मुंबई सी एस एम टी ला लोकल प्लॅटफॉर्म वर आली होती पण अनाउन्समेंट किंवा इंडिकेटर वर कोणती लोकल आहे त्याची कुठलीच सुचना नव्हती. त्यामुळे फारशी लोकं लोकल थांबायच्या आत आणि थांबल्यावर सुद्धा चढली नाही. मला कल्याणला जायचे असल्याने मी पटकन चढलो आणि विंडो सीट मिळवली. दोन मिनिटात इंडिकेटर वर ती लोकल 6.53 ची कर्जत फास्ट असल्याचे डिस्प्ले झालं. पुढील तीस सेकंदात सगळ्या रिकाम्या सीट फुल झाल्या.
मी ज्या सीटवर बसलो होतो ती गाडी ज्या दिशेने जाणार होती त्या दिशेला तोंड करून होती , नॉर्मली प्रत्येक जण बसताना हवा लागेल किंवा बाहेरचे दिसेल म्हणून गाडी ज्या दिशेने जाईल तिकडेच तोंड राहील अशा सीट पकडतात. पण त्यादिवशी माझ्या बाजुच्या सीट नंतर भरल्या , माझ्या समोरील सीट पकडण्यासाठी तिथं झुंबड उडालेली दिसली. समोरच्या सीटवर बसणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरील भाव आणि त्यांची बॉडी लँग्वेज बघुन मी माझ्या मागे वळून बघितले. माझ्या पाठीमागे लेडीज फर्स्टचा कंपार्टमेंट होता.
विंडो सीट पकडताना एवढं लक्षात आले नव्हते अर्धा फर्स्ट क्लास आणि अर्धा सेकंड क्लास असा तो डब्बा होता. अर्ध्या फर्स्ट क्लास मध्ये पण अर्धा जेन्ट्स फर्स्ट क्लास अर्धा लेडीज फर्स्ट क्लास आणि उरलेला जनरल डब्बा.
लेडीज फर्स्ट क्लास हा जनरल कंपार्टमेंट आणि जेंट्स फर्स्ट क्लास यांच्या मधोमध पार्टिशन करून बनवलेला असतो.
मी इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये असताना डब्यांची रचना अशीच होती पण त्यावेळच्या जुन्या लोकल मध्ये सीटवर बसल्यानंतर डोक्याच्या वरच्या भागात जाळी असायची. परंतु हल्लीच्या नवीन लोकल मध्ये फक्त स्टेनलेस स्टील चे पाईप आडवे लावून पार्टीशन केलेले असते.
माझ्या कॉलेज डेज मध्ये वर जाळी असल्याने फक्त उभे राहणाऱ्या प्रवाशांना पलीकडील लेडीज फर्स्ट कंपार्टमेंट मधील स्त्रिया व मुलींचे दर्शन घडायचे, परंतु आता बसलेल्या प्रवाशांना सुद्धा पलीकडील कंपार्टमेंट मधील स्त्रियांचे व मुलींचे दर्शन घडते.
कॉलेज मध्ये असल्यापासून लेडीज फर्स्ट क्लास ला व्हिडिओ कोच म्हटले जाते असे ऐकत आलो होतो. तेव्हा बसायला जागा असूनही जाळी पलीकडील स्त्री सौंदर्य बघण्यासाठी उभे राहणारे किंवा बसूनही दोन तीन स्टेशन गेल्यावर दुसऱ्यांना बसायला देणारे प्रवाशी बघायला मिळायचे.
त्यावेळी बऱ्याच जणांच्या हातात इंग्रजी न्युज पेपर असायचे आणि ते स्टाईल मध्ये पलीकडे कोणाला तरी न्याहळत न्याहळत पेपर वाचण्याचे नाटक करायचे.
हल्ली बऱ्याच जणांच्या हातात आय फोन किंवा फोल्डिंग डिस्प्ले वाले फोन असतात. त्यांची बोटं स्क्रीन वर फिरत असतात पण नजर मात्र पलीकडे कोणावर तरी पडलेली असते.
लेडीज फर्स्ट आणि त्याला लागून असलेल्या दोन्ही बाजूच्या कंपार्टमेंट मध्ये छान छान परफ्यूम आणि डिओ चा मस्त मस्त घम घमाट दरवळत असतो.
कामावरून सुटून सुद्धा इकडल्या पुरुषांचे आणि तिकडल्या स्त्रियांचे कपडे कडक इस्त्री केल्यासारखे आणि नीटनेटके असतात.इकडचा कोणीतरी तिकडच्या कोणाला तरी बघत असतो, तिकडची कोणीतरी तिला इकडचा कोणीतरी बघतोय याच्याने सुखावत असते.
कोणाची प्रेमळ नजर , कोणाची विक्षिप्त तर कोणाची विकृत नजर इकडून तिकडे फिरत असते.
आपली छाप पाडायची हा प्रयत्न बऱ्याच जणांकडून सुरु असतो.
तिकडे कोणाचे केस वाऱ्यावर भुरभुरत असतात तर कोणाच्या बांगड्यांची किणकण होत असते, इकडे कोणाचे हेअर डाय ने रंगवलेले पण आतुन पांढरे झालेले केस असतात तर कोणा कोणाच्या डोक्यावरले केसच उडालेले असतात. कोणी वयाचे भान विसरून बघत असतो तर कोणी डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरा सारखं तर कोणी मवाल्यासारखा बिनधास्त बघत असतो.
लोकल सर्वांची असते, त्यात कोणाची मुलगी, कोणाची बहीण असते, कोणाची बायको असते तर कोणाची आई असते पण व्हिडिओ कोच मध्ये जाणून बुजून चढणाऱ्या पुरुषांसाठी पलीकडे फक्त एक बाई असते.
जनरल कंपार्टमेंट असो की जेंट्स फर्स्ट क्लास असु दे लेडीज कंपार्टमेंट कडे डोळे लावणाऱ्या लोकांचा एकच क्लास आणि तो म्हणजे थर्ड क्लास असतो.
खरं म्हणजे रेल्वे किंवा शासनाने स्त्रियांच्या सुरक्षित प्रवासासाठी बंद कंपार्टमेंट ऐवजी आरपार बघता येईल असे पार्टीशन केले आहे. बाजूच्या कंपार्टमेंट मधील पुरुष प्रवशांमुळे एकट्या दुकट्या स्त्रीला प्रवासात भिती वाटणार नाही.
परंतु व्हिडिओ कोच मधील त्या नकोशा आणि किळसवाण्या नजरांकडे दुर्लक्ष करून घर ऑफिस आणि पुन्हा घर गाठणाऱ्या लाखो महिलांना आजही ईतर शहरांच्या तुलनेत मुंबईच सगळ्यात सुरक्षीत वाटत असणार एवढं नक्की.
–प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनिअर
B.E . ( Mech), DIM, DME.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply