वेगळे ते उत्तम लक्षण
आगळे ते विक्षिप्तपण
न्यारे ते वैरागीपण
कठीण जपणे!!
अर्थ–
परवा सोशल मीडियावर माझ्या एका मित्राने फोटो टाकला त्यात गडावर गेल्यावर साधूच्या वेशात काढलेला फोटो, शहरात वावरताना उगाच वेडेवाकडे इशारे करतानाच फोटो, डोळ्यांवर गॉगल लावून बोटं नको त्या प्रकारात दाखवतानाचा फोटो असे मिक्स फोटो होते. त्याला मराठीत आजकाल कोलाज म्हणतात. तर एकाच फोटोत इतकी रूपे दाखवली म्हणून साहजिकच मी अंगठा देऊन त्याचे अभिनंदन केले. हो आजकाल अंगठा देणे म्हणजे कौतुक करणे असाच होतो. जग बदललं आहे याचा ठोस पुरावा.
तर तो फोटो पाहताना मनात विचार आला की एक माणूस केवळ वेगवेगळ्या रंगभूशांत शिरू शकतो, फोटो काढू शकतो पण खऱ्या अर्थाने त्या भूमिका जगणं आजपर्यंत किती लोकांना शक्य झालंय? आजकाल काहीतरी वेगळे करायचे, दिसायचे यातच साऱ्या जगाचा बहुतांश वेळ खर्ची पडतो पण, खरंच वेगळं असण्यासाठी या सगळ्याची गरज आहे का? आपल्या आत दडलेला मी खरंच आधी स्वतःस समजला तर त्यातले खरे वेगळेपण आपल्याला सापडेल आणि मग जर ते योग्य प्रकारे वागण्यात आले तर ते जगाला जसेच्या तसे दिसेल. अथवा वेगळेपणा दाखवताना विक्षिप्तपणा त्यात शिरून आपलंच हसं होऊन जायला वेळ लागणार नाही.
जे पटत नाही, जमत नाही किंवा जी जागा आपल्या साठी नाही तेथून निघून जाणे सर्वात चांगले. त्यालाच अध्यात्मिक भाषेत वैराग्य म्हणतात पण ते शरीरात आणणे फार कठीण आहे कारण ते आणण्यासाठी सर्वात पहिले मारावा लागतो अहंकार, मग लोभ, द्वेष, वासना, प्रेम, सुखं, दुःखं, सोयी- सुविधा हे सगळं सोडावं लागतं आणि त्यापुढे जर फक्त माणुसकी शिल्लक राहिली तर वैराग्य जमू शकते अथवा त्याचा ढोंगी बाबा झालाच म्हणून समजा.
म्हणून वेगळेपणा, विक्षिप्तपणा, साधेपणा किंवा वैरागीपणा जपणे कठीण आहे.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply