शम्भो महेश करुणामय शूलपाणे
गौरीपते पशुपते पशुपाशनाशिन्।
काशीपते करुणया जगदेतदेक-
स्त्वं हंसि पासि विदधासि महेश्वरोSसि।।१०।।
भगवान श्रीशंकरांच्या वैभवाचे कथन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
शम्भो – हे भगवंता भू म्हणजे जन्माला आलेल्या प्रत्येकाचे तू शम् म्हणजे कल्याण करतोस. त्यामुळे हे सर्व जग तुला शंभू म्हणते.
महेश – अन्य सर्व देवतांना ईश असे म्हणतात. या सगळ्यांपेक्षा आपण महान आहात. त्यामुळे आपल्याला महेश असे म्हणतात.
करुणामय – प्रत्येक जीवाच्या उन्नतीची क्षमता आपल्या ठिकाणी असून शरण आलेल्या प्रत्येकाला आपण कारुण्यपूर्ण रीतीने त्याच्या मुक्तीचा मार्ग दाखवीत असता.
शूलपाणे – भक्तांच्या तीन गुणांचा विलय करण्यासाठी, त्या तीन वर वार करणारा तीन टोकांचा त्रिशूल आपण धारण करता.
गौरीपते- गौरी म्हणजे देवी पार्वती आपली अर्धांगिनी आहे .
पशुपते – आपण सर्व पशु म्हणजे जीवांचे पती अर्थात पालनकर्ते आहात. पशुपाशनाशिन्- या जीवांना जखडून ठेवणाऱ्या व्याधी, दुःख, दैन्य, पिडा, आशा इ. सर्व बंधनांचा आपण विनाश करता. त्यासाठी आपल्याला पशू पाश नाशी असे म्हणतात.
काशीपते – श्रीक्षेत्र काशी ही आपली अत्यंत आवडती नगरी. आपण त्या नगरीत विविध लीला करता.
करुणया जगदेतदेक
स्त्वं हंसि पासि विदधासि – आपण भक्तांवरील करूणेने एकटेच या जगाची निर्मिती पालन आणि विनाश करता.
महेश्वरोSसि – आपण खऱ्या अर्थाने आणि महेश्वर आहात.
आपल्याला सादर वंदन असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply