प्रभो शूलपाणे विभो विश्वनाथ
महादेव शम्भो महेश त्रिनेत्र।
शिवाकान्त शान्त स्मरारे पुरारे
त्वदन्यो वरेण्यो न मान्यो न गण्य:।।९।।
कोणत्याही देवतेच्या स्तोत्रांना जेव्हा आपण एकत्रित पाहतो त्यावेळी आपल्याला त्यात वारंवार पुनरुक्ती होत असल्याचे लक्षात येते.
त्याच्या अनेक कारणांचा विचार करता, एक तर स्तोत्र रचयिता वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या जागी च्या स्तोत्राची रचना करीत असतो त्यामुळे पूर्वी केलेली वर्णने पुन्हा येणे स्वाभाविक असते.
दुसरी गोष्ट एकच एक सांगण्याचे महत्त्वाचे कारण एकच सांगायचे असते. उपास्य तत्व एकच आहे. त्याचे स्वरूप एकच आहे. भक्तही तोच आहे. वर्णन तेच ते येणारच.
अशाच एका श्लोकात आचार्यश्री म्हणतात,
प्रभो शूलपाणे – हे त्रिशूलधारी भगवंता.
विभो – हे परम व्यापका. भगवंताचे अस्तित्व या संपूर्ण अनंत कोटी ब्रह्मांडांना व्यापून दशांगुले म्हणजे दहा बोटे शिल्लकच असते, असे शास्त्र वर्णन करते.
विश्वनाथ – हे विश्वनाथा .
महादेव – हे देवाधिदेवा महादेवा.
शम्भो- हे सकल जीव कल्याणकारका. हे समस्त सृष्टीच्या कल्याणकारका.
महेश- हे महेश्वरा. त्रिनेत्र- हे त्रिलोचना .
शिवाकान्त – हे शिवा अर्थात देवी पार्वतीच्या कांता, प्रियतमा.
शान्त- हे परम शांत स्वरूपा.
स्मरारे – हे स्मर म्हणजे मदनाच्या विनाशका, हे मदनान्तका.
पुरारे – हे त्रिपुरासुर विनाशका.
त्वदन्यो – आपल्यापेक्षा अन्य कोणालाही,
वरेण्यो न मान्यो न गण्य:- मी वरेण्य म्हणजे श्रेष्ठ मानत नाही. मोजत नाही.
आपणच माझ्यासाठी या विश्वाची परम स त्ता आहात. मी आपल्यालाच शरण येतो. आपणच माझे एकमेव तारणहार आहात.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply