ज्या ग्वाल्हेर घराण्याची परंपरा ख्यातनाम शास्त्रीय गायक उस्ताद अब्दुल राशीद खाँ यांनी चालवली, ते घराणे म्हणजे गायन सादर करण्याची शैली ही भारतीय अभिजात संगीतातील नोंद असलेली पहिली शैली. अनेक प्रतिभावंतांनी त्या शैलीमध्ये मोलाची भर घातली, ती प्रवाही ठेवली आणि तिचे अस्तित्व कायम ठेवण्यास मदत केली.
उस्ताद अब्दुल राशिद खान यांचा जन्म १९ ऑगस्ट १९०८ रोजी झाला. अब्दुल राशीद खाँ यांना या परंपरेचा संपन्न वारसा मिळाला, तो त्यांचे वडील बडे युसूफ खाँ यांच्याकडून. बेहराम खाँ हे त्यांच्या कुटुंबातील राजगायक होते. हा वारसा नुसता जपून न ठेवता, त्यात स्वप्रतिभेने भर घालणाऱ्या अब्दुल राशीद खाँ यांनी वयाच्या शंभरीपर्यंत आपली गायनसेवा रुजू केली.
संगीत नाटक अकादमी, काशी स्वरगंगा, रस सागर या पुरस्कारांबरोबरच त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कारही मिळाला. अब्दुल राशीद खाँसाहेबांनी ‘रसन पिया’ हे नाव धारण केले. त्या नावे त्यांनी अनेक बंदिशी तयार केल्या. केवळ शब्द म्हणजे बंदिश नव्हेच. स्वराकारांसह गायले जाणारे शब्द म्हणजे बंदिश. परंपरागत बंदिशी गाणारे गायक आणि स्वत: नव्या बंदिशींची निर्मिती करणारे नायक. खाँसाहेब हे नायक होते. त्यांनी आपल्या बंदिशींमध्ये वेगळेपण जपत नवे रंग भरले. संगीत रिसर्च अॅककॅडमी या संस्थेत गुरू म्हणून काम करताना, अनेक शिष्यांमध्ये त्यांनी आपले हे वेगळेपण प्रतिबिंबितही केले. तीन सप्तकात सहज फिरणारा गळा लाभलेल्या खाँसाहेबांनी शेवटपर्यंत रियाजात सूट घेतली नाही. कारण गळा गाता ठेवण्यासाठी त्याला सतत टवटवीत ठेवणे अधिक आवश्यक असते, असे त्यांना वाटे.
केवळ पुस्तकात दिसणारे संगीतातील अनेक दिग्गज आपल्या दीर्घ जीवनात खाँसाहेबांना प्रत्यक्ष ऐकता आले. फार थोडय़ांच्या वाटय़ाला येणाऱ्या या नशिबाचा खाँसाहेबांनी पुरेपूर उपयोग करून घेतला.
अब्दुल राशीद खाँ यांचे १८ फेब्रुवारी २०१६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply