जेष्ठ बासरीवादक पंडित केशव गिंडे यांचा जन्म ५ सप्टेंबर १९४२ रोजी बेळगाव येथे झाला.
पंडित केशव गिंडे मूळचे अभियंते, मुलानेही कोणती तरी कला शिकावी, असे पंडित केशव गिंडे यांच्या आईला वाटत होते. त्यातून त्यांनी सुरवातीला उभी बासरी आणून दिली. वयाच्या आठव्या वर्षी शाळेत बासरीवर पंडित केशव गिंडे यांनी “राष्ट्रगीत’ वाजविले.
१९७० साली ते पुण्यात आले. त्याच दरम्यान पुणे आकाशवाणीवर त्यांची निवड झाली होती. दरम्यानच्या काळात अरविंद गजेंद्रगडकर आणि अन्य पाच-सहा मिळून त्यांनी बासरी वादनाचा स्वतंत्र कार्यक्रम सुरू केला. त्या काळात बासरीवादनाला स्वतंत्र व्यासपीठ नव्हते. पं.पन्नालाल घोष यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पं. केशव गिंडे यांनी ‘अमूल्यज्योती’ संस्थेची स्थापना केली, व उदयोन्मुख कलावंत, नवीन शिष्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संस्थेमार्फत प्रयत्न सुरू केले. सर्व शिष्यांना संधी मिळावी, यासाठी काही राग एकत्र करून त्यांनी “वेणू वाद्यवृंदां’ची रचना केली. त्यातून “मल्हार-सागर’, ऋतुरंगमध्ये सहा ऋतूंचे बारा राग, “कल्याण-नवरंग’ (कल्याणचे नऊ प्रकार), “वेणू-नाट्यरंग’, “वेणू-अभंगरंग’, “वेणू-सारंग’, “वेणू- लंकादहन- सारंग’असे वेगवेगळे राग निर्माण केले. चुलत बंधूपासून प्रेरणा घेऊन १९७० साली घोष घराण्यानुसार खर्ज “सा’ वाजणारी बासरी तयार केली. बासरी या वाद्याच्या प्रचार आणि प्रसाराबरोबरच वादनासाठी बासरीमध्ये वेगवेगळे संशोधनात्मक प्रयोग पं. केशव गिंडे यांनी केले आहेत. १९८४ साली त्यांनी ११ छिद्रांची “केशव वेणू’ बनविली. बांबू आणि पीव्हीसी पाइपच्या जोडातून बासरी तयार करण्याचे त्यांचे संशोधन सुरू आहे.
वेगवेगळ्या रागांप्रमाणेच “अतिखर्ज’, “अनाहत वेणू’, “चैतन्य वेणू’ अशा बासऱ्यांची निर्मिती केली. त्यांनी निर्मिलेल्या ‘केशव वेणू’ची लिम्का आणि गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे. बासरी या वाद्याची शास्त्रीय माहिती देणारा पंडित केशव गिंडे यांनी ‘वेणू विज्ञान’ हा ग्रंथ लिहिला आहे. ‘वेणू विज्ञान’ हा पहिलाच ग्रंथ असून त्यामुळे बासरीवादकांची आणि रसिकांचीही मोठी सोय झाली. पंडित केशव गिंडे यांनी संगीतामध्ये त्यांनी पी.एच.डी. केलेली आहे. पंडित केशव गिंडे यांना भारत सरकारद्वारे सीनियर फेलोशिप, सहारा इंडिया यांच्याकडून जीवनगौरव पुरस्कार जगद्गुरू शंकराचार्य श्रृंगेरी महापीठ यांनी वेणू विद्वान पदवी देऊन गौरविले आहे. २०१८ साली भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार पं. केशव गिंडे यांना मिळाला आहे. ४ तपांहून अधिक काळात गिंडे यांच्याकडे हजारों विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे.
आपल्या आयुष्यात आठवणीत राहील असा प्रसंग सांगताना पंडित केशव गिंडे म्हणतात. दिल्ली येथे १९९१ मध्ये राष्ट्रीय कार्यक्रम होता. त्यात मला बासरी वाजवायची होती. माझ्यानंतर पं. भीमसेन जोशी यांचा कार्यक्रम होता. समोर प्रेक्षकांत पं. रघुनाथ प्रसन्न (पं. हरिप्रसाद चौरसियांच्या गुरुंचे गुरू) बसले होते. मला खूप दडपण आले होते. या कार्यक्रमात खर्ज, ऋषभ ते अतितार मध्यम अशी ताण घेतली. माझे वादन झाल्यावर मी बाहेर पडलो. समोर पं. भीमसेनजी होते. त्यांना अभिवादन करून जात असताना पं. रघुनाथजींची हाक आली. ते माझी वाट पाहत होते. त्यांनी मी घेतलेल्या तानेबद्दल विशेष कौतुक केले आणि माझ्याकडून पुन्हा मेघमल्हार वाजवून घेतला.
-संजीव_वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व माझ्या इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
पंडित केशव गिंडे यांचे बासरी वादन.
https://www.youtube.com/watch?v=Svs4Sm6Lj4c https://www.youtube.com/watch?v=6kO1V7X3rAg
https://www.youtube.com/watch?v=JefnHexHLMY
Leave a Reply