मराठीला गझलचे दालन सुरेश भटांनी दिले. त्यांचे गझल-गायनाचे २-३ कार्यक्रमही ऐकले- टिळक स्मारक मंदिराच्या ऐसपैस हॉलमध्ये ! एकदा “कलाप्रसादलाही “. भटांना भेटलो,त्यांच्या नागपूरच्या घरीही गेलो पण त्यांच्या अनुपस्थितीत ! १९९५ साली आमच्या पुण्यातल्या भेटीत मी नागपूरला एका कन्व्हेंशन साठी जाणार आहे असं त्यांना बोलून गेल्यावर ते सहज काही वस्तू माझ्या घरी नेऊन द्याल कां असं विचारते झाले. त्यांचा दौरा सांगली-कोल्हापूर भागात असल्याने ते लवकर घरी जाणार नव्हते. मी ते काम हाती घेतले आणि एनी वे “माग्रस ” च्या सुधीर देवांना भेटायचेच होते,तर लगे हात दोन साहित्यिकांच्या घरी जाता येईल हा माझा छुपा अजेंडा होता. असो. दोन्ही कामे झाली.
हिंदी (की उर्दूवाल्या) मधील गझल-किंगची ओळख वालचंदमध्ये सुधीर नेरुरकर या मित्राने साधारण ७९-८० साली करून दिली. ( भटांची ओळख त्याच सुमाराची). त्याने “रंजीस ही सही ” पहिल्यांदा ऐकवले. गझलचा कच्चा माल वेदना असते. पण या माणसाने वेदना प्राशन करून शांत,खोल ,धीम्या ” नीलकंठ ” स्वरात “रंजीसही ” सादर केली आहे. त्याच आसपास गुलाम अलीची “चुपके चुपके ” कानी आली. नंतर तलम जगजीत आला – ” तुम इतना जो मुस्कुरा ” घेऊन ! सगळे एकाच दरबारातील वारकरी.
गुलाम किंवा जगजीत चा रुबाब मेहदी हसन च्या चेहेऱ्यावर नव्हता. आयुष्याने दिलेले सगळे घाव, जगलेले संघर्ष त्याच्या ओबड-धोबड सच्च्या चेहेऱ्यावर होते.
पहिल्यांदा त्याचा गझल कार्यक्रम पाहिला/ऐकला तेव्हा हे सगळं सोसणं बाळगत विनातक्रार तो बांधिलकीने गात होता. मैफिली गणिक एखादे नवे कडवे तो “रंजीस ही सही ” मध्ये गुंफत होता आणि आम्ही वेडावत होतो.
” वैसे तो तुम्हे आते हैं, ना आने के बहाने
ऐसें ही किसी रोज, न जाने के लिए आ ! “
असलं सोप्पं जीवघेणं नवं कडवं ज्या दिवशी त्याने उच्चारलं तेव्हा आम्ही सगळे हरवून गेलो.
पाया एकच – प्रेम, विरह आणि त्यातून जन्मणारी चिरस्थायी वेदना ! वेळ मिळेल तेव्हा,शक्य होईल तेव्हा मी त्याच्या इतरही गझला ऐकल्या, पण “रंजीस ” चे स्थान आजही अव्वल. आपल्या खर्जयुक्त भेदक आवाजात त्याने गझलला वैश्विक केलं आणि सगळ्यांना झपाटून टाकलं.
त्याला शेवटचं ऐकलं /पाहिलं – झी च्या “सा रे ग म ” च्या मंचावर ! बाजूला पोरगेलासा सोनू डोळ्यात आश्चर्य ओतून ते क्षण बघतोय, प्रेक्षकांमध्ये गुलाम अली,जगजीत सिंह, उस्ताद गुलाम मुस्तफा सारे स्टेजवरचा चमत्कार अनुभवताहेत आणि हा जगण्याचे पैलतीर ओलांडलेल्या आवाजात कितव्यांदातरी त्याची सिग्नेचर गझल बनलेली “रंजीस ही सही ” सादर करतोय.
आयुष्यातील भाग्यवान क्षणांची मोजदाद करणे मी कधीच मागे टाकले आहे.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply