माणूस कुणाची ना कुणाची वाट पहातच आपलं आयुष्य घालवतो. वयानुसार त्याचे वाट पहाण्याचे संदर्भ, हे बदलत जातात. मात्र ‘वाट पहायचं’ काही संपत नाही. अगदी स्वतःपासून सुरुवात करुयात. आपला जेव्हा जन्म होणार असतो, तेव्हा आपल्या वडिलांची घालमेल होत असते. ते वाट पहात असतात. कधी बाळाचा ‘आवाज’ येतोय? एकदाचा आवाज येतो आणि त्यांचा जीव भांड्यात पडतो. वाट पाहिल्याचं, ‘सार्थक’ झालेलं असतं. मग आपण दिसामासानं, हळूहळू मोठे होतो. आता घरातले सगळे वाट पहात असतात, की हा उभा राहतोय, पण चालणार कधी?. मग एके दिवशी ‘पहिलं पाऊल’ टाकलं जातं. जो जीवनातील पुढच्या वाटचालीचा, ‘श्रीगणेशा’ असतो. मग शाळा सुरु होते. त्याला शाळेत घेऊन जाणाऱ्या गाडीची, वाट पहावी लागते. शाळा सुटल्यावर गाडीची वाट पहाता पहाता उशीर झाला तर, काळजी वाटते. सहलीला पाठविल्यावर, जीव टांगणीला लागलेला असतो. मनात नाही नाही ते विचार येत असतात. शेवटी खूप उशीरा सहलीची गाडी येताना दिसते व सुटकेचा श्वास सोडला जातो.
शाळेच्या वार्षिक परीक्षा होतात, तेव्हा निकालाची वाट पाहिली जाते. प्राथमिक नंतर माध्यमिक शाळा पूर्ण होते. दहावी बारावीच्या निकालाची ‘वाट पहाणं’, हे फार गंभीर प्रकरण असतं. त्यावर पुढच्या उच्च शिक्षणाची दिशा ठरणार असते. निकाल मनासारखा लागतो. काॅलेजला प्रवेश घेण्यासाठी झुंबड उडालेली असते. काॅलेजला दिलेल्या पर्यायांपैकी जवळचं काॅलेज मिळतंय का? याची वाट पहावी लागते. शिक्षण पूर्ण होतं. नोकरीसाठी कंपनीला बायोडाटा पाठवल्यावर, येणाऱ्या काॅललेटरची, वाट पहावी लागते. घरात लग्नाची चर्चा सुरु होते. मुलगी पहाण्याचा कार्यक्रम होतो. तुमच्याकडून होकारच असतो, त्यांच्या होकाराची वाट पहाणं, सुरु होतं. एकदाचा, होकार येतो. ‘शुभमंगल’ पार पडतं. आणि वर्षांच्या आंतच, तुमच्या वडिलांनी पार पाडलेली भूमिका वटविण्यासाठी तुम्ही मॅटर्निटी होममधील काॅरीडाॅरमध्ये येरझाऱ्या घालत, ‘रिझल्ट’ची वाट पहात असता. ‘वाट’ पहाण्याचं एक वर्तुळ पूर्ण होतं..
माझा जन्म खेड्यातला. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जायचो, तेव्हा गावी घेऊन जाण्यासाठी, आजोबा बैलगाडी पाठवायचे. खूप वाट पाहिल्यानंतर, ती यायची. हुंदडण्यात सुट्टी संपून जायची. जून सुरु झाल्यावर गावाहून निघताना, फोटोतल्या आजीसारखीच, माझी आजी दिंडी दरवाजात बसलेली असायची. तिचा निरोप घेऊन पुन्हा सुट्टीची वाट पहाण्यासाठी, मी शहराकडे निघायचो. शहरात मी शाळेतून येईपर्यंत, माझी आई दारात बसून माझी वाट पहात रहायची. हे काॅलेज संपेपर्यंत चालू होतं. व्यवसाय सुरु केला. वडील निवृत्त झाले. माझं लग्न झाल्यावर, ते दोघेही गावी गेले. महिन्यातून एकदा तरी गावी यावं, म्हणून ते माझी वाट पाहू लागले. कधी जमायचं तर कधी अवघड व्हायचं. गावी गेल्यावर त्यांना अजून रहावं, असं वाटतानाच नाईलाजाने निघावं लागायचं.. अशीच वर्षे गेली. त्यांची आजारपणं, डाॅक्टर, हाॅस्पिटल, तपासण्या यातून बरं होण्यासाठीची, वाट पहात पुन्हा महिने, वर्ष गेली. काळातल्या ओघात त्यांनी जगाचा निरोप घेतला. आता त्यांच्या भूमिकेत नकळत, मी शिरलेलो आहे. मी देखील घरातलं कोणी बाहेर गेलं की, त्यांची खिडकीशी बसून वाट पहात असतो. पुन्हा एक वर्तुळ पूर्ण होतं असतं..
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
९-६-२२.
Leave a Reply