ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे या माहेरच्या सुलभा कामेरकर. सुलभा देशपांडे यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९३७ रोजी झाला. मुंबईतच लहानाच्या मोठय़ा झालेल्या सुलभा देशपांडे यांनी सिद्धार्थ महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षिका म्हणून छबिलदास हायस्कूलमध्ये कारकीर्दीची सरुवात करणाऱ्या सुलभाताईंचे रंगभूमीशी इतक्या सहजतने धागे जुळले की पुढे याच छबिलदास हायस्कूलमध्ये ‘अविष्कार’च्या रुपाने त्यांनी नाटय़चळवळीचे कार्य उभारले.
शांतता कोर्ट चालू आहे, या विजय तेंडुलकर यांच्या नाटकातील लीला बेणारे या शिक्षिकेची त्यांची भूमिका अतिशय गाजली. या व्यक्तिरेखेने त्यांच्या अभिनयाची ताकद पहिल्यांदा जगाला दाखवून दिली. याच नाटकावर याच नावाचा चित्रपटही आला आणि त्याचीही रसिकांनी दखल घेतली.
‘जैत रे जैत’, ‘चौकट राजा’, ‘विहीर’, ‘हापूस’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. ‘इन्व्हेस्टमेंट’ हा त्यांचा शेवटचा मराठी चित्रपट ठरला. ‘रेनेसाँ’च्या काळात समाजजीवन ढवळून निघाले असताना त्याचे परिणाम नाटय़-चित्रपट क्षेत्रावरही तितक्याच वेगाने झाले. विजय तेंडुलकरांनी मुलांसाठी नाटक लिहायला सांगितले म्हणून सुलभाताई लिहित्या झाल्या. त्यांचा रंगभूमीशी संबंध आला तेव्हा नवविचाराचे वारे ‘रंगायन’च्या निमित्ताने उभे राहिले होते. विजयाबाई मेहता यांनी स्थापन केलेल्या या ‘रंगायन’च्या प्रवाहात त्या सामील झाल्या. आणि मग त्याच ‘रंगायन’चे बोट पकडून प्रायोगिक रंगभूमीवर निष्ठेने काम करता करता तिथून बाहेर पडून १९७१ साली पती अरविंद देशपांडे यांच्याबरोबरीने त्यांनी ‘अविष्कार’ची सुरूवात केली. पहिल्यांदा छबिलदास शाळेच्या सभागृहात मुहूर्तमेढ झालेली या ‘अविष्कार’ची नाटय़चळवळ त्यांनी शेवटपर्यंत सुरूच ठेवली.
रंगभूमीपुरती आपली अभिनयकला मर्यादित न ठेवता त्याच वेळी हिंदीत जो समांतर चित्रपटांचा प्रवाह सुरू झाला होता त्यातही सुलभाताई तितक्याच उत्साहाने सामील झाल्या. ७३ हून अधिक हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. हिंदीत ‘भूमिका’, ‘अरविंद देसाई की अजब दास्ता’, ‘गमन’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है’, ‘विजेता’, ‘भीगी पलके’, ‘इजाजत’, ‘विरासत’ ‘आदमी खिलौना है’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’ हे त्यांचे चित्रपट गाजले. ‘कोंडुरा’ या हिंदी तसेच तेलुगू चित्रपटातही त्यांनी भूमिका केली होती. ‘राजा रानी को चाहीए पसीना’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला बालचित्रपट गाजला होता. ‘चौकट राजा’, ‘जैत रे जैत’, सारख्या मराठी चित्रपटांमधून त्यांचा अभिनय गाजला होता. त्यांनी अनेक हिंदी व मराठी दूरचित्रवाणी मालिकांतही काम केले होते. तीन वर्षांपूर्वी हिंदीत ‘सोनी’ वाहिनीवरील ‘केहता है दिल जी ले जरा’ या मालिकेतून त्यांनी अशीच एक छान आजी रंगवली होती. त्याहीवेळी पंच्याहत्तरी पार केलेल्या सुलभा देशपांडे यांचा उत्साह हा तरुण कलाकारांनाही लाजवणारा होता. त्यावेळी मराठी चित्रपट आणि मालिकांमधून चांगली भूमिका आपल्या वाटय़ाला येत नाही, अशी तक्रार त्यांनी केली होती. मात्र ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अस्मिता’ मालिकेमुळे त्यांची तीही इच्छा पूर्ण झाली. अनेक कलावंत त्यांनी घडविले होते. १९८७ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. डॉ. श्रीराम लागू यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या तन्वीर पुरस्काराने २०१० साली त्यांच्या रंगभूमीच्या सेवेचा गौरव करण्यात आला. ‘इंग्लिश विंग्लिश’ हा त्यांची भूमिका असलेला अखेरचा हिंदी चित्रपट ठरला.
सुलभा देशपांडे यांचे ४ जून २०१६ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply