दरम्यान माझ्या गाण्यांच्या अनेक कॅसेटस् व सीडीज मार्केटमध्ये हिंदी भजनांच्या प्रकाशित होत होत्या. हिंदी-ऊर्दू गझलच्या आणि कॅसेटसने माझे नाव संपूर्ण भारतभर पोहोचवले होते. कार्यक्रमांच्या निमित्तानेही संपूर्ण देशभर मी फिरत होतो. या सर्वांची पोचपावती लवकरच पावली. ‘अचिव्हर ऑफ दी मिलेनियम ॲवॉर्ड १९९९’ या मानाच्या पुरस्कारासाठी एक गझल-गायक म्हणून माझी निवड झाली. हॉटेल ताज पॅलेस, नवी दिल्ली येथे या समारंभाचे शानदार आयोजन करण्यात आले होते. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अभिनेते शेखर सुमन यांच्या हस्ते हा पुरस्कार मी स्वीकारला. मुंबईला परतताना विमानात शेखर सुमन म्हणाले,
“तुम्हारी गज़लें मैं हमेशा सुनता हूँ। एक लंबी करिअर बना सकते हो। पुरस्कार मिले या ना मिले, कला से अपना ध्यान भटकने न देना।” खरोखरच एक अमोल सल्ला शेखर सुमन यांनी दिला होता. रात्री दोन वाजता विमानात मी पूर्ण जागा होतो. १३ ऑगस्ट १९८६ च्या पहिल्या कार्यक्रमापासून मी थांबलो नव्हतो. ‘मुक्काम पोस्ट एक हजार’ नंतर तर मी विश्रांतीच घेतली नव्हती. मैलांचे चारशे दगड मी कधीच पार केले होते. आता विमानातून मला मैलाचा पाचशेवा दगड व्यवस्थित दिसत होता. माझा पाचशेवा कार्यक्रम बराच जवळ आला होता. माझे मन पाचशेव्या कार्यक्रमाच्या दिशेने धावत होते आणि विमान मुंबईच्या दिशेने भरारी घेत होते. मनाचा वेग विमानापेक्षा बराच जास्त होता.
पुरस्कारासह घरी परतल्यावर अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले. बँकेतर्फेही माझा सत्कार करण्यात आला. मात्र त्यानंतरचा काळ अस्वस्थतेत जाऊ लागला. कामाचा व्याप बराच वाढला होता. त्याचे दडपण माझ्या गाण्याच्या रियाजावर आणि कार्यक्रमांवर येऊ लागले. आता पाचशे कार्यक्रम लवकरात लवकर पूर्ण करायचे होते, पण मी फक्त समोर आलेले कार्यक्रमच करू शकत होतो. नवीन संकल्पनांसाठी वेळच उरत नव्हता. त्यातच एक गझलचा मोठा कार्यक्रम मिळाला. संपूर्ण दिवस कंपनीचे काम करून फारशी तयारी न करता मी कार्यक्रमाला गेलो. रियाजाच्या पूर्व पुण्याईमुळे कार्यक्रम ठीक झाला, पण मी मात्र अत्यंत बेचैन झालो. अशी तयारी न करता आजवर मी एकही कार्यक्रम केला नव्हता. ही चक्क रसिक श्रोत्यांशी केलेली प्रतारणा होती. त्या रात्री मी झोपू शकलो नाही. रात्रभर विचार करत बसलो. काय करत होतो मी? ‘लंबी करिअर बना सकते हो, कला से अपना ध्यान कभी भटकने न देना,’ शेखर सुमन यांचे शब्द कानात घुमत होते. त्या रात्री मी कामांची दिशा बदलण्याचा निर्णय घेतला, पण नक्की काय करायचे ते सुचत नव्हते. दुसऱ्या दिवशी प्रियांकाबरोबर उपवनच्या गणेश मंदिरात दर्शनासाठी गेलो असताना, मी गाणे शिकवावे असे प्रियांकाने सुचवले. नागराज रावसरांनीही मला स्वतः ची म्युझिक अॅकॅडमी सुरू करण्याबाबत विचार करायला सांगितले होते. माझे गुरु पं. विनायकराव काळेसरही म्हणाले की, प्रथम शिष्य गुरुचे गाणे ऐकून शिकतो. नंतर तो इतर मोठ्या कलाकारांचे गाणे ऐकून शिकतो आणि त्यानंतर तो काही नवीन कलाकारांना शिकवता शिकवता शिकतो. गुरू श्रीकांतजी ठाकरे यांनीही संमती दिली. गंमत अशी की, त्याच दिवशी शेखर बापट याचा फोन आला. त्याला सुगम संगीत शिकायचे होते.
“तुम्ही गाणे शिकवलेत तर फार चांगले होईल, कारण सुगम संगीत शिकवणारे कोणीही माझ्या संपर्कात नाही,” शेखर म्हणाला.
२० ऑगस्ट १९९९ रोजी ‘स्वर-मंच म्युझिक अॅकॅडमी’ची स्थापना झाली.
१ सप्टेंबर १९९९ रोजी क्लासेस सुरूही झाले. सुरुवातीचे काही महिने घरी शिकवल्यानंतर मी भाड्याने जागा घेतली. माझे जवळचे दोन मित्र चंद्रशेखर दामले आणि अॅडव्होकेट श्रीराम देशपांडे गाणे शिकायला येऊ लागले. एप्रिल २००० पर्यंत विद्यार्थ्यांची संख्या २५च्या पुढे गेली. स्वर-मंच म्युझिक अॅकॅडमी नावारूपाला येऊ लागली. हळूहळू कंपनीचे काम कमी करून मी अॅकॅडमी आणि कार्यक्रमांसाठी जास्त वेळ देऊ लागलो. त्याचा योग्य परिणाम लवकरच दिसू लागला. लायन्स क्लब मल्टिपल अधिवेशन महाबळेश्वर, रोटरी क्लबसाठी ईदनिमित्त गझलोंकी शाम, कुसुमांजली हा कविवर्य कुसुमाग्रज यांच्या गीतांचा कार्यक्रम, इंद्रधनूतर्फे ‘रंगोत्सव २०००’ असे अनेक कार्यक्रम करत मी ४९८ कार्यक्रम पूर्ण केले आणि ५०० व्या जाहीर कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू केली. भाऊ म्हणाले होते, त्याप्रमाणे शंभराव्या आणि दोनशेव्या कार्यक्रमाच्या वेळी मला मदत करणारी काही मंडळी माझ्यासोबत नव्हती. पण हेही खरे होते की, पुढील आठ वर्षात असंख्य मदतीचे हात मी मिळवले होते. माझी पत्नी प्रियांका माझ्यामागे भक्कमपणे उभी होती. त्याचबरोबर स्वर-मंच म्युझिक अॅकॅडमीचे ताज्या दमाचे अनेक तरुण कलाकार आणि ठाणे भारत सहकारी बँकेचा मोठा कर्मचारी वर्ग अतिशय उत्साहाने या कार्यक्रमाच्या आयोजनात सामील झाला. एक भव्य कार्यक्रम ठाण्यात आयोजित करायचे आम्ही ठरवले.
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply