महेशं सुरेशं सुरारार्तिनाशं
विभुं विश्वनाथं विभूत्यंगभूषम्।
विरूपाक्षमिन्द्वर्कवह्नित्रिनेत्रं
सदानन्दमीडे प्रभुं पंचवक्त्रम्।।२।।
भगवान शंकरांच्या पंचतुंड स्वरूपाला जगद्गुरु आद्य शंकराचार्य स्वामी महाराज वंदन करीत आहेत.
महेशं – सर्व देवतां मधील सर्व श्रेष्ठ.
सुरेशं – सुर म्हणजे देवता त्यांचे स्वामी. देवांचेही देव. पूज्यांचेही पूज्य.
सुरारार्तिनाशं – सुर म्हणजे देवता. त्यांचे आर्ती म्हणजे दुःख. कळवळून केलेली प्रार्थना म्हणजे आर्त. समोरच्याचे दुःख पाहून आपल्या मनाला होत असलेल्या वेदना म्हणजे आर्त. देवतांचे असे आर्त दूर करणारे. देवतां वरील सर्व संकटांचे निवारण करणारे.
विभुं – परम व्यापक. सर्वव्यापी.
विश्वनाथं – संपूर्ण चराचर ब्रह्मांडाचे स्वामी
विभूत्यंगभूषम् – विभूती अर्थात भस्माने ज्यांचे शरीर शोभून दिसते असे. वास्तविक सर्व संपल्या नंतर उरते ते भस्म. ते भस्म ज्यांचे आवरण आहे. त्वचेचाही बाहेरचा भाग आहे असे. अर्थात सर्व संपल्यावर ज्यांचे अस्तित्व सुरू होते असे.
विरूपाक्षम् – सामान्य माणसाला दोन डोळे असतात. त्याचे रूप तसेच असते. मात्र भगवान शंकरांना तिसरा डोळा असल्यामुळे त्यांना विशेष रूप युक्त डोळ्यांचे, या अर्थाने विरुपाक्ष म्हणतात.
इन्द्वर्कवह्नित्रिनेत्रं- चंद्र सूर्य आणि अग्नी भगवान शंकरांचे तीन नेत्र आहेत.
सदानन्दमीडे – अशा सदैव आनंदी असणाऱ्या भगवान सदानंदांचे मी ध्यान करतो.
प्रभुं पंचवक्त्रम् – हे प्रभू पाच मुखाचे आहेत. बाहेरच्या चार दिशातील सर्व ज्ञानांसह अन्तर्ज्ञानाचे प्रतीक आहे ते पाचवे मुख.
Leave a Reply