पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे वडील कृष्णराव कोल्हापुरे हे नामांकित गायक आणि पट्टीचे बीनवादक होते. त्यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९३० रोजी पंढरपूर येथे झाला. ते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्यासमवेत बलवंत संगीत मंडळी या नाटक कंपनीचे भागीदार होते. वडिलांकडून प्राथमिक पाठ गिरवल्यावर, पंढरीनाथांनी मधुसूदन जोशी आणि खां साहेब अता हुसेन या आग्रा घराण्याच्या ज्येष्ठ गायकांकडून तालीम घेतली. बडोद्यातल्या ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्समध्ये वयाच्या अकराव्या वर्षीच त्यांनी जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर वयाच्या पंधराव्या वर्षी ते पहिल्यांदा रेडिओवर गायले. बी.आर. देवधर मास्तरांकडे शिक्षण सुरू झाल्यावर पंढरीनाथांना कुमार गंधर्व भेटले. पंढरीनाथ कोल्हापुरे मा.कुमार गंधर्वांना गुरुस्थानी मानत. कुमार गंधर्वांचे शिष्यत्व स्वीकारण्यासाठी, पंढरीनाथांनी ‘गुजराथी सनरिच सिनेमा कंपनी’तील १९४७च्या काळातील दोनशे रुपयांची नोकरी सोडली होती. इतकेच काय, प्रसंगी मो. ग. रांगणेकरांच्या ‘नाटय़निकेतन’चे बोलावणेही पंढरीनाथांनी विनम्रपणे नाकारले आणि पंढरीनाथांनी आपले सर्व जीवन ‘कुमार संगीता’ला वाहून घेण्याचे ठाम ठरविले. पंडित कुमार गंधर्वांनी देवासला वास्तव्य केल्यानंतरही, पंढरीनाथ कोल्हापुरे हे त्यांचे एकलव्य शिष्य राहिले. मा.पंढरीनाथ कोल्हापुरे ह्यांनी त्यांची “मैफलीगवई” असल्याची क्षमता सिद्ध केली. नंतर त्यांनी संगीताचे अध्यापन करण्याचे ठरवल्याने, ते याच क्षेत्रात “गुरू” होऊन राहिले. कुमाराच्या स्मरणार्थ पंढरीनाथ कोल्हापुरे यांनी फलटण गावात फलटणमध्ये संगीत महोत्सव सुरू केला. शिवांगी, पद्मिनी आणि तेजस्विनी या पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्या तीन मुली. त्यांपैकी पद्मिनी कोल्हापुरे आणि तेजस्विनी कोल्हापुरे यांनी अनेक हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. शिवांगी कोल्हापुरे या गायिका असून हिंदी चित्रपट अभिनेते शक्ती कपूर हे त्यांचे पती. पंढरीनाथ कोल्हापुरे हे अभिनेत्री श्रद्धा कपूरचे आजोबा. गायनातली कारकीर्द चालू असतानाच मुलगी पद्मिनीला बॉलीवुडमधून मोठ्या ऑफर्स आल्याने पंढरीनाथांनी मग बराच काळ मुलींच्या करिअरकडे लक्ष दिले. त्या स्थिरस्थावर झाल्यावर पंढरीनाथांनी लेखन, गायन, रुदवीणावादन आणि अध्यापन अशा चारही अंगांनी पुन्हा जोमाने संगीतसेवा सुरू केली.
पं. पंढरीनाथ यांनी तीन पुस्तकेही लिहिली असून पं.कुमार गंधर्व यांना समर्पित ‘गानयोगी शिव पुत्रा’, पत्नी निरुपमा कोल्हापुरे यांना समर्पित ‘शब्द सुरांचे बोल रुद्र वीणाचे’ आणि तिसरे पुस्तक १८ व्या शतकातील ख्याल गायकीचे निर्माते नियामत खान यांच्यावर आधारित ‘नियामत खान – सदारंग’ यामध्ये नियामत यांच्या बंदिशींचा समावेश आहे. पंढरीनाथ कोल्हापुरे यांनी १०० वर्षा पेक्षा जुनी आपल्या वडिलाची आठवण म्हणून वीणा जपून ठेवली होती. पंढरीनाथ यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ वीणा वरदायिनी ही संस्था सुरू केली होती. दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाचा पुरस्कार पंढरीनाथ कोल्हापुरे ह्यांना मिळाला होता, मुंबई महानगर पालिकेने अंधेरीतील के-पश्चिम विभागात गुलमोहर क्रॉस रोड नं. १२ या मार्गास पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे नाव दिले आहे. पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे १५ ऑगस्ट २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
पंढरीनाथ कोल्हापुरे यांची वेबसाईट. www.pandharinathkolhapure.com/
Leave a Reply