सहा दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आत्माराम भेंडे यांनी इंडियन नॅशनल थिएटरमधून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. त्यांचा जन्म ७ मे १९२३ रोजी झाला.आपल्या सहजसुंदर अभिनयानं मराठी रंगभूमी, सिनेसृष्टी, बॉलिवूड, जाहिराती, हिंग्लिश नाटकं आणि मालिकांमधून रसिकांना निखळ आनंद देणारे, त्यांच्या मनात प्रेमाचं-आदराचं स्थान मिळवणारे आत्माराम भेंडे यांनी, ‘एक सुसंस्कृत विनोदी अभिनेते’ म्हणून स्वतःचा ठसा उमटवला होता. रसिकांना हसवण्यासाठी अंगविक्षेप किंवा कुठलाही थिल्लरपणा करायची गरज नसते, तर चेहऱ्यावरचे हावभाव, शब्दफेक आणि टायमिंगमधून उत्तम विनोदनिर्मिती करता येते, हे त्यांनी दाखवून दिलं होतं. रंगभूमी, सिनेमा, जाहिराती, मालिकांमध्ये ते अगदी लिलया वावरले होते. फक्त अभिनेते म्हणूनच नव्हे, तर दिग्दर्शक आणि निर्मात्याची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पेलली होती.
अलीकडच्या काळात त्यांच्या चरित्र भूमिका रसिकांना भावल्या. तरुणाईला तर ते आपल्या घरातले आजोबाच वाटले. ‘लगे रहो मुन्नाभाई’मध्ये त्यांनी साकरलेला ‘आत्माराम’ सगळ्यांच्याच काळजाला भिडला होता. १९६०-७० च्या दशकात लेखक बबन प्रभू आणि दिग्दर्शक आत्माराम भेंडे जोडीनं मराठी रंगभूमीला फार्सिकल नाटकांची ओळख करून दिली आणि रसिकांना अगदी खळखळून हसवलं. दिनूच्या सासूबाई राधाबाई, झोपी गेलेला जागा झाला, पिलूचं लग्न ही त्यांची नाटकं तुफान गाजली होती. मन पाखरू पाखरू, प्रिती परी तुजवरती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुज आहे तुजपाशी, पळा पळा कोण पुढे पळे अशा नाटकांमधून भेडेंनी आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली होती. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी आणि हिंग्लिश नाटकांमधूनही आत्माराम भेडेंनी दर्जेदार काम केलं होतं.
दूरदर्शनसाठी अनेक मालिकांचं दिग्दर्शन केलं होतं. जाहिरातींमध्ये अभिनय करण्याचं आव्हानही त्यांनी उतारवयात स्वीकारलं आणि तेही यशस्वी करून दाखवलं. काही वर्षांपूर्वीच्या ‘यंदा कर्तव्य आहे’ या सिनेमात त्यांनी आजोबांची छोटेखानी भूमिका एकदम चोख बजावली होती. कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भेंडेंना नाट्यदर्पण, शंकरराव घाणेकर, नाट्यभूषण, चिंतामणराव कोल्हटकर, नटसम्राट नानासाहेब फाटक, प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. १९८१ मध्ये नाशिकला झालेल्या ६१व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपदही भेंडेंनी भूषवलं होतं. भेंडे यांना २००७ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य सांस्कृतिक राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आत्माराम भेंडे यांचे ७ फेब्रुवारी २०१५ साली निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply