नवीन लेखन...

वसुंधरा डांगे (पेशवे पार्कातली फुलराणी)

पुणेकरांच्या सहा-सात पिढ्यांचे रंजन करणारी #पेशवेपार्कातलीफुलराणी आज ६६ वर्षांची होत आहे. पुर्वीच्या पेशवे उद्यानातल्या गर्द झाडीतून वाघ, सिंह, उंट, घोडा अशा अनेक प्राण्यांच्या सानिध्यातून धावणारी फुलराणी बाळगोपाळांसाठी आजही आनंदाची पर्वणी ठरते आहे. १९५६ साली सुरु झालेल्या या फुलराणीचे उद्घाटन त्यावेळी पाच वर्षांच्या चिमुकलीच्या हस्ते करण्यात आले होते. तेव्हाची ती चिमुकली होती वसुंधरा डांगे. आता त्या सुगंधा सुहास शिरवळकर आहेत. फुलराणीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डांगे उर्फ शिरवळकर यांना तेव्हाच्या मजेदार आठवणी सांगितल्या.

पेशवे उद्यानातल्या फुलराणीचे उद्घाटन ८ एप्रिल १९५६ ला पुण्यातील पूर्व प्राथमिक शाळेतील तेव्हाची विद्यार्थिनी वसुंधरा डांगे हिच्या हस्ते झाले. (पुढे त्या वाचकप्रिय लेखक सुहास शिरवळकर यांच्या पत्नी झाल्या.) इंजिन आणि दोन डबे अशी ‘फुलराणी’ची रचना होती. या रेल्वेसाठी दोन फलाट, तिकीट विक्रीची खिडकी, तिकीट तपासनीस, सिग्नल अशी सारी व्यवस्था उभारण्यात आली होती. लहानग्यांच्या करमणुकीसाठी उद्यानात चालविल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये पुण्यातली ‘फुलराणी’ देशातली सर्वात जुनी रेल्वे आहे, हे विशेष.

वसुंधरा डांगे त्यावेळी रविवार पेठेतील जुनी भाजी अळी येथे वास्तव्यास होत्या. पूर्व प्राथमिक शाळेत शिकत होत्या. त्या सांगतात, की ५६ मधले पेशवे उद्यान हिरव्यागार झाडाझुडुपांनी गच्च भरलेले आणि प्राणी-पक्ष्यांनी भरलेले उद्यान होते. या उद्यानात मुलांसाठी ‘फुलराणी’ धावणार ही विलक्षण बाब होती. फुलराणीचे उद्घाटन एक लहान मुलीच्या हस्ते करण्याची पुणे महानगरपालिकेची इच्छा होती. महापालिकेचे अधिकारी पूर्व प्राथमिक शाळेत आल्यानंतर बालवाडीत शिकणाऱ्या वसुंधरेची म्हणजे माझी निवड करण्यात आली.

वसुंधरा सांगत होत्या, ‘‘माझी आई विजयालक्ष्मी गृहीणी होती आणि वडिल कमलाकर ‘एसटी’त कार्यरत होते. माझे आजोबा काशीनाथ डांगे हे ख्यातनाम साहित्यिक आणि इतिहास संशोधक दत्तो वामन पोतदार यांच्याकडे लेखनिक म्हणून काम करत असत. ‘फुलराणी’च्या उद्घाटनानंतर पोतदार यांनी मलाही ‘फुलराणी’ याच नावाने हाक मारण्यास सुरुवात केली. तेव्हापासून ‘फुलराणी’ हे नाव मला मिळाले ते आजतागायत माझ्यासोबत आहे.’’

पुढे प्रसिद्ध झालेले वाचकप्रिय लेखक सुहास शिरवळकर पूर्वी रविवार पेठेतल्या लोणार आळीत तेव्हा वसुंधरा डांगे यांच्या घराजवळच राहात. वसुंधरा आणि सुहास यांचा प्रेमविवाह झाला. विवाह होण्याआधी सुहास शिरवळकर लेखक नव्हते. शिरवळकरांच्या घरी गेल्यानंतर जेव्हा सगळ्यांना समजले, की ‘फुलराणी’चे उद्घाटन वसुंधरेच्या हस्ते झाले आहे, तेव्हापासून सासरीदेखील वसुंधरा यांना ‘फुलराणी’च म्हटले जाऊ लागले.

वसुंधरा डांगे आणि सुहास शिरवळकर यांच्या विवाहानंतर दोन वर्षांनी पेशवे पार्कातली ‘फुलराणी’ पंचविशीची झाली. त्यावेळी महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांनी पुन्हा वसुंधरा यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पुण्यातले ज्येष्ठ पत्रकार वरूणराज भिडे यांनी त्यासाठी मदत केली. त्यावेळी वसुंधरा-सुहास या दाम्पत्याचा मुलगा ‘सम्राट’ हे दोन वर्षांचा झाला होता. त्यामुळे या दोन वर्षांच्या सम्राटच्या हस्ते ‘फुलराणी’चा रौप्य महोत्सव म्हणजेच पंचविसावा वाढदिवस साजरा करण्यात आला. ‘फुलराणी’चा पन्नासावा वाढदिवस वसुंधरा-सुहास यांचा दुसरा मुलगा प्रबोध शिरवळकर यांच्या आर्या या मुलीच्या हस्ते झाला होता.

– अतुल चिंचली.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..