास होता. घरातच ग्रंथसंग्रह असल्याने वासुदेवास वाचनाची गोडी लहानपणीच लागली. गायतोंडे कुटुंबातील कुणीतरी एक गावातील देवळाच्या भिंतींवर चित्रे काढायचा. ते बघून छोट्या वासुदेवास चित्र काढावेसे वाटू लागले. त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. वासुदेव गायतोंडे मुंबईत सुरुवातीला महापालिका शाळेत शिकले व नंतर गोखले हायस्कूलमधून मॅट्रिक झाले. त्यांचे चित्रे काढणे चालूच होते. थोड्याच दिवसांत ते मुंबईतील कलाप्रदर्शनांना हजेरी लावू लागले. घरून ह्या संदर्भात त्यांना प्रोत्साहन मिळाले नाही.‘वाटेल त्या’ मुलांबरोबर मिसळायला त्यांना परवानगी नसे, त्यामुळे लहानपणापासून आपसूकच ते एकटे होत गेले.
त्यांनी १९४३ मध्ये एका खाजगी आर्ट स्कूलमध्ये नाव दाखल केले व त्या तयारीमुळे १९४५ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना थेट तिसर्याख वर्षात प्रवेश मिळाला. जे.जे.च्या भव्य परिसराचा त्यांच्यावर चांगला परिणाम झाला. जगन्नाथ अहिवासी हे त्यांना रचनाचित्र शिकवत. अडूरकर पेन्सिल ड्रॉइंग आणि भोंसुले मास्तर जलरंगचित्रण व व्यक्तिचित्र शिकवत. अहिवासी आणि भोंसुले मास्तरांचे गायतोंडे हे लाडके विद्यार्थी होते.
आर्ट स्कूलच्या काळातच गायतोंडे यांनी बौद्ध वाङ्मय, जपानी चित्रकला, मृद्पात्रे (पॉटरी), कविता यांचाही अभ्यास या काळात केला. निसर्गदत्त महाराज, रमण महर्षी, सोयरोबानाथ अंबिये, संतवाङ्मय, कला, साहित्य, तत्त्वज्ञान असे विविध विषय त्यांच्या वाचनात होते. त्या काळात जे.जे.च्या पटांगणात दरवर्षी जे. कृष्णमूर्ती हे तत्त्वज्ञ आपली प्रवचने देण्यास येत. ह्या प्रवचनांचा फार मोठा परिणाम त्यांच्या जीवनावर झाला.
गायतोंडे यांना १९४८ मध्ये जे.जे.मधून पदविका मिळाली व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे फेलोशिपही मिळाली. त्यांनी १९४९/५० या काळात जे.जे.मध्ये साहाय्यक शिक्षक म्हणून काम केले. त्यांनी केलेली ही एकमेव नोकरी होती. काही मतभेद होऊन त्यांनी १९५० मध्ये ही नोकरी सोडली व पूर्णवेळ चित्रकार म्हणून जगण्यास सुरुवात केली.
हुसेन, सूझा, रझा, आरा, गाडे आणि बाकरे ह्यांनी १९४८ मध्ये ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप’ स्थापन केला. नंतर गायतोंडे त्यात सहभागी झाले. ह्या ग्रूपतर्फे १९४९ मध्ये भरवलेल्या समूह प्रदर्शनात त्यांचा सहभाग होता. त्यानंतर काही चित्रकारांनी ‘बॉम्बे ग्रूप’ स्थापन केला, त्यातही गायतोंडे होते. ह्या ग्रूपचीही काही प्रदर्शने झाली. ह्या साऱ्यांत होणाऱ्या कलाविषयक चर्चा, वादविवादांत गायतोंड्यांचा सक्रिय सहभाग असे आणि त्यांच्या मताला सहकलाकारांमध्ये मान होता.
मुंबईत १९५७/५८ मध्ये वॉर्डन रोडवर भुलाभाई देसाई मेमोरिअल इन्स्टिट्यूट सुरू झाली. संगीत, चित्रकला, नाट्यक्षेत्रातील कलाकारांच्या कलासाधनेसाठी इथे उत्तम वातावरण होते आणि कलावंतांना तिथे अतिशय स्वस्तात स्टूडिओ मिळण्याची सोय होती. गायतोंडे यांनी तिथे काम करण्यास सुरुवात केली. ह्या इन्स्टिट्यूटसमोरच्या बाकावर बसून समुद्राकडे पाहत गायतोंडे तासन्तास चिंतन करत. नाट्य, नृत्य, चित्र अशा सर्व कलांमध्ये काहीतरी नवीन करू पाहणार्याह कलाकारांचा इथे राबता असे आणि परस्परांत संवादही असे. गायतोंडे इथेच अल्काझी, विजया मेहता इत्यादींच्या संपर्कात आले.
१९६४ साली मिळालेल्या रॉकफेलर शिष्यवृत्तीद्वारे गायतोंडे न्यूयॉर्कला गेले. तिथे त्यांनी अमेरिकेतील विविध चित्रशैलींचा अभ्यास केला. त्यानंतर ते जपानला गेले. जपानमध्ये त्यांच्यावर झेन तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडला.१९७२ मध्ये ते भारतात परतले आणि शेवटपर्यंत त्यांनी दिल्लीत वास्तव्य केले.
दिल्लीत १९७४ च्या आसपास त्यांची ओळख ममता सरन ह्या चित्रकर्तीशी झाली. त्यांची मैत्री आणि सोबत गायतोंडेंना अखेरपर्यंत लाभली. ममता यांनी त्यांची शेवटपर्यंत काळजी घेतली. ते १९९७ ते २००१ ह्या काळात ममताबरोबर गुडगाव येथे एकत्र राहिले. अॅरबस्ट्रॅक्ट आर्ट म्हणजेच अमूर्त कला त्यांनी आत्मसाद केली होती आणि त्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. कलाविश्वात गायतोंडे या नावाचं तयार झालेलं गूढ पाहता त्यांच्या चित्रांना नेहमीच चढ्या भावानं बोली लागते. वर्ष २०१५ मध्ये क्रिस्टी या सुप्रसिद्ध संस्थेने मुंबईत वासुदेव गायतोंडे यांच्या ऑईल पेंटिंगचा लिलाव केला होता.मार्च २०२१ मध्ये चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या चित्रांनी पुन्हा एकदा रेकॉर्ड बनवले.१९६१ साली बनविलेले त्यांची एक निळ्या रंगाची ऑईल पेंटिंग्स ३९.९८ कोटी रुपये म्हणजेच ५५ लाख अमेरिकन डॉलर्सना विकली गेली.
हे कोणत्याही भारतीय कलाकाराच्या आतापर्यंतच्या सर्वात महागड्या चित्रांपैकी एक ठरले आहे. वासुदेव गायतोंडे यांनी स्वत: चा विक्रम मोडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये गायतोंडे यांनी १९७४ मध्ये तयार केलेली ऑईल पेंटिंग सुमारे ३६ कोटींमध्ये विकली गेली होती. जेव्हा जग कोरोना साथीच्या विरुद्ध लढा देत होते, तेव्हा ही किमया त्यांच्या चित्रानं साधली होती.
सतीश नाईक यांनी ‘गायतोंडे’ हा मराठीत ग्रंथ संपादित केला आहे. सतीश नाईक यांनी संपादित केलेल्या ‘गायतोंडे’ या ग्रंथाचे जानेवारी २०१६ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले होते. गायतोंडे यांच्यावरील एक इंग्लिश पुस्तक ‘सोनाटा ऑफ सॉलिट्युड: वासुदेव संतू गायतोंडे या नावाने आहे. दृश्यकलेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना दरवर्षी ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ राज्य शासन प्रदान करते. वासुदेव गायतोंडे यांचे १० ऑगस्ट २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ सतीश नाईक/ नितीन दादरावाला/दीपक घारे
Leave a Reply