नवीन लेखन...

वटपौर्णिमा (कथा)

मीरग संपत आलता. आभाळ ठणठण व्हतं.ढग कुठ बियाल पण दिसत नव्हते.निराशेनं कौतीका वसरीत दुचित बसला व्हता. मनात घालमेलं चालली व्हती.काय कराव ते त्यालं काय बी सुदरयनं गेलतं.बसल्या जागुन उठायलं आवसन व्हत नवतं.त्यालं आस वाटु लागलं की आभाळानं ढगायबरोबरच आपलं आवसन बी पळवलय की काय.अन्नाचा घास गोड लागयन गेलता.मंग जरा चहान तरी बर वाटल मनुन कस बस वसरीतुन उठत त्यानं नेमकच पाणी शेंदुन आलेल्या बायकोल,ईमलीलं चहा कर आसं मनलं.तस वस्काळतच ईमली त्यालं मनली,“घरात गुळ ,साकर्‍या,पत्ती कशाचाच पत्त्या नाय….सगळे डब्बे तुमच्यासारखेच ठणठण गोपाळ झालेतं.आज वडपौर्णिमेचा सन हे.जरा दुकानावर जाऊन किराणा माल आणा.काय बाई किती वढाव एकटीन संसार. या माणसाचं बिलकुल जरासं सुद्धा घरात लक्ष नाही.मी आहे म्हणून टिकली या घरात….दुसरी कोणी टिकली नसती. काय पाहून बापानं मलं या घरी दिलं काय माहीत.कोण्या जन्माचा सुड काढला बापाणं काय ठाऊक माय…. ये पोर्‍हयवो काय हुडदंग माजवलाय रे….ईकडं या .ईथ बसा मह्यापुढं अभ्यासालं.”
तसं पोरगं बाहिरूनच वरडत मनलं,“आये,तुलं कुठं वं काय कळते वं,मलं ईंग्रजीचा अभ्यास करायचाय….तुलं थोडं येते ईंग्रजी.”
“सुद्यामतीन सांगतलेलं कळत नाही का? काय माय हे डेंगर बी …निख्खळ बापबोड्यायवरच गेलेतं….सांगतलेलं कव्हाच धड ऐकणार नाहीत.नशीबच फुटक मव्ह माय…काय मह्या बापाल आवदसा आठवली व्हती आन मलं ईथं देलं कान्नु माय…!”
ईमलीची पट्टी सुरू झाली.घरात कटकट नको मणून मंग कौतीका बाहिर निघाला.त्यानं खिशात हात घातला.खिशे बी त्याच्या दरीद्र्यासारखेच भोंगळे व्हते.आत्ता काय कराव या चिंतेत तो पडला.मागच्याच आठवड्यात सोसायटी होईल असं बँकेचा साहेब मणला व्हता पण अजून काय सोसायटी झाली नव्हती. पोरांच्या शाळा चालू झाल्यान त्याह्यचे वह्या,पुस्तकं,कपडे घ्यायचे व्हते.वळखीयच्या लोकायचे काम पटपटं व्हत व्हते पण कौतीकाची फाईल काय टेबलावुन हालत नवती.दुचित मनानं कौतिका रांनाकडं चकरलं गेला.त्यांनं शेतात चौकड नजर फिरवली आन गपकन खालीच बसला. त्यालं चक्कर यायल्यावाणी व्हऊ लागलं.शेतात पेरून आठ दिवस झाले व्हते पण दानाबी उगवला नव्हता.पहिलंच किडूक-मीडुक ईकूण पैसे करून त्यानं पेरणी उरकली व्हती.आत्ता दुबार पेरणी करायची मंजे वांधेच व्हते. त्यांनं मोठा आवंढा गिळला.जरासा खाकरला अन टोंगळ्यावर हात ठुऊन उभा राह्यला. पायात बळ नव्हतच पण उसनं आवसन आणून त्यानं पेरणीच टिपनं लावायल सुरवात केली.आता कुणाल बी बियाणं मागव का काही एखादा दुकानदार आपल्यालं उधार पाधार बी देईल बख…. म्हणून तो विचार करू लागला.विचारा विचारातच तो रस्त्यानं चालु लागला.
एवढ्यातं “ऐ कौतीका,ऐ आरं ईकडं ये जरासा मर्दा….!” असा आवाज आला आण त्याची तंद्री मोडली.भानावर येऊन त्यान आवाजाच्या दिशेनं पाह्यलं.त्यालं त्याचा सावडकरी ईशेनाथ दिसला.ईशेनाथ आंबा उतरवत व्हता.ते दोघं लहानपणचे सोबती व्हते.एकमेकांच्या सुखदुःखात,अडीअडचणीलं ते नेहमीच धावून येत. ईशेनाथलं पाहून कौतिकालं बरं वाटलं. ईशेनाथकडं तरी बियाची सोय होईल असं त्यालं वाटलं.कौतीका ईशेनाथकडं गेला.
“आरं काय कौतिका,कुठं ध्यान व्हतं रं तुव्हं आं….आरं मर्दा आवाज देता व्हतो कव्हाचा तुलं.मनलं जराशे नव्हाळीचेआंबे नेशिल खारालं” ईशेनाथ मनला.
“तसं नाही,ईकडं उशीच्या बार्‍याकडं चक्कर मारायलं गेलतो.सगळं बुडालं रं.काय बी उगवलं नाही.जे काही जरासं उगवलं व्हतं ते बी करपुण गेलं.” कौतीका म्हणाला.
“तुलं मनलं व्हतं मर्दा,की पेरायची गडबड करू नको मनुन पण तु ऐकलच नाही.आता झाली का नाही पंचायतं.” ईशेनाथ आंबे उतरवता ऊतरवता बोलला.
“बरं हे कुडीतले आंबे घे…आण भाबीलं दे नेऊन खार करायलं.” ईशेनाथनं आंबे भरलेली कुडी खाली सोडत कौतीकालं मनला.कौतीकानं बी कुडीतले आंबे आपल्या धोतराच्या सोग्यात घेतले.कौतीकालं ईशेनाथची परीस्थीती माहीत व्हती.तरी खडा पाहुन टाकाव तसा तो मनला,“मी काय मंतो ईशेनाथ जरासं सयाबिनचं बी आसलं तं देतु का? बियाणं बी देतो ब्वा तुलं.”
“हे काय देण्या घेण्याचं बोलनं झालं का ? आर कौतीका,आपण कितीदा एकमेकांसाठी धावुन आलो.मह्याजवळ बी आसतं नं,तं तु मांघायच्या आंधीच देलं आसतं.पण घरी जरासं बी ‘बी’ नाही गड्या,पावशेरक्सं हे तेव्हडं सांधायलच लागते बघ.” ईशेनाथं म्हणला आन कौतीकाची राह्यली सुयली आशाबी मावळली.आत्ता कोणालं मांघाव या ईचारात तो पडला.
आंबे घेऊन तो घराच्या दिशेनं निंघला. रस्त्यात त्याला मसडं वळतानी नथ्थु शावकार दिसला.शावकारालं तरी ईचारून पहावं मनुन कौतीका नथ्थु शावकाराकडं वळला. नथू सावकार काय लय मोठा सावकार नव्हता पण अडचणीतल्या लोकांना दोन पाच हजार रुपये सवाई,दिढीनं नाही तं व्याजानं देऊन नड भागवायचा.
“राम राम शावकार” कौतीका म्हणाला.
“राम राम….काय रं कौतीका,ईकडं कुठं….बरं हे नं सगळं.” नथ्थु शावकार म्हणाला.
“कशाचं बरं घेऊन बसलात शावकारं.एक बॅक बुडाली बघा.सोसायटी व्हणार व्हती या हप्त्यात पण आजुक झालीच नाय.आता वांधेच झालेत पेरायचे.”
कौतीकालं काय म्हणायचं हे एव्हाना नथ्थु शावकाराच्या ध्यानात आलतचं.तरी चेहर्‍यावर भाव नं आणता तो मनाला,”आरेरे….लय वाईट झालं गड्या.काय करावं आपला कुणबटाचा धंदाच आसा हे.सगळा देवभरोसे.पेरलेलं पिक घरात येवोस्तोर आपल्या आशा आबदा आसतात रे बाबा…शेवटी त्याच्यापुढं आपल काही चालते व्हयं.नशीबाचे भोग मनायचे आन भोगायचे….दुसर काय…राम कृष्ण हरी….!”
“तस नाही शावकार पण मी काय मनत व्हतो जरां दोन तिन हजार आसले तं भेटतील का सोसायटी व्हवोस्तोरं.” कौतिका मनाला.
“हात तिच्या,एवढच व्हय… देले आसते रे तुलं पैसे पण कसं हे न कालच ते आवरीवरचा गजा हे नं,त्याच्या मथाऱ्यालं हाट्याट्याक आलता.त्यालं दवाखान्यात न्यायचं म्हणुन गजानं मह्याकडुन कालच पाच हजार नेले बघ… सवाई देतो म्हणी दोन मह्यन्यासाठी…! मव्ह कसं हे नं कोणी अडचणीत आसल तं राहवत आही मलं….देले मंग काय….? दोन महिन्यासाठी पैसे नेले तं मी सवाई घेतो.दोन महिन्याच्या वर एक दिवस जरी झाला तर मी दीढी घेत आसतो आन जर का सहा महिन्याच्या वर वेळ गेला तं मग मात्र मी दहा टक्क्यानं व्याज वसुलतो म्हणलं….शेवटी काय आडी-अडचणीतल्या माणसाला मदत करणं हेच आपलं कर्तव्य….! आपण कुठं काय करतोय रे….हे तर ‘तो’च करतो सर्व…आपल्या हातुन…आपण तर केवळ निमित्त मात्र…राम कृष्ण हरी…!”
नथु शावकार काय आपल्याला उसने पैसे देणार नाही हे कौतीकाच्या ध्यानात आलत. त्यालं नथू सावकाराचा कावा कळला होता.तरीही वेळ पडलीच तर आडीनडील कामी येईल म्हणून कौतिका नथू सावकारालं,”हो हो शावकार बरोबर हाय नं…..हे सगळ तेवच करतो….पहा बो ईकडुन तिकडुन काही झालं तं.” आसं मनला.
“बघतो,बघतो….उंद्या सांगतो तुलं” असं नथ्थु शावकार म्हणाला आन मसडायकडं पळाला.
“मायझे,हे शावकार लोक बि लय बेरकी असतात. पैसे व्याजाने देतात आणिवरून उपकार बी दाखवितात.पैसे देतांनी उंदरालं मांजर जसं खेळवते तसं खेळवु खेळवु देतात….सुद्यामतीनं कव्हाच देत नाहीत.” कौतीका मनातल्या मनात स्वगत विचारात घराकडं चलत व्हता.तेव्हड्यात त्याच्या ध्यानात आलं की बायकोनं किराणा सांगतलाय म्हनुन.मंग त्यान आपला मोर्चा व्यंकट मारवाड्याच्या दुकानाकडं वळवला.दुकान कसलं खेडवळ मिनी मॉलच व्हता ते.मुंगीपसुन हत्ती पर्यंत सर्व जिनसा त्याच्या दुकानावर भेटायच्या.काउंटरलं बसुन व्यंकट मारवाडी पेंगला व्हता.तसं व्यंकट मारवाड्याच्या दुकानालं गिर्‍हाईक कमीच आसायचं,पण त्याच्याकडं सगळ्या जिनसा भेटायच्या म्हणून त्याचा धंदा जोरात चालायचा.त्याचं आसं व्हत की व्यंकट मारवाडी आव्वाच्या सव्वा भाव लावायचा त्यामुळं त्याच्या दुकानावर आडले नडले नारायणच जास्त करून यायचे,बाकीचं गिर्‍हाईक कांड्यावर मोजावं आसच व्हतं.नाईलाजानं कौतिका व्यंकटीच्या दुकानावर आला व्हता.
“काय बाबा कौतिका…लय दिवशानं येन केलश तु…मी काय मंते तु गरीबाले विशरला की काय…!” व्यंकटी म्हणाला.
“अं…अं… आपलं…जराक्सा किराणा आण लेकरायच शाळचं सामायण उधारीवर नेयाचं व्हतं शेठजी.” कौतिका बोलला.
“तुम्ही लोकं नगद आसलं की दुसर्‍या दुकानावर जाते बाबा…आन उधार मनलं की माझेकडे येते.तुझे पह्यले पण उधारी बाकी आशते.ते कधी देते तु…!”व्यंकटीन आपलं नेहमीप्रमाणं लाघवी हासत चष्म्यातुन तिरकस पहात म्हटलं.
“देतो की शेठजी,मी कुठं पळुन चाललो व्हय….आवं आठेक दिसात सोसायटी व्हयीलं.देतु की वाईच.” कौतीका म्हणाला.
“ठिक आशु दे बाबा….तु च्यांगला माणुश आशल्याने मी तुले उधार देते बाबा….पण सांगुन ठेवते महिण्याहुन अधिक काळ लागलं तर सवाईन पैशे वशुलते मी….आताच शांगितलेलं बरं…बोल काय म्हंतेश…!” व्यंकट मारवाड्याच्या बोलण्यावर ‘हो’ म्हणल्याशिवाय कौतिकालं पर्याय नवता.त्याणं किराणा आणि पोरांच शाळेच सामान घेतलं.
घरी आला आणि त्यानं धोतराच्या घोळातले आंबे वसरीत उबडले.किराणा बायकोच्या हवाली केला.पोर्‍हायलं शाळचं सामान दिलं आन हातपाय धुवुन कुर्‍हाडं घेऊन बायकोलं खारासाठी आंबे फोडुन द्यावं मनुन तो आंबे फोडायलं बसला.
“काय वं,कुठुन आणले आंबे.” ईमलीनं ईचारलं.
“आपल्या ईशेनाथनं त्याचा खार्‍या आंबा उतरवलायं.नव्हाळी मुन देले त्यानं.” आंबे तोडत तोडत कौतिका ईमलीलं मनला.
आज कौतीकाच्या बायकोची लयच गडबड चालली व्हती.सडा,सारवन करून तीची सयपाकाची लगबग चालली व्हती.
कौतिकानं ईमलीलं मनलं,”काय ये ईमले, काय लय गडबड चाललीये…!”
तं तशी ईमली जरा लाजुनच मनली,”आज किनई,मी बुकींग करणार हे,….तुमच्यासाठी…! तुम्हालं तं माईतच हे आजकाल किती तंगी चाललीय ते…पह्यल्याच भेटयणत ….तुम्ही परेशान न व्हावं मनुन मंग मीच बुकींग करणार हे आज तुमच्यासाठी…!”
ईमली काय मंतेय हे त्याच्या ध्यानातच आलं नाही.आण ही बुकींग फिकींग आस काय म्हणायलीय…पोर्‍हायचा अभ्यास पाहता पाहता हीलं बी ईंग्रजी समजायलीय कान्नु….मंग त्यालं वाटलं की ईमली बचत गट चालवते.वरतुन मोल मजुरीचे कामबी करते.कदाचित तिच्याजवळ पैसे संगळलेले आसतील आन मंग मही परेशानी पाहुन ती कदाचीत सोयाबीनच्या बॅकीची बुकींग करणार आसलं.कौतिकालं हायसं वाटल.पहाटपसुन टेंशननं त्याचं डोस्क गरगरतं व्हतं.ईमलीच्या बुकींग या शब्दानं त्यालं हायस वाटलं.दुपारी तो बिंदास झोपला….मालक आसे बिंदास झोपलेले पाहुन ईमलीलं लय बरं वाटलं आन आश्चर्यबी झालं.मालकालं आसं निवांत झोपलेलं पाहुन ती गालातल्या गालात गोड हसली.
ईमली तिचा दिनक्रम आटपत व्हती.तिसर्‍या पहारी ती बाहेर जाऊन आली.कौतिका आजुन बी झोपेलच व्हता.ईमलीलं आश्चर्यच वाटलं.तिसरी पहार झाल्यानं तिन न वाटुन बी त्यालं झोपतुन उठवायल गेली.त्याची ती समाधानी झोप पाहुन तिलं त्याल उठवु वाटयनं गेलतं.पण ईलाज नवता.जनावरायचा चारा पाणी करणं व्हतं.तिचं खट्याळ मन जागी झालं.तिनं केसांचा आंबाडा मोकळा केला आन त्याच्या चेहर्‍यावर बटांनी खेळु लागली.चेहर्‍यावर वळवळ लागल्यानं कौतिकाची झोप मोडली.पुढं पाहतो तं कायं ईमली मोकळे केसं सोडुन बसली व्हती.ति आज लय नटली थटली व्हती…वरतुन खुश बी वाटत व्हती….हे पाहुन कौतिकाल लय बरं वाटलं.त्यानं खट्याळपणानं तिच्या गालावर हळुवार हात फिरवत तिलं मनलं की,“काय आज लयच सजुन धजुन बसलय एक माणुसं…!”
“चला तुम्ही नं लयच बदमास हेतं…!” ईमली लाजत मुरकतं म्हणली.तिच्या चेहर्‍यावरची लाज अगदी गालावर वघळत व्हती.त्यांच्या ह्या गुलुगुलु गप्पा सुरू असतानाच कौतिकानं ईचारलं की,”काय गं,केलस का बुकींग…?”
तस ती आजुकच लाजुन मुरकुन मनली,“व्हयं की…..एकाच नाय तं सात सातच केलं !”
“आं…आग येडी का खुळी तु …एकच बस झाली आपल्यालं.तु सातचं बुकींग काय मुन केलं…..!”
तशी ती नाराज झाली…तिचा चेहरा ढवळाशिपतच पडला.टचकन पाणीच आलं तिच्या डोळ्यातं…..! तीनं मोठ्ठा उसासा घेतला….त्याच्यापसुन दुर झाली..आन लागली धाय मोकलुन रडायलं…..कौतिका तं परेशानच झाला.तो मनातच मनु लागला मायझं ईचं काय डोस्क फिस्क फिरलं काय ? शेजारणी पाजारणी जमल्या…ईमलीच आपलं गवरणं सुरूच व्हतं…उर बडवु बडवु ती रडु लागली.कौतिकालं काहीच कळयन झालतं की ब्वा काय झालं मनुनं..! त्याच्या शेजारची मथारी राधुबाई धावत पळतच आली.तिनं ईमलीलं जवळ घेतलं आण शांत करत ईचारलं…..“काय गं ,काय झालं ? कामुन गौरायलीस..यानं काही खोडी काढलीय का तुही…!” तसं ईमली ऊर बडवत मनाय लागली की,“ येह्यलं मव्हा कटाळा आला वं मायं…मी येह्यलं सात सातं मनत व्हती वं मायं…तं हे एकच बस झाली मंतात वं मायं…..मव्हा तं कटाळा आला वं येह्यलं मायं…..म्या काय पाप केलं वं मायं….!” आसं ती हेल काढुन रडायलं लागली.तसं मंग राधु मथारी मह्याजवळ येऊन मह्यावरच डाफरायलं लागली…म्या मनलं, “का,काय झालं ये राधुकाकु,तु मह्यावरच कामुन वरडायली वं.” तसं काकु मनली,”मेल्या मुडदा बसला तुव्हा. ती चागलं सात मंतेय तं तु एकच मुन काय म्हणुन राह्यलाय रे…ईथं लोकायलं एकबी भेटयनं तु कामुन नाही मनतोयस रं.आश्यानं मुंज्याच मरशील पुढच्या जलमात.”
“मी काय मुन मुंजा मरील वं राधुमाय.मी फक्त ईलं एकच मनलो की ब्वा एकच बस मनुन.सात सातची काय गरज हे.”कौतिका मनला.
“मुडद्या,हि पोरगी तुह्यासाठी वडालं पुंजायलं गेलती.चांगली हे.जिव लावते तुलं.आपल्या देवा धरमाची ही रित थोरा मोठ्यायनं लावुन देलीय,आण तुलं ही नको झालीय व्हयं…!” राधुकाकु तावातावानं मनली.
“मंग मी कुठं मनलो की पुजा करू नको मुन.आन ती मलं नको म्हणून….आगं काकु ति मलं मनली की म्या बुकींग करणार हे मुन.आत्ता मलं सांग मपलं फक्त एकच उशीचं बारं निंघलं नाही.तं मि मनलो की ब्वा आपल्यालं एकच पायजे.तं ही मंते की नाय मी सातची बुकींग केलीय मुन.आता मलं सांग राह्यलेल्या सहा बॅका काय मी डाळणावर पेरू का ? आं सांग नं…!” कौतिकान राधाकाकुलं मनलं.आसं मंताच राधाकाकुच्या डोस्क्यात भक्कन प्रकाश पडला.सगळा खेळ तिच्या ध्यानात आला.तसं राधुकाकी ईमलीलं मनली की,“आगं सटवे तेव सात जलमाबद्दल नाय तं एका सयाबिनच्या बॅकीबद्दल बोलायलाय आन तु बॅकील जलम करून रडत बसलीय.” लगेच तिनं कौतिकाकडं मोर्चा वळवला आन म्हणु लागली की,“व्हय रं पेंध्या तिच एक सोडुन दे…ती भोळी हे…पण तुह्याबी ध्यानातं ही गोष्ट कशी काय नाही आली रं…आं..!.”
“त्याचं काय हे नं राधुकाकी,म्या मनलं की ब्वा ईमली बचत गटाची अध्यक्ष हे. वरतून ती कव्हा बव्हा मोल मजुरी बी करते,मंग तिच्याजवळ पैसे असतील आण मही परेशानी पाहून तिलं मव्हा कळवळा आला आसल,आण मनुन मंग तीनं आपली ठेव काढुन बॅकीची बुकिंग करते आसं मनली आसल आसं मलं वाटलं.मनुन मी बॅकींबद्दल बोलत व्हतो.बायकोबद्दल नाही…!” कौतिकानं आसं म्हणताचं ईमलीलं बी ओशाळुन आलं.ती तोंड झाकून आतल्या घरात पळाली.आलेल्या बाया बापड्या बी ईमली आन कौतिकाच्या गोंधळावर हासत खिदळत परतल्या.
“जायं,पोरीलं जरा समजुन सांग.सना-वाराचा आसा गोंधळ बरा नाही.” आस मनुन राधाकाकु बी आपल्या घरालं गेली.
कौतिका वसरीतुन उठला,आतल्या घरात जाऊन ईमलीलं शोधु लागला.ईमली एका कोपर्‍यात तोंड लपवुन बसली व्हती.त्यानं हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणला,“इमले मी आसं कसं तुलं सोडेल गं… मह्या फाटक्या तुटक्या संसारालं तू नेटानं सांधतेस….चालवतेस… मह्या सुख दुःखात भरभरून साथ देतेस आन मी तुलं एकाच जन्मात सोडिलं व्हयं.अगं असा विचार येनं मंजे बी मी मह्यासाठी पाप समजतो. मलं तू एक जन्म नाही,सात जन्म नाही,तं हजारो जन्म….जन्मोजन्म तू आण तूच पाहयजेस… तुह्याशिवाय मी दुसऱ्या कुणाचाच विचार करू शकत नाही….पहाटं बोलतांना तू जव्हा मलं मनली की मी बुकिंग करणार हे म्हणुन तं मलं वाटलं तू सोयाबीनच्या बॅकीचीच बुकिंग करणार हायेस…मलं काय माहित की तू सात जन्म मीच मिळावं म्हणून देवाकडे मागणं माघण्याबद्दल बोलतेस ते,अन त्यालाच तू बुकिंग मनायलीस म्हणुन,आण काय गं,हे बुकिंग फिकींग आसले इंग्रजी शब्द तुलं कुठून माहीत झालेतं.” कौतिकाच्या या बोलण्यानं ईमली लाजुन लाजुन चुर झालती.ती काहीच बोलतं नव्हती.त्यानं तिच्याजवळ जात आपला हात तिच्या हनुवटीवर ठेवला… थोडासा तिचा चेहरा वर उचलत तिच्या डोळ्यात बघत तो म्हणला,“इमले सांग नं अजूनही तुझा माझ्यावर राग हे का ? ये बोल नं गं हारणे….तु आशी चुपचाप राह्यलेली नाय आवडतं मलं….बोलं नं….बरं ते जाऊ दे मलं एक सांग हे बुकिंग शब्द तुलं कोणं सांगतला बोल की…!”
“नाय वं मव्हचं चुकलं.म्याच पहाट तुम्हालं नाय नायं ते बोलली.आपल्या दरीद्रीवर,या कंगाल अवस्थेवरं…..पण मी आसच बडबडली वं.त्याच लय मनालं लाऊन घेऊ नका.कितीबी गरीबी, दुःख आसले नं तरी मलं तुम्हीच जलमांतरीचे साथीदार मनुन पायजेतं.मी तेल मिठ खाईल,झोपड्यात,उघड्यावर तुमच्यासंग गोडीनं संसार करिणं पण त्या संसाराची गाडी हाकायल तुमचीच जोडी पायजे मलं.”आसं मनुन ईमलीन आपली नजर जमिनिकडं झुकवली.तिचं हे लाजनं पाहुण कौतीका ईरघळुनचं गेला.तो तिच्याकडं प्रेमभर्‍या नजरणं एकटक पाहु लागला.तिलं त्याचं हे टक्क लावुन पाहणं काळजात टोचु लागलं.भारावलेल्या त्या क्षणांत काळही थिजल्यासारखा वाटतं व्हता.तिनं हलकच वर नजरं केली अन परत खाली बघुन अंगठ्याच्या नखांनी जमिनिलं खरडत ‘ती’ त्यालं म्हणाली की,“पहाटं आपला बाळ्या अभ्यास करत बसला व्हता.तुम्हालं एखांदा ईंग्रजी शब्द बोलुन ईंप्रेस कराव मनुन म्या त्यालं ईचारल व्हतं की ‘एखांदी गोष्ट आपल्यासाठी आंधीच राखुन ठुनं…’ यालं ईंग्रजी शब्द कोणता हाये मुन तं त्यानं मलं ‘बुकिंग’ हेव शब्द सांगला व्हता.” तिचं हे बोलनं ऐकुन कौतिका हसायलं लागला.तसं ती लाजुन चुर चूर झाली आण कौतिकालं मनली….“आय एम सोरी…!”
“काय…?” कौतिका म्हणला.
“आय एम सोरी…!” ती परत मनली अन लाजनं पाणी पाणी व्हवुन त्याच्या कुशीत शिरली. बाहीर आभाळ भरून आलतं…. काळ्याकुट्ट ढगांनी झाकाळुन गेलतं.त्याच्याबी मनात ईमलीच्या मायेचे ढग दाटुन आलते.तो तिच्या नजरत हरवुन गेलता.ती ही त्याच्यात हरवली व्हती! तेव्हड्यात विज कडाडली अन ती अलगद त्याच्या कुशीत शिरली.

© गोडाती बबनराव काळे,लातुर
9405807079

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..