गिरीशं गणेशं गले नीलवर्णं
गवेन्द्राधिरूढ़ं गणातीतरूपम्।
भवं भास्वरं भस्मना भूषितांग
भवानीकलत्रं भजे पंचवक्त्रम्।।3।।
भगवान शंकरांच्या पंचवक्त्र स्वरूपाचे अधिक गुणवर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
गिरीशं – गिरी म्हणजे पर्वत. पर्वत हा स्थिर, अविचल असतो. तसे परमस्थिर असणारे तत्व ते गिरीश.
गणेशं – सर्व देवी देवता हेच जणू गण आहेत. त्या सगळ्यांचे अधिपती भगवान शंकर या अर्थाने गणेश आहेत .
गले नीलवर्णं – हलाहल विष प्राशन केल्यामुळे ज्यांच्या गळ्याचा रंग काळसर निळा झालेला आहे असे. वास्तविक तो रंग काळा आहे. पण भगवान शंकर इतके कर्पूरगौर आहेत की त्या तेजाने तो निळसर दिसतो.
गवेन्द्राधिरूढ़ं – गो म्हणजे गाय. तिचा पती बैल तो गव. त्या सगळ्या बैलां मधील श्रेष्ठ तो नंदी. च्या नंदीवर बसणारे ते गवेन्द्राधिरूढ़.
गणातीतरूपम्- सगळ्या गणांपेक्षा अर्थात देवतांपेक्षा अत्यधिक सुंदर रूप असणारे.
भवं – भव शब्दाचा अर्थ आहे प्रकट होणारे. जे स्वतः ज्योतिर्लिंग रूपात प्रगट होतात त्यांना भव म्हटले आहे. भव शब्द संसारासाठी वापरतात. या संसारात सर्वत्र व्यापून असणारे.
भास्वरं- भा म्हणजे तेज. तेजाने युक्त असणारे. तेज, चैतन्य, ज्ञान हेच त्यांचे स्वरूप आहे असे.
भस्मना भूषितांग – ज्यांनी भस्म आणि आपल्या अंगाला विभूषित केले आहे असे.
भवानीकलत्रं – भवानी अर्थात आई जगदंबा पार्वती. ती ज्यांची कलत्र अर्थात अर्धांगिनी आहे असे.
भजे पंचवक्त्रम् – अशा पंचतुंडधारी भगवान शंकरांचे मी भजन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply