अतिशय हृदयस्पर्शी कविता आहे हि !! मी विदर्भात खूप फिरलो आहे .कित्तेक एकर जमिनीचा मालक सुद्धा वीज आणि पाणी नसल्याने विपन्न अवस्थेत आहे.शेतात विहीर आहे पण विहिरीवर बसवलेल्या पंपावर विजेची जोडणी मिळत नाही. ज्यांच्या कडे पंपाला विजेची जोडणी आहे त्यांना वीज मिळण्यासाठी रात्रभर शेतात जागे राहावे लागते.रात्री फक्त ३ तास पंप चालतो ते सुद्धा मध्य रात्रीनंतर कधीतरी . वीज चालू करण्याची वेळ अनेक वेळा बदलतात.शेतकरी हतबल झाला आहे.जमिनीचा कस चांगला आहे पण सर्व निसर्गाच्या लहरीवर आवलंबून . सर्वच राजकीय पक्षांचे हे अपयश आहे . सरकार लक्ष देत नाही.ठेकेदार ,व्यापारी लुबाडतात.बियाणे सुद्धा बोगस आणि भेसळ असलेले विकले जातेय. जे काय उत्पन्न मिळतंय त्याला भाव मिळत नाही. कधी कधी एकरी ५००० सुद्धा पदरात पडत नाहीत.अस्मानी आणि सुलतानी या दोन्ही संकटांनी विदर्भातील शेतकरी गांजला आहे.हि कविता त्याच परिस्थितीची परिणीती आहे.
जयश्री खाडीलकर पांडे यांनी फेसबुकवर २ जानेवारी २०१६ रोजी पोस्ट केलेली ही कविता वाचाच !
“चाल दोस्ता तुला “विदर्भ” दाखवतो ”
चाल दोस्ता तुला “विदर्भ” दाखवतो
काळ्या आईच्या पोटात खुडलेला कोवळा गर्भ दाखवतो
चाल दोस्ता तुला “विदर्भ” दाखवतो ।।11।।
कोरडा डोळा , कोरडी विहीर
कोरड्या राजकारण्यांचे ,कोरडे संदर्भ दाखवतो
“चाल दोस्ता तुला “विदर्भ” दाखवतो ” ।।2।।
वावरात शेतकऱ्याची सत्ता नाही,
विहिरीत पाण्याचा पत्ता नाही,
पाच वर्षा पासुन, कनेक्शन साठी केलेला अर्ज दाखवतो
“चाल दोस्ता तुला “विदर्भ” दाखवतो ” ।।3।।
या वर्षी वावरात, पिकांची शाळाच नाही डवरली,
कि निसर्गानं वावराची, फी च नाही भरली,
अनुपस्थित पिकांचा, सुनसान वर्ग दाखवतो
“चाल दोस्ता तुला “विदर्भ” दाखवतो ” ।।4।।
बिजवाई घेतली तं,खताची असते उधारी
पोराला शिकोलं तं ,पोरगी राह्यते कोरी
दुःखाचा तं उकळा रोज ,सुख वर्ज्य दाखवतो
“चाल दोस्ता तुला “विदर्भ” दाखवतो ” ।।5।।
असे उसने आयुष्य जगण्याचा, फायदा तरी काय,
एंड्रिन च्या दुकानाकडे , आपोआप वळतात मग पाय,
जहर खाण्यासाठीही ,काढलेलं कर्ज दाखवतो
चाल दोस्ता तुला “विदर्भ” दाखवतो ।।6।।
योजना नको सांत्वन नको ,नकोच करू हाऊस
देवा तू फक्त वेळेवर, पाडत जा पाऊस
माझ्या डोळ्यात लपवलेला मग, निसर्ग दाखवतो
“चाल दोस्ता तुला “विदर्भ” दाखवतो ” ।।7।।
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply