नवीन लेखन...

ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते विजय कदम

ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते विजय कदम यांचा जन्म ४ जूनला झाला.

मराठी चित्रपटसृष्टी, मालिका तसेच रंगभूमीवर छोट्या भूमिकांपासून नायकांपर्यंतच्या सर्व भूमिका लीलया पार पडणारे प्रथितयश अभिनेते म्हणजे विजय कदम. शरद तळवलकर, राजा गोसावींसारखे ज्येष्ठ विनोदी नट त्यांचे आदर्श आहेत. विजय दत्ताराम कदम हे त्यांचे पूर्ण नाव. ‘रथचक्र’, ‘टुरटूर’ यांसारख्या नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या विजय कदम यांनी १९८० च्या दशकात लहानसहान विनोदी भूमिका साकारून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. विजय कदम यांनी लहान असताना ‘राजा भिकारी माझी टोपी चोरली’ या बाल नाटकात हवालदाराची भूमिका करून रंगभूमीवर पदार्पण केले. त्या नंतर त्यांचा न चुकता दरवर्षी आंतरशालेय वैयक्तिक अभिनय व एकांकिका स्पर्धेत सहभाग असे. कलावंत म्हणून विजय कदम यांची जडणघडण झाली ती डॉ. शिरोडकर हायस्कूल मध्ये. या शाळेतील तळाशिलकर, सावंत महाजन आणि परब सर यांचे मोलाचे मार्गदर्शन त्या वेळी विजय कदम यांना मिळाले.विजय कदम यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या रूपारेल महाविद्यालयातून घेतले. ‘तत्वज्ञान’ हा गंभीर विषय घेऊन ते पदवीधर झाले. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा काम करतांना व्यावसायिक दिग्दर्शकांच्या समवेत काम करण्याची संधी तर लाभली. महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्यांची पहिला विद्यार्थी दिग्दर्शक म्हणून निवड झाली होती. त्या वेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते डेव्हीड यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केले गेले होते. विजय कदम यांचे ‘अपराध कुणाचा’ हे पहिलं व्यावसायिक कुमार नाटक होते.पुढे ‘स्वप्न गाणे संपले’ या नाटकात सतीश दुभाषी, जयराम हर्डीकर, शिवाजी साटम अशा प्रतिथयश कलावंतांसोबत काम करावयास मिळालं. ‘खंडोबाचं लगीन’ या जागरण विधी नाटकाने विजय कदम यांना नाट्य दर्पणचा ‘सर्वोत्कृष्ट लोकनाटय अभिनेता’ हा पुरस्कार मिळवून दिला. रथचक्र, घरटे आमुचे छान, वासुदेव सांगती, अशी व्यावसायिक नाटके करता करता टूरटूर या नाटकाने मात्र जबरदस्त लोकमान्यता मिळाली. तर विच्छा माझी पुरी करा या लोकनाटयाने राजमान्यता दिली. विजय कदम गेली काही वर्षं सातत्याने ‘विच्छा माझी पुरी करा’ चे प्रयोग करत आहेत. या लोकनाट्याचे १९८६ पासून आतापर्यंत विजय कदम यांनी ७५० हून जास्त प्रयोग केले आहेत.

स्वकल्पनेतून साकारलेला ‘खुमखुमी’ हा अत्यंत लोकप्रिय एकपात्री प्रयोग आहे..

ते अनेक वर्षे त्यांच्या ‘विजयश्री’ या संस्थेतर्फे ‘खुमखुमी’ हा मनोरंजनाचा अडीच तासाचा कार्यक्रम सादर करतात. या खुमखुमी च्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक संस्थांना व गरजू अपंगाना मदत केली आहे.

राजानं वाजवला बाजा, आनंदी आनंद, इरसाल कार्टी, लावू का लाथ, गोळाबेरीज, वासुदेव बळवंत फडके, रेवती, देखणी बायको नाम्याची, मेनका उर्वशी, कोकणस्थ हे त्यांचे महत्त्वाचे चित्रपट. विजय कदम यांनी ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या चित्रपटात अभिनेत्री अश्विनी भावेच्या पतीची भूमिका साकारली होती. सही रे सही, टुरटूर, पप्पा सांगा कुणाचे, विछ्या माझी पुरी करा, खुमखुमी ही देखील त्यांची गाजलेली नाटके. विजय कदम यांनी पार्टनर, गोटया दामिनी, सोंगाडया बाज्या, इंद्रधनुष्य घडलयं बिघडलयं,ती परत आलीय अशा अनेक मराठी मालिका व श्रीमान श्रीमती, मिसेस माधुरी दिक्षित, अफलातून, घर एक मंदिर या हिंदी मालिकेत अभिनय केला आहे. विजय कदम यांनी अनेक गाजलेल्या जाहिरातीत अभिनय केला आहे. विजय कदम यांच्या पत्नी ‘पद्मश्री जोशी’ या पण अभिनेत्री आहेत. विजय कदम यांच्या नाटकात काम करताना पद्मश्री यांच्याशी ओळख झाली. ‘नणंद भावजय’ या चित्रपटात पदमश्री यांनी नणंदबाईंची भूमिका साकारली आहे. ‘चंपा चमेली की जाई अबोली ‘ हे त्यांच्यावर चित्रित झालेलं गाणं विशेष गाजले होते. पोरीची धमाल बापाची कमाल, नवलकथा हे पद्मश्री यांचे इतर चित्रपट. ‘पद्मश्री कदम’ या पल्लवी जोशी आणि मास्टर अलंकार यांच्या ज्येष्ठ भगिनी होत. विजय कदम यांचा मुलगा गंधार हा एक गायक आहे. त्याने पोश्टर बॉईज आणि चित्रपटामधील गाणी गायली आहेत. विजय कदम व त्यांच्या पत्नी पद्मश्री यांची ‘विजयश्री नाट्यसंस्था’ असून, गेले अनेक वर्षे त्या माध्यमातून ते अनेक नाटकांचे प्रयोग महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरासह कतार, दोहा, दुबई, सिंगापूर आदी ठिकाणी यशस्वीपणे करत असतात. विजय कदम यांनी २५ हून जास्त नाट्य संमेलनात हजेरी आणि कार्यकर्ता या नात्याने सहभाग घेतला आहे.
विजय कदम यांनी १ मे या महाराष्ट्र दिनाच्या शुभ दिनाचं औचित्य साधून youtube वर ‘कदमखोल’ ही नवीन मालिका सुरू केली आहे. विजय कदम यांचा ‘कदम खोल’ हा youtube वरील कार्यक्रम गाजत आहे, तसेच विजय कदम यांनी ‘हलकं फुलकं’ या नावाने पुस्तक लिहिले आहे.

विजय कदम यांची वेबसाईट.

‘कदम खोल’ हा YouTube वरील कार्यक्रम.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..