स्त्री जातीचा मुकुटमणीं
महासती मान मिळोनी
धन्य झाली जीवनीं
पतीव्रता सावित्री ।।१।।
ब्रह्मा लिखित अटळ
ह्या सूत्रीं केला बदल
हे तिच्या तपाचे फळ
सावित्रीने मिळविले ।।२।।
जरी येतां काळ
चुकवावी वेळ
बदलेल फळ
हेच दाखविले तीने ।।३।।
समजण्या धर्म पतिव्रता
ऐकावी सावित्री कथा
मनीं भाव भरुनी येतां
आदर वाटे तिच्या परीं ।।४।।
मद्रदेशाचा नृपति
नांव तयाचे अश्वपति
कन्या त्याची सावित्री
प्रेम करी तिजवर ।।५।।
कन्या होती उपवर
धाडीले शोधण्या वर
राजा करी कदर
कन्येच्या इच्छेची ।।६।।
फिरुनी सर्व देशी
न मिळे कुणीही तीजशी
आली एका आश्रमापाशी
दृष्टीस पडला एक युवक ।।७।।
नजर त्यावरी पडूनी
स्तंभित राजकन्या होऊनी
रुप लागली न्याहाळूनी
सत्यवान युवकाचे ।।८।।
तेजोमय युवक पाहूनी
भान जाय हरपूनी
राजकन्येने वरिले मनोमनी
संकल्प लग्नाचा करी ।।९।।
राजपूत्र होता सत्यवान
पिता जाई राज्य गमावून
अंधत्व पित्याचे त्यास कारण
वनवासी झाले सारे ।।१०।।
सावित्री परतूनी घरीं
सर्व हकीकत कथन करी
आवड तिची सत्यवानापरी
मनीं त्यास वरिले ।।११।।
चर्चा करीत समयीं
नारदाचे आगमन होई
आनंदी भाव भरुनी येई
पुता पुत्रीचे ।।१२।।
वंदन करुनी देवर्षीला
कन्येचा संकल्प सांगितला
आशिर्वाद मागती लग्नाला
सावित्री सत्यवानाच्या ।।१३।।
नारद वदले खिन्न होऊनी
लग्न संकल्प द्यावा सोडूनी
विचार काढावा मनातूनी
सत्यवानाविषयी ।।१४।।
दुर्दैवी आहे सत्यवान
त्याची आयुष्यरेषा लहान
एक वर्षांत जाईल मिटून
जीवन त्याचे ।।१५।।
हे आहे विधी लिखीत
म्हणून होत निश्चीत
कोण करील बदल
त्यांत प्रभूविना ।।१६।।
ब्रह्मा लिखीत अटळ
झडप घालीतो काळ
न चुके कधी ही वेळ
हीच निसर्ग शक्ती ।।१७।।
Leave a Reply