नवीन लेखन...

विडा घ्या हो नारायणा – भाग १३ (शेवटचा)

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग ९४; आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक ११
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ५०

तेरा गुणांच्या विड्याची ही शेवटची पिचकारी

विडा घ्या हो नारायणा
कृष्णा जगज्जीवना,
विनविते रखुमाई
स्वामी होईन मी कान्हा
विडा घ्या हो नारायणा ।।

शांती हे नागवेली
पाने घेवोनीया करी
मी पणा जाळूनीया
चुना लावीला वरी ।। विडा घ्या हो

वासना फोडूनीया
चूर्ण केली सुपारी
भावार्थ कापूराने
घोळीयेली निर्धारी ।। विडा

विवेक हा कात रंग
रंगी रंगला सुरंग
वैराग्य जायफळ
मेळविले सकळ ।। विडा

दया हे जायपत्री
क्षमा लवंग आणील्या
सुबुद्धी वेलदोडे
शिवरामी अर्पियेले ।।विडा

तेरा गुणांचा विडा आपल्या शरीरासाठी आहे.घेतलेला आहार सहजपणे पचून जावा यासाठी हे पान तयार करून खाल्ले जाईल, पचन पूर्ण ही होईल. पण मनोरोगांचे काय ? त्यातील आमाचे पचन कोण करणार ? आत्मरोगांचे काय त्यासाठी हे हिरवे नागवेलीचे पान काऽही उपयोगाचे नाही.

शांतीचे पान हातात घ्यावे. त्यावर अहंकाराचा चुना मळावा. म्हणजे मीपणा जाळून टाकावा. मन शांत असले तरच काही ऐकून घ्यायची तयारी असते. मनात रागाची खदखद होत असताना शांतीचे उपदेश किंवा सारासार विवेक नष्ट होतो आणि जी कृती केली जाते, त्यात आपण स्वतःच जळून भस्म होऊन जातो.

प्रत्येकाच्या मनात वासनेची कठीण सुपारी असते. ही फोडली पाहिजे. म्हणजे वासनेचा लय केला पाहिजे. नाहीतर त्याचा स्फोट कुठे कसा होईल, ते सांगता येणार नाही. ज्या प्रमाणे कापूर सहजपणे जळतो, मागे चिमूटभर राख सुद्धा ठेवत नाही, तसा आपला अहंकार आणि त्यातून जन्माला आलेली वासना जाळून नष्ट करावी. त्याचा मागमूसही राहू नये.

आता अहंकार रहीत ह्रदयरूपी पानावर विवेकाचा कात रंगत आणेल. प्रेम निर्माण होईल पण त्या प्रेमाचे रुपांतर मायेमध्ये होऊ नये यासाठी त्यावर वैराग्यरूपी जायफळाचा तुकडा घालावा. जे जीवन आहे, ते नश्वर आहे, जे आहे ते माझे नाही, यातील माझ्याबरोबर मला अंतिम समयी काहीही नेता येणार नाही. एवढे वैराग्य तरी अंगी बाणवता आले पाहिजे. पैसा हवा पण पोटापुरता. पैसा पैसा जमवताना किती कष्ट पडतात, ते मिळवण्यासाठी काय काय कष्ट पडले आहेत, हे ज्याचे त्याला माहित. आणि आजारपण आले की, आयुष्यभर पै पै करून मिळवलेला सारा पैसा काही क्षणातच हाॅस्पीटलच्या नावे होतो. सगळं चाललंय ते पोटासाठीच. आणि तेच जर बिघडणार असेल तर मिळवायचे तरी कशासाठी??” याला वैराग्य म्हणतात.

योगमय जीवन जगत असताना, जसे यम नियमांना फार महत्व आहे, तसे महत्त्व व्यावहारिक जीवनात दया आणि क्षमेला आहे. दया आणि क्षमा हे वीरालाच शोभून दिसतात. (नाहीतर मारायची हिंमत होत नाही, म्हणून)” तुला सोडून देतोय, उग्गाच फुक्कटचा मरशीला” या म्हणण्याला काही अर्थ नाही. “दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी” असे तुकाराम महाराज म्हणतात, ते काही खोटे नाही. दया हा गुण समभावनेने व्यवहारात दाखवता आला पाहिजे. स्वार्थी दयाभाव उपयोगी नाही. जसे दयेचे तसेच क्षमेचे ! क्षमेला तोच पात्र जो असहाय आणि अबल आहे. सबलांना क्षमा करण्याची गरजच काय ? स्वतः चैनीत राहून सरकारला कर्जबाजारी करणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी यासाठी केली नसावी बहुतेक! ही सुबुद्धी सरकारने दाखवली. वेलची वापरताना फक्त उपयुक्त असणाऱ्या बिया वापरायच्या असतात. फोलपटे नाहीत. हा विवेक प्रत्येकाकडे असावा. यासाठी ही वेलचीची योजना !

जीवरूपातील प्रत्येक रामाला हा शिव समजला पाहिजे.
पानाचे टोकरूपी अहंकार आणि पानाच्या शिरा आणि देठ रूपी वासना काढून टाकून, विवेक, वैराग्य, दया, क्षमा आणि शांती हे जणुकाही चुना लावलेल्या पानात कात सुपारी जायफळ लवंग आणि वेलची रूपी पंचप्राण जीवनाच्या पानात कायमचा रंग भरण्यासाठी उपयोगी ठरणारे आहेत.

जे जे देवासाठी ते ते देहासाठी,
घडल्या जीवाशिवाच्या भेटी
जीवन आणि जेवणासाठी
पान आहे प्राणासाठी
हेच शब्द आले ओठी

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021

02362-223423.
14.07.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..