`आम्ही साहित्यिक’ या फेसबुकवरील लोकप्रिय ग्रुपवरील कवी योगेश उगले यांची माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्यावरील ही कविता खास वाचकदिनाच्या निमित्ताने…
कधी अंतराळातूनी तारकांच्या
कुळातील तारा अकस्मात येतो
आणि अंध:कारातल्या भारताच्या
नव्या वैभवाचा आविष्कार होतो
जशी ‘पृथ्वी’भारातली क्षेपणास्त्रे
‘आकाशा’त कोरुन ये शक्तीमाला
तशी ‘अग्नि’दिव्यातल्या पर्वकाळी
कलामांसवे देश हा सिध्द झाला
जिथे चालली नित्य तुझी पावले
तिथे निर्मितीची उभी ज्ञानदेवी
रुजे ध्येय राष्ट्रातल्या उन्नतीचे
तुझ्या स्वप्नशिल्पांतली एक ओवी
असे देशकार्याप्रती त्याग मोठा
किती प्रेम विज्ञान-भाषेवरी
जिथे उत्तमाचे आराधन होई
तिथे स्पर्श आहे असा ईश्वरी
अणु’शक्ति’साठी नव्या योजनेने
नवा ध्यास घेऊन उभे ठाकले
समर्थ, सशक्त असा देश व्हावा
म्हणोनि आजन्म प्रबोधन केले
अशी थोर कर्मातली भव्यता ही
उभे राष्ट्र आहे ऋणी सर्वदा
अशी वाट दावी नवी ध्येयगामी
नव्या साधकांना तुझी संपदा
© योगेश उगले
`आम्ही साहित्यिक’ या फेसबुकवरील लोकप्रिय ग्रुपवरील कवी
मराठी साहित्यसृष्टीचे आभार.. माझ्यासारख्या सामान्य कवीची कविता प्रकाशित केल्याबद्दल..! आनंद जाहला ?