एक उत्तम अभिनेत्री म्हणून भारतातल्या नाट्य-चित्रपट प्रेक्षकांना रिमा यांचं नाव सुपरिचित आहे. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला.त्यांचं नाव घेताच डोळ्यांपुढे त्यांचा हसरा, गोल चेहरा, घारे डोळे आणि त्यांची अभिनयाची मोठी कारकीर्द तरळून जाते. हुजूरपागा शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. ‘हिरवा चुडा’, ‘हा माझा मार्ग एकला’ अशा चित्रपटांतून ‘बेबी नयन’ नावाने बालकलाकार म्हणून मा.रीमा लागू यांनी चित्रपट सृष्टीत सुरवात केली व लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. ७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या. १९८० सालच्या ’आक्रोश, ‘कलयुग’ या दर्जेदार चित्रपटांपासून त्यांच्या चित्रपटप्रवासाला सुरुवात झाली. ‘रिहाई’सारखी धीट, वेगळ्या वाटेवरची भूमिका असो, किंवा ‘कयामत से कयामत तक’, ‘मैंने प्यार किया’, ‘हम आप के हैं कौन’, ‘वास्तव’, ‘कल हो ना हो’ मधल्या आईच्या भूमिका, आपल्या सहजसुंदर अभिनयानं त्यांनी मोठा पडदा कायमच व्यापला आहे. त्यांनी केलेल्या नाटकातील पुरूष,सविता,घर तिघांचं हवं आत्ताचं छापाकाटा अशी बरीच नाटकं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली, काही नाटकं तितकी चालू नाही शकली. पण हे करत असताना त्या ब-याच व्यक्तिरेखा नाटकाच्या माध्यमातून जगत होत्या. मा.रीमा लागू यांचे लग्ना आधीचे नाव नयन भडभडे. नाट्य अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या रीमा लागू झाल्या. मा.रीमा लागू यांनी ‘श्रावणसरी’ या मालिकेच्या दोन कथांचे दिग्दर्शन केले होते. मा.रीमा लागू यांनी ’अनुमती’ या पुरस्कारप्राप्त चित्रपटात अतिशय महत्त्वाची भूमिका केली होती. गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटातली त्यांची भूमिका अनेक चित्रपटमहोत्सवांत नावाजली गेली आहे. तसेच ’तू तू मैं मैं’ ही मा.रीमा लागू यांची अतिशय गाजलेली आणि स्वच्छ, साधी सरळ टीव्ही मालिका सर्वांच्याच पसंतीस उतरली होती. त्या मालिकेनंतर त्यांनी ’तुझं माझं जमेना’ या मालिकेमधून काम केले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply