नवीन लेखन...

वेडा घुम्या !

झोळीछाप शबनम मध्ये माझे चित्रकलेचे साहित्य, पाण्याची बाटली, स्केचिंग पॅड कोंबले. फोल्डिंग ट्रायपॉड आणि ड्रॉईंग बोर्ड बगलेत मारून मी समुद्र किनाऱ्याकडे निघालो. हे माझे नेहमीचेच रुटीन  आहे. दोन बोळ्या ओलांडल्या कि आमच्या गावचा बाजार तळ लागतो. तेथून डावीकडे वळले कि एक पायवाट थेट समुद्र किनाऱ्यावर जाते. उजवीकडची वाट मात्र  गावाला लागून असलेल्या खडकाळ डोंगर माथ्यावर जाते. डोंगर कसला तो एक भला थोरलय कातलांचा समूहाचं आहे! त्याला अगणित कपारी आहेत.

मी बाजार तळावर पोहंचलो. कालपर्यंत ‘निघाला येडा घुम्या रेघोट्या मारायला!’ अश्या दृष्टीने पहाणारे, आज मात्र मलाआश्चर्याने,कौतुकाने,आणि काहीश्या आदराने न्याहाळत होते. तुम्ही म्हणाल असा काय चमत्कार झाला कि एक दिवसात लोकांची ‘नजर ‘ बदलली? खरच काल या गावच्या लोकांनी ‘चमत्कार’ पहिला आहे! काय झालं? तेच तर तुम्हाला सांगणार आहे.
०००
लहानपणा पासून मी कमी बोलणारा आणि एक्कलकोंडा आहे. लोक माझी खिल्ली उडवतात मला पाहून खिदी -खिदी हसतात. मला वाईट वाटत. मग मी त्यांच्या पासून दूरच रहातो. माझ्या अश्या वागण्याने घरचे लोक मला ‘घुम्या’ म्हणू लागले , मग बाहेरचे पण याच नावाने बोलावू लागले! आज माझी हीच ओळख आहे. घुम्या !!

मला पहिल्या पासून ‘पाण्याचे’ खूप आकर्षण आहे. साठलेलं विहिरीच्या पाण्याची भीती वाटते ,पण नदीचं, झऱ्याचं वाहत पाणी खूप आवडत. त्यातही धबधबा, मोठा,लहान कसाही असो त्याच उंचावरून पडणाऱ्या पाण्यावरून माझी नजर हटत नाही. ते पाणी उसळत येत खाली खडकावर आदळत तेथील ते शांत होऊन किनाऱ्या पर्यंत पोहंचत तोवर माझी नजर त्या पाण्याचा प्रवासाचा पाठलाग करते. अगदी शेवटच्या तरंगा पर्यंत! तळ्यातले त्या शांत पाण्यातील लहरी तर मला संमोहित करून टाकतात! पण आई मला कधीच पाण्या जवळ जाऊ देत नसे.’पायाळू जन्मलेल्या मुलांना ,पाण्या पासून धोका असतो!’हा तिचा दृढ समाज होता ! मी पायाळू जन्मलोय! आईला माझी काळजी वाटणारच कि ! आई सोबत नदीला गेलो तरी मी दूर बसून ते वाहत पाणी आहेत असे.

मी पाचवीत होतो तेव्हा बाबांची बदली या समुद्र किनारच्या गावी झाली. तेव्हा पासून,म्हणजे बारा वर्षा पासून आम्ही येथेच आहोत. ‘आम्ही’ आता फक्त मीच आहे कारण आई बाबा शुल्लक तापीच्या  कारणाने गेले. आमच्या खेड्यात मोठे डॉक्टर, नसतात ना, म्हणून, असता आज ‘आम्हीच’ राहिलो असतो !

येथे आलो तेव्हा मी खूप आनंदी होतो. कारण रोज समुद्र बघता येणार होता. समुद्र म्हणजे पाणीच पाणी! पायाखालची मखमली वाळू!खूप मस्त वाटत वाळूत बसायला. मोरपिसा सारख्या मायाळू लहरी पासून ते हत्ती सारख्या मदमस्त लाटा! काळ्या भोर खडकाला टक्कर देणाऱ्या! पाण्याची पण कितीतरी रूप या समुद्रात पाहायला मिळतात. ‘पाण्याजवळ जायचं नाही!’हि आईची आज्ञा मी आजही पाळतो! अजून पर्यंत मी या समुद्राच्या पाण्यात पायहि ठेवलेला नाही! पण याच्याशी अन याच्या लाटांशी माझं एकअगम्य नातं निर्माण झालंय !मी दुरून पळत किनाऱ्या पर्यंत आलो कि ‘ आलास का ?ये. तुझीच वाट पहात होतो !’ असं हा समुद्र मला म्हणतोय असा भास होतो.

वय वाढू लागले तसे मी या लाटांची चित्रे काढू लागलो. रंगांची ओळख झाली, त्या लाटा सोबत त्या ज्या खडकावर आदळत त्यांना आणि आकाशातल्या उगवती मावळतीला जिवंतपणा येऊ लागला. लाटांच्या तो वेग ,आवेग चित्तारण्याच व्यसनच लागलं. मग सकाळी, सांध्याकाळी,भरतीच्या -ओहोटीच्या वेळी ,गावाशेजारच्या डोंगरावरून ,कधी तेथेच खडकावर बसून,अनेक मूड्स मध्ये त्या खडका -लाटांची चित्रे माझ्या कागदावर ,कॅनव्हासवर जन्म घेऊ लागली ! नेहमी मी माझे पेंटिंग झाले कि ते  लाटांना आणि त्या ज्यावर आपटून फुटत त्या खडकाला प्रथम दाखवत असे.

“कसे झालाय आजच पेंटिंग? तो तुमचा  खडकावर आपटतानाचा आवेग, एनर्जी ,त्वेष,पकडला गेलाय ना या चित्रात?तसेच त्या खंबीर खडकाला पण न्याय मिळालाय ना ? अन बॅकग्राऊंडचे विरळ ढगांचं गंभीर विशाल आकाश ! सगळं कस एकसंघ चित्र झालाय ! हो ना? आवडलं का तुम्हाला?”असे मी आवर्जून विचार असे . असेच एकदा विचारताना कोणी तरी ऐकलं असावं. स्वतःशीच बडबडतो म्हणनू लोकांनी मला ‘वेडा ‘ ठरवले! पण काल मात्र कमालच झाली!
०००
काल सकाळपासूनच काळ्या ढगांनी निळ्या सागरावर आक्रमण करण्याचे ठरवले असावे असे वाटत होते. समुद्रही कोपला होता. खवळून उठला होता. टी. व्ही. ,रेडिओवर, ‘अठ्ठेचाळीस तास मच्छीमार बांधवानी समुद्रात जावू नये!’ असे आवाहन करण्यात आले होते. माझ्या साठी मात्र हि विलक्षण संधी होती. काही पेन्सिल स्केचेस,कलर स्केचेस करता येणार होते. या वादळी वातावरणात सागरी लाटांचे तांडव,निसर्गा सोबत अनुभवायची आणि कागदावर घ्यायची संधी सहजासहजी मिळत नसते ,आणि अशी संधी सोडायचीही नसते! अन मी ती सोडणारही नव्हतो!वाऱ्याचा तो वेग,तो आवाज,तो पिसाट गंध हे जरी रंगात पकडता येत नसले तरी ती अनुभूती चित्रात निर्माण करता येते. या सारखं दुसरं चॅलेंज नसत!आणि त्यातून मिळणार समाधान आणि तृप्तीचा आल्हाद!हे फक्त ज्याने असे क्षण जगले असतील त्यालाच ठाऊक!

मी झटपट तयार झालो. सर्व साहित्याची शबनम खांद्याला अडकवली आणि लांब ढांगा टाकत डोंगरमाथ्याकडे कूच केली. कारण तेथून पर्वतरांगेच्या चिंचोळ्या भागातून तुफान वेगाने समुद्राचं पाणी आत घुसत,या डोंगराच्या खडकाळ पायथ्याला धडकत,आणि पुन्हा खडकाळ समुद्री पाण्यात पडत!

मी त्या डोंगर माथ्यावर पोहंचलो तेव्हा आभाळात अक्राळ-विक्राळ काळे ढग पसरले होते. वारा वेड्या सारखा घोंगावत होता. खाली लाटांचे थैमान माजले होते. नेहमी पेक्षा त्यांना आवेग भयंकर होता. नजर ठरत नव्हती!

मी वाऱ्याच्या त्या झोतानं पासून बचाव व्हावा म्हणून एका कपारीचा आसरा घेतला आणि ड्रॉईंग पॅड पेन्सिल काढली. पॅडवर पेन्सिल झरझर फिरत होती, त्या लाटांच्या वेगाने!, तरी काही तरी सुटतच होते. समाधान होईना. मग वेळ न दवडता नि ब्रश आणि कलर काढले. नवा पेपर लावला. बॅकग्राऊंडचे आभाळ आणि विक्राळ ढग ,रॅपिड स्ट्रोक देऊन काढले. मग खडक त्यावर पडलेली ती प्रकाशाची तिरीप ,उसळलेली लाट ,आपटून फुटलेल्या लाटांचे तुषार, पाणी यासाठी जाणीवपूर्वक  कागदाचा पांढरा भाग सोडत होतो. तासाभरात ते पेंटिंग म्हणा कि कलर स्केच म्हणा संपल्याचा मनाने इशारा दिला. तसा थांबलो. ज्यास्त डिटेलिंग बरेचदा चित्रातल्या गतीला मारक ठरते, तेव्हा वेळीच थांबावं लागत. आधी हातात धरून जवळून पहिले मग उठून उभा राहिलो हात लांब करून पहिले. मस्त ! झकास टेम्पो पकडला गेला होता!एकदम सजीव झाले होते पेंटिंग! थोडा मागे सरकलो.

आणि —–आणि  पायाखालचा दगड निसटला ! तसा मी एका कडेच्या कपारीपाशी बसून त्या चित्रात गुंतलो होतो. आणि व्हायचे तेच झाले. माझा तोल सुटला !  मी कड्यावरून खाली कोसळलो ! खाली खडकाळ बेड असलेला समुद्र! खवळलेला ! किमान शे-दीडशे फूटकपारी पासून खाली तो समुद्र !आणि मी वेगाने त्या रौद्र सागराकडे खेचला जात होतो! हवेत हातपाय वेडेवाकडे हालत होते! काही आधार पकडण्यासाठी आणि तोल संभाळण्या साठी !पण तेथे काहीच नव्हते. आता मी खाली असलेल्या एखाद्या खडकावर आपटणार होतो ! इतक्या उंचावरून पडल्यावर डोक्याच्या चिंधड्या उडणार होत्या! काही खरे नव्हते! मरण अटळ होते! शेवटी आई म्हणत होती तेच खरे झाले!पाण्या पासून मला भीती होती, आणि खरेच माझे मरण पाण्यातच ओढवणार होते!मी खाली पडत असताना कोणी तरी ‘पडलाSSS -पडलाSSS ‘ म्हणून बेंबीच्या देठा पासून ओरडत होते! बहुदा कोणी तरी किनाऱ्या जवळ असेल. खडकावर फुटणाऱ्या लाटांचा आणि घोगावणाऱ्या वाऱ्याचा आवाज क्षणा क्षणाला वाढत होता. हिंस्त्र ,भुकेल्या श्वापदासारखा! उसळणाऱ्या तुषारांनी माझे अंग ओले झाले होते. उघड्या डोळ्यांना तो गरगरता काळा खडक दिसू लागला ! बस चार -दोन क्षणात कपाळ मोक्ष हे स्पष्ट झाले!! मी गच्च डोळे मिटून घेतले! आता काही का होईना! एक -दोन -तीन-चार-पाच—-!हे काय मी अजून कसा आपटत नाही ?एव्हाना सगळं सम्पायल हवं होत! मला खडक, पाण्या ऐवजी असंख्य प्रेमळ हात वरचेवर झेलत असल्याचा भास होत होता! एखाद्या अजिंक्य विरास जनता जशी डोक्यावर घेते तसे वाटत होते!मी हळूच डोळे किकिले केले.  आसपास असंख्य पुरुषभर उंचीच्या लाटा होत्या. या उसळलेल्या लाटेच्या डोक्यावरून ,त्या लाटेच्या डोक्यावर मी फेकला जात होतो! अलगद! आणि कानाशी कुजबुज ऐकू येत होती. मी कानात जीव ओतून ऐकण्याचा प्रयत्न केला.
“नाही ! नाही ! कदापि! आम्ही तुला नष्ट करू शकत नाही !अरे जो आम्हाला इतक्या प्रेमाने चीत्तारतो आणि आमच्या सुंदर प्रतिकृती जगासमोर आणतो त्याला आम्ही कसे मारणार? ती कृतघ्नता होईल!”
“खरे आहे!खरे आहे!!”कोणीतरी कोरस मध्ये म्हणत होते. तेव्हड्यात माझ्या हाती काहीतरी लागले ,मी गच्च मूठ आवळली, माझ्या पाठीला ओला खडक लागला अन आत्ता पर्यंतच्या तणावामुळे माझी शुद्ध हरवली!
०००
मी शुद्धीवर आलो ! आजूबाजूचे लोक मला पालथा पडून पोटातले पाणी काढत होते. लहानपणा पासून मला पाण्या पासून दूरच ठेवल्या मुळे मला पोहता येत नाही. तरी मी खोल समुद्राच्या एका खडकावर सापडलो होतो !
“मायला, इतक्या उचून पडून पण हे येडं वाचलंच कस?खाली खडकाळ समिंदर!टाळक्याच्या कवड्या रेवड्या व्हायच्या ! बर पडलं एकीकडं अन घावंल भलतीकडंच! म्या पहिला कि पाचोळ्यागत डोंगरकड्यावरन उडालं , अन खाली पडलं! चिमत्कार -चीमत्कार म्हणत्यात त्यो ह्योच!”

आता या लोकांना मी ऐकलेली कुजबुज सांगितली तर ?तर मला ‘भूतान झपाटलंय ‘म्हणतील !त्यांचा विश्वासच बसणार नाही कि, हा दिसतोय तितकाच ‘चमत्कार ‘ नाही त्यापेक्षा हि अधिक काही तरी आहे ! पण तुमचा तरी विश्वास आहे का नाही?माझा ? माझा आहे. आणि नाही तरी कसा म्हणू? जे बेशुद्ध होताना हाती लागलंय ते अजून माझ्या जवळ आहे कि ! एक टपोरा मोती! बोरा एव्हडा आहे! त्या लाटांनी मला दिलेली भेट! दाखवू ?

— सु र कुलकर्णी 

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच, Bye.

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..