या कार्यक्रमाचा, या प्रसिद्धीचा थोडा परिणाम दिसायला लागला. मला केलेले कमी बजेटचे कार्यक्रम माझ्यासाठी खूपच मोठे होते. लोकांना माझे गाणे आवडते आहे, याची ती पावती होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे कार्यक्रम मला आयोजित करायचे नव्हते, तर त्यात मला फक्त गायचे होते. एक मोठा डोंगर चढून आल्यावर सपाट रस्त्यावर चालण्यासारखेच हे होते. फक्त एक गोष्ट हळूहळू माझ्या लक्षात येत होती की मोठा डोंगर पार करण्याचे अवघड काम केल्यानंतरच असे सपाट रस्ते मिळतात. असे काही कार्यक्रम सादर करतानाच मी पुढील तयारी सुरू केली. आत्ताचे काम अजून कठीण होते. आता मला फक्त स्वतःचा तीन तासांचा कार्यक्रम सादर करायचा होता. शंकर वैद्यांच्या मदतीने मी रसिकांना आवडणारी उत्तम मराठी गाणी शोधली. तबलावादक विश्वनाथ शिरोडकर, व्हायोलिनवादक मोहन पेंडसे, पुरुषोत्तम जोशी, हार्मोनियम वादक विवेक दातार अशी वादक मंडळी जमवली. व्ही. जे.टी.आय.पासूनचा मित्र अजित अभ्यंकर याच्याकडे वाद्यवृंद संचालनाची जबाबदारी सोपविली. भरपूर रिहल्सल्स केल्या आणि ‘आरास ही स्वरांची’
हा भावगीते-भक्तिगीते-गझल अशा विविध प्रकारच्या मराठी गाण्यांचा कार्यक्रम बसवला. ठाण्याचे गडकरी रंगायतन आणि दादर-प्रभादेवीचे रवींद्र नाट्यमंदिर अशा दोन मोठ्या सभागृहात लागोपाठ दोन दिवस कार्यक्रम करायचे मी ठरवले. यामुळे माझ्या रियाजाचा आणि गाण्याच्या ताकदीचा अंदाज मलाच येणार होता आणि जाहिरातीचा खर्च एकत्र कार्यक्रमांमुळे कमी येणार होता.
गाण्याची पहिली गुरु माझी आई होती. सुरवातीपासूनच तिचे प्रोत्साहन मला होते. ती स्वतःही चांगली गायिका होती. ऑल इंडिया रेडिओवर वनिता मंडळात तिने काही गाणी गायली होती. गाण्याचे काही कार्यक्रमही तिने केले होते. पण व्यावसायिक रंगमंचावर तीन तासांचा संपूर्ण कार्यक्रम सादर करण्याची तिची इच्छा अपूर्ण राहिली होती. या कार्यक्रमांमुळे तिची इच्छाही मी पूर्ण करणार होतो.
वाद्यवृंदामध्ये गाण्याची सवय मला नव्हती. इथे गाणे गाताना प्रत्येक ओळ तुम्ही किती वेळा गाणार? कोणती हरकत कोणत्या ओळीवर घेणार हे सर्व आधीच ठरवावे लागते. नाही तर वाद्यवृंदाचा घोटाळा होतो. याबद्दल अजित अभ्यंकरने माझी चांगली तयारी करून घेतली. गाण्याच्या अंतऱ्यामधील म्युझिक बसवून घेण्याची त्याची एक निराळीच पद्धत होती. सगळे म्युझिक तो तोंडाच्या शिट्टीने वाजवून दाखवत असे. वादक कलाकारही नवीन असल्याने त्याला ही शिट्टी बरेच वेळा वाजवावी लागे. पण तो कधी कंटाळत नसे. विवेक दातारनेही या कामात त्याला बरीच मदत केली. एकूण ह्या रिहल्सल्स आम्ही इतक्या एन्जॉय करत होतो की, कार्यक्रमाच्या तारखा जसजशा जवळ येऊ लागल्या, तसे आता लवकरच कार्यक्रम होणार, यापेक्षा या रिहल्सल्स थांबणार याचेच दुःख सगळ्यांना होत होते. मी मात्र त्यांना ग्वाही दिली, ‘बचेंगे तो और भी लडेंगे.’ माझे शब्द ईश्वराने खरे केले. आज तीस वर्षानंतर कलाकार बदलले आहेत. गाणी बदलली आहेत. रसिक प्रेक्षक बदलले आहेत. पण मी अजूनही गातो आहे आणि लढाई अजूनही सुरूच आहे.
११ डिसेंबर १९८६ गडकरी रंगायतन, ठाणे आणि १२ डिसेंबर १९८६ रवींद्र नाट्यमंदिर, दादर येथे ‘आरास ही स्वरांची’ ह्या कार्यक्रमाचे प्रयोग झाले. संगीतकार प्रभाकर जोग हे रंगायतनच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते, तर रवींद्र नाट्यमंदिराच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते, विख्यात संगीतकार दत्ता डावजेकर आणि टेलिव्हिजनच्या मराठी सुगम संगीताचे प्रमुख अनिल दिवेकर. प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करताना दत्ता डावजेकर म्हणाले, “भावगीत गायक गजानन वाटवे आणि गीतरामायण गायक सुधीर फडके यांच्या नंतर तीन तासांचा सुगम संगीताचा कार्यक्रम एकट्याने सादर करण्याची हिंमत दाखवणाऱ्या अनिरुद्धचे मी अभिनंदन करतो. मी नेहमी मनापासून बोलतो. भाषणापुरते काही वेगळे बोलायची मला सवय नाही. या मुलाचे गाणे मला खरोखरच आवडले. मी संगीत करत असलेला बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चित्रपट तयार होत आहे. या चित्रपटासाठी पार्श्वगायन करण्याची संधी मी अनिरुद्धला देईन.” डावजेकरांचे हे शब्द म्हणजे मला मिळालेला एक मोठा पुरस्कारच होता. या भाषणाला वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळाली आणि अनेक जाणकार रसिकांपर्यंत माझ्या नावाबद्दल कुतूहल वाढले. या शिवाय अजून दोन फायदे झाले. निर्माते अनिल दिवेकर यांनी टेलिव्हिजन ऑफिसमध्ये मला भेटायला बोलावले. या कार्यक्रमाला ‘मातुल्य मिल्स’चे अधिकारी आले होते. त्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आम्हाला दिला.
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply