१९८६ सालातील गोष्ट आहे. ‘मुका घ्या मुका’ या चित्रपटाच्या डिझाईन करण्यासाठी डेक्कनवरील ‘कामाक्षी’च्या ऑफिसमधून निरोप आला. आम्ही दोघेही तिथे पोहोचलो. गेस्ट रुममध्ये गेल्यावर तिथे दादा कोंडके, विजय कोंडके आणि इतर काही मंडळी बसलेली दिसली. कामाविषयी चर्चा झाली. ही दादांची झालेली पहिली भेट!
दादांचा ‘सोंगाड्या’ भानुविलासला, ‘एकटा जीव सदाशिव’ अलका टाॅकीजला, पाहिले होते. सदाशिव पेठेत रहायला असताना भरत नाट्य मंदिरात ‘विच्छा’चे प्रयोग होत असत. मात्र मी लहान असल्यामुळे ते पहाणे झाले नाही. पडद्यावर पाहिलेल्या या कलाकाराची प्रत्यक्ष भेट होईल असे कधीच वाटले नव्हते.
‘मुका घ्या मुका’ ची पेपरची डिझाईन झाली. त्या निमित्ताने विजय कोंडके बरोबर मुंबईला त्यांच्या दादर येथील घरी जाऊन आलो. डिझाईनचे भिडे ब्लाॅक मेकर्सकडून ब्लाॅक करुन दिले.
‘पळवा पळवी’ व ‘येऊ का घरात’ या चित्रपटांनंतर पुन्हा दादांशी संपर्क आला तो ‘सासरचं धोतर’ चित्रपटाच्या प्रिमियर शो च्या ‘निमंत्रण कार्ड’च्या निमित्तानं. चित्रपट लक्ष्मी नारायण टाॅकीजला लागला होता. सर्व कलाकार व तंत्रज्ञांच्या उपस्थितीत भव्य प्रिमियर शो संपन्न झाला.
या चित्रपटापासून दादांच्या भेटी वारंवार होऊ लागल्या. ‘पळवा पळवी’ ची पोस्टर डिझाईन केली. दिवाळीचे शुभेच्छापत्र तयार केले.
दादा पुण्यात आले की, कामाक्षीच्या ऑफिसवर किंवा श्रेयस हाॅटेलवर येण्यासाठी फोन येत असे. बहुधा श्रेयसवरच ठरलेल्या रुममध्ये त्यांची भेट होई. त्यांच्याकडे गेल्यावर त्यांना नियमित भेटणारी मंडळी हमखास दिसायची. इथेच मनोहर कोलते सर भेटले. कामासंदर्भात चर्चा होत असतानाच चहा तर यायचाच, कधी एखादी डिशही मागवली जात असे.
त्यांना नवीन काही सुचलं की, ते आवर्जून सांगत असत. काही किस्से त्यांच्या तोंडून ऐकताना भरपूर करमणूक होत असे. एकदा आम्ही आमच्या वडिलांना त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो. दादांनी व त्यांनी भरपूर गप्पा मारल्या.
खडकवासला येथील ‘दादा कोंडके स्टुडिओ’चे उद्घाटनाचे निमंत्रण पत्रिका करण्याची संधी आम्हाला मिळाली. त्या उद्घाटन सोहळ्याचे फोटो मी काढले. ‘वाजवू का?’ चित्रपटाचा मुहूर्त या स्टुडिओतच केला गेला.
दादांशी भेटी होत राहिल्या. कधी मुंबईला गेल्यावर आम्ही ‘रमा निवास’ ला जात असू. दादांसमवेत जेवण होत असे. यथेच्छ गप्पांचा डाव रंगत असे. दुसऱ्या दिवशी दादा पुण्याला निघणार असतील तर मुक्काम करुन आम्ही त्यांच्या समवेत पुण्याला परतत असू.
‘वाजवू का’ चित्रपटाचे एक सत्र झाल्यावर मला कामाक्षी मधून निरोप आला. मी गेल्यावर त्या चित्रपटाचे स्थिरचित्रणाचे काम मला मिळाले. इंगवली, खडकवासला येथील स्टुडिओ व पुण्यातील काही बंगल्यामध्ये ‘वाजवू का’चे शुटींग झाले.
शुटींग दरम्यान अनेक कलाकारांच्या, तंत्रज्ञांच्या, सन्माननीय व्यक्तींच्या ओळखी झाल्या. लहानपणापासून ज्या कोल्हापूरच्या कलाकारांना पडद्यावर पहात होतो, त्यांच्याशी जवळून संपर्क आला. उषा चव्हाण, आशा पाटील, दिनकर इनामदार, अलका इनामदार, भालचंद्र कुलकर्णी भेटले. रमेश भाटकर, चेतन दळवी, आशू, वसंत शिंदे, राघवेंद्र कडकोळ, नंदिनी जोग हे तर ओळखीचेच होते.
कॅमेरामन गिरीश कर्वे, नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार, प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक अरूण कर्नाटकी यांनी मला मोलाचं सहकार्य केले.
मी इंगवलीमध्ये शुटींग करताना चार दिवसांनी पुण्यात येऊन फोटो डेव्हलप करुन, घेऊन जात असे. रोज सकाळी सर्व आवरुन दहा वाजता शुटींग सुरु होत असे. दुपारी दोन वाजता लंच ब्रेक झाल्यावर तासाभराने पुन्हा शुटींग सुरु होऊन संध्याकाळी पॅकअप होत असे. कधी रात्रीचे शुटींग असेल तर रात्रभर शुटींग चालू राही.
गाण्यांच्या शुटींगला युनिटचा उत्साहाला उधाण असे. चार महिन्यांत शुटींग पूर्ण झाले. त्यानंतर पोस्ट प्राॅडक्शन सुरू झाले. आम्ही पोस्टर डिझाईन केली. पब्लिसिटीच्या कामासाठी मी मुंबईला जात होतो.
चित्रपटाचा प्रिमियर शो पुण्यात दणक्यात झाला. प्रेस पार्टी झाली. सोलापूरमध्ये प्रेसच्या शोला मी दादांबरोबर फोटोंच्या निमित्ताने गेलो होतो. त्या पत्रकारांशी बोलताना दादांचा हजरजबाबीपणा अनुभवत होतो. प्रवासात त्यांना खेकडा भजी खाण्याची इच्छा झाली की, एखाद्या हाॅटेलपुढे गाडी उभी केली जात असे. शक्यतो तोंड झाकूनच दादा प्रवास करीत असत. कुणी ओळखलं तर गर्दी होत असे.
‘वाजवू का’ नंतर दादांनी ‘येऊ का घरात’ ची हिंदी आवृत्ती काढण्याची तयारी सुरु केली होती. त्या विषयावर आमच्या भेटी होत होत्या.
९८ च्या मार्चमधील चौदा तारखेला आम्हाला ‘दादा गेले’ असा फोन आला. दादा गेले हे मानायला मन तयार नव्हतं. दादांच्या सहवासात राहून अजून खूप काम करायचं बाकी होतं. त्यांना नवीन चित्रपट निर्मिती करायची होती. सगळंच अर्धवट सोडून दादा निघून गेले.
आमची ‘विच्छा’ अपुरीच राहिली.
स्वतः एकटेपणा सोसून दुसऱ्यांवर ‘जीव’ लावणाऱ्या दादांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन!!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१४-३-२१.
Leave a Reply