आयुष्याची रेखा संपता
जीवन दोर जाई तुटतां
प्राणज्योत नेई यमदुता
त्याक्षणीं ।।३६।।
फांस घेऊन यमदूत
नेण्या सत्यवान प्राणज्योत
टाकले फांस गळ्यांत
सत्यवानाच्या ।।३७।।
सावित्रीची तपशक्ति देई
तिज दिव्य दृष्ठी
सोडून फास गळ्याभोवती
देई दूर फेकून ।।३८।।
यमदूत जाई घाबरुन
हतबल झाले ते बघून
सावित्रीची शक्ति जाणून
रिक्त हस्तें गेले यमपूरीं ।।३९।।
यमराज मृत्युदंडाधिपती
संतापून ते येती
नेण्या प्राणज्योती
सत्यवानाची ।।४०।।
यमराज प्रभूचे दिक् पाळ
मृत्युरुपी ते महाकाळ
अपूर्व त्यांचे बळ
राज्यकरीं यमपूरी ।।४१।।
नेवून मानव प्राणज्योत
कर्माप्रमाणे शिक्षा देत
पाठवूनी नविन देही परत
जीवन गाडा चालवी ।।४२।।
रेड्यावर बैसूनी
यमराज आले धाऊनी
हातीं फांस घेऊनी
प्राण नेण्या सत्यवानाचे ।।४३।।
बसूनी सत्यवाना शेजारीं
पतीधर्माचे ध्यान धरीं
रक्षण कवच उत्पन्न करी
पती पत्नी भोवती ।।४४।।
तपाची दिव्य शक्ति
यमराजासी येण्या रोकती
फांस त्याचे न पोहोंचती
सत्यवाना पर्यंत ।।४५।।
बघूनी ते तेजोवलय
यमराज चकीत होय
शोधूं लागला उपाय
सत्यवानाची नेण्या प्राण ज्योत ।।४६।।
पतीकडून पाणी मागवून
सावित्रीस दूर सारुन
प्राण ज्योती घेई काढून
सत्यवानाची ।।४७।।
यमराज निघाला स्वर्गी
सावित्री त्याच्या मागे मार्गी
पतिव्रता शक्ति तिचे अंगीं
चेतना देई मार्गक्रमण्यास ।।४८।।
मनीं तिच्या पतिभृती
बघून अपूर्व शक्ति
यमराज प्रसन्न होती
सांगतले वर मागण्या ।।४९।।
श्वशुराचे अंधत्व गेले
राज्य तया परत मिळाले
वडीलांस पुत्र प्राप्त झाले
सावित्री मिळवी तीन वर ।।५०।।
न पावली समाधान
पाठलाग चालूं ठेवून
यमासी ठेवीत झुलवून
चर्चुनी विषय निराळे ।।५१।।
शेवटचा मी वर देईन
परी तू जावे परतून
मानव देहा स्वर्ग कठीण
कसे राहशील तूं तेथें ? ।।५२।।
जीवन आतां माझें व्यर्थ
न उरे जगण्या अर्थ
एकटेपणा ठरेल अनर्थ
माझ्या आयुष्यीं ।।५३।।
Leave a Reply