‘जो धारणा करतो तो धर्म’ अशी धर्माची व्याख्या केली जाते. त्यातून समाजसुधारणेसाठी, तो सुव्यवस्थित चालावा यासाठी धर्म आहे हे सूचित होते, पण कित्येक वेळा धर्मातील अनिष्ट रूढींमुळे किंवा धर्मामधील भांडणामुळे समाजाची घडी विस्कटते. त्याची प्रगती खुंटते. तेव्हा आजच्या या विज्ञानयुगात धर्म आवश्यक आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. खरं म्हणजे धर्माचा संबंध नीतीमत्तेशी असेल, माणसा-माणसांमधील संबंधाशी असेल, तर आजच काय, धर्म कधीच कालबाह्य होणार नाही. परंतु कोणत्याही धर्माचा मूळ गाभा लक्षात न घेता तो गाभा ज्यातून प्रतिकात्मकरीत्या प्रगट होतो त्या रीतीरिवाजांना अवास्तव महत्त्व दिल्याने ‘धर्म’ कालबाह्य वाटू लागते.
खरं तर धर्माविना मानव हा पशूच होय. ‘आहार, निद्रा-भय, मैथुनंच’ यापलीकडे त्याची झेप नव्हती. पुढे जसजसा समाज बनत गेला तशी नीतिनियमांची त्याला आवश्यकता भासू लागली. समाजप्रवाहाला व्यवस्थित वळणं लावण्यासाठी हे गरजेचं होतं. काही नैसर्गिक घटनांनी मानव भयचकित झाला तेव्हा त्याला आधाराची गरज भासू लागली. आणि सर्वात श्रेष्ठ अशी दिव्य चैतन्यावर, शक्तीबर श्रद्धा ठेवून त्यामध्ये त्याने आपला आधार शोधला. या चैतन्याला कुणी ‘अल्ला’ म्हणू लागले, कुणी ‘ख्रिस्त’ कुणी ‘ईश्वर’ ! पण सर्व मानवांची एक अत्यंत नैसर्गिक भूक, कुठेतरी श्रद्धा ठेवण्याची – ती धमनि भागवली. कोणत्याही गोष्टीवरची निरीश्वरवादावरचीसुद्धा दृढ श्रद्धा हाच धर्म, ज्या ज्या वेळी मानव निराधार झाला त्या त्या वेळी त्याने आधार घेतला फक्त धर्माचाच ! क्रौर्यानं थैमान घातलं तेव्हा ख्रिस्तानं प्रेमाचा संदेश दिला. हिंसेची पराकोटीची अवस्था झाली तेव्हा मुहम्मदानं शांतीची गीते गाईली. मानव किंकर्तव्यमूढ झाला, विहितकर्मे टाकून बसू लागला तेव्हा कृष्णाने कर्तव्याचा उपदेश केला. आज विज्ञानाने समाजरचनेवर फार मोठा परिणाम केला आहे. जग भौगोलिकदृष्ट्या खूप जवळ आले, पण मनानं आपण दूर गेलो आहोत. विज्ञानातून औद्योगिक क्रांती झाली. त्यातून शहरांचा विकास झाला, पण एकंदर मानवी जीवन रूक्ष आणि यांत्रिक बनलं. मार्क्सने धर्म ही ‘अफूची गोळी’ मानली आणि काही शक्तींकडून धर्मश्रद्धा उखडून टाकण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. पण यातून काय निर्माण झालं? मानव आधारहीन बनला. धर्माला दुसरा पर्याय मार्क्सवादानं दिला नाही. औद्योगिक क्रांतीमधून जी श्रमविभागणी आली त्यातून ‘परात्मता’ निर्माण झाली. म्हणजे – पूर्वी गावातला चांभार चप्पल शिवायचा तेव्हा त्याला गावातल्या अमूक व्यक्तीसाठी आपण ती शिवतोय असं वाटायचं. त्यात भावनिक गुंतवणूक असायची. निर्मितीचा आनंद हिरावून घेतला. यातून कामाबद्दलची परात्मता निर्माण होते. या सगळ्यामधून बरीच तत्त्वं, मूल्यं -हास पावली. माणसा-माणसांमधल्या संबंधातले दुवे निखळत चालले. धर्माचा सुयोग्य, पूर्वग्रहविरहित विचार करणं संपलं, तसतशा धर्मासंबंधीच्या अनेक उपसमजुती बोकाळल्या आणि काही विचारवंत धर्मच नको’ असं म्हणू लागले. पण धर्माची गरज नसणं ही अत्यंत परिपक्व आणि पूर्णत्वाची अवस्था आहे. ज्याला सृष्टीचा साक्षात्कार होतो त्याला आधारासाठी बाह्य उपचारांची गरज नसते. पण सर्वसामान्य माणसांना ही गरज असते. ती गरज धर्म पुरवते. धर्म माणसाला श्रद्धास्थान देतो आणि श्रद्धा जगण्याचं बळ देते. संकटात ताठ उभं राहण्याचं सामर्थ्य देते. ही श्रद्धा सदैव मंगलमयी असावी.
एकाची श्रद्धा दुसऱ्यावरचा अन्याय ठरू नये यासाठी धर्मश्रद्धांकडे डोळसपणे पाहण्याची, त्यातील अनिष्ट गोष्टी काढून, करुणा, प्रेम, शांती, मानवता यांचा पाया त्यांना देण्याची गरज आहे, धर्मश्रद्धा धर्मच उखडून टाकण्यासाठी नव्हे.
श्रद्धा हीदेखील मानवी मनाची गरज आहे. रशियामध्ये धर्मापासून लोकांना मुद्दाम दूर ठेवले. पण मनातून लोक चर्चमध्ये जाण्यासाठी उत्सुक होते. पोलंडमधला हिंदू लढाही लोकांची श्रद्धा हिरावून घेतल्यामुळेच झाला. विवेकानंद म्हणत माणसाला कोणतीही गोष्ट धर्माच्या माध्यमातून सांगितली तर ती त्याला चटकन समजते. कडुनिंबाचा पाला रक्ताच्या शुद्धीकरणासाठी चांगला असतो असं म्हटलं तरी तो मुद्दाम खात नाही. पण वर्षप्रतिपदेला मात्र धार्मिक भावनेनं कडुनिंब खाल्ला जातो. पोथ्यापुराणात धर्म शोधत बसलेल्या माणसांना राष्ट्रासाठी तेजस्वीपणे काम करायला सांगण्यासाठी टिळकांनी गीतेतल्या कर्मसिद्धांताचाच आधार घेतला होता हे विसरून चालणार नाही.
रूढी मुख्य म्हणजे नीट अर्थ समजून घेतला आणि कालौघात आलेल्या चुकीच्या दूर केल्या तर आपला धर्म विज्ञानाच्या आड कधीही येत नाही हेच लक्षात येईल. फक्त त्यासाठी धर्माचा योग्य अर्थ सांगण्याची गरज आहे. नेमकं तेच आज होत नाही. शरीराला जखम झाली तर ती स्वच्छ धुऊन तिचं ड्रेसिंग केलं पाहिजे. उलट तिला हातच लावला नाही तर ती चिघळत जाईल. सर्वधर्मसमभाव स्वीकारलेल्या आपल्या राष्ट्रात आज नेमकं हेच घडतंय. धर्माविषयी कसलेही उदगार काढायला लोक घाबरतात आणि नेमकी समाजाची ती जखम स्पर्शही न करता चिघळत ठेवतात. याउलट धर्माचं योग्य शिक्षण मिळालं तर रूढी आणि धर्म यातला फरक लोकांना समजेल. जे अयोग्य आहे ते नष्ट होईल लोक नष्ट करतील आणि सुयोग्य श्रद्धास्थानं लाभल्यामुळे मानवी मनाची बैठक स्थिर, खंबीर होईल. सर्व धर्मांमधील मुलभूत एकता लक्षात आली तर धार्मिक दंगली होणार नाहीत.
पूजापद्धती, वेशभूषा असल्या बाह्मोपचारांच्या पलीकडचा धर्म पाहायला माणसांना शिकवलं तर धर्मच माणसाला तारू शकेल. जगाचं आध्यात्मिक नेतृत्व करत आलेल्या भारतीय संस्कृतीला हे अशक्य आहे काय?
Leave a Reply