नवीन लेखन...

विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवत् गीता : अध्याय २, श्लोक २२.

रविवार १८ मार्च २०१२.

विज्ञान आणि अध्यात्म
:::: विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवत् गीता :::: अध्याय २ :::: श्लोक २२.
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृण्हाति नरोपराणि |
तथा शरीराणि विहाय

जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही || २:२२||
शब्दांचे अर्थ :: वासांसि : वस्त्रे, जीर्णानि : जुनी झालेली, फाटलेली, निरुपयोगी, विहाय : टाकून, गृण्हाति : ग्रहण करतो, घेतो, अपराणि : दुसरी, अन्यानि : निराळी, संयाति : खचित धारण करतो, देही : देहधारी जीवात्मा.
श्लोकाचा अर्थ :: ज्या प्रमाणे मनुष्य जुन्या, जीर्ण झालेल्या, निरुपयोगी वस्त्रांचा त्याग करून नवीन निराळी वस्त्रे धारण करतो त्याचप्रमाणे मनुष्याचा (सजीवाचा) आत्माही जीर्ण म्हणजे वृध्द झालेल्या शरीराला सोडून दुसरे नवीन आणि निराळे शरीर खचित धारण करतो.
निरीक्षणे, अनुभूती आणि अध्यात्मिक स्पष्टीकरणे :::
महर्षि व्यासांनी भगवत् गीता लिहिली त्या घटनेला सुमारे ५ हजार वर्षे झाली आहेत. या ५ हजारवर्षात, भारतीयांच्या मानसिकतेत आणि जीवनशैलीत बरीच उत्क्रांती झाली आहे. विज्ञानामुळे बर्‍याच अध्यात्मिक संकल्पनांना वास्तववादी स्पष्टीकरणे दिली गेली आहेत. त्या काळी, ऋषिमुनींना आणि विचारवंतांना आलेले अनुभव, त्यांनी केलेली निरीक्षणे, आणि त्यांच्या बुध्दीकुवतीनुसार त्यांनी दिलेली स्पष्टीकरणे आजही धार्मिक साहित्याच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोचलेली आहेत. त्यांनी जे तत्वज्ञान सांगितले, त्याचा मूळ उद्देश म्हणजे, प्रजा ज्ञानी व्हावी, नीतिमान व्हावी, सुसंस्कृत व्हावी आणि समाजाला स्थिरता लाभावी हाच असावा. त्यासाठी ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म, जन्ममृत्यूचे फेरे, मुक्ती, मोक्ष, पाप, पुण्य, कर्मकांडे इत्यादी संकल्पना फारच महत्वाच्या ठरल्या.
चेतनामय, सृजनशील शरीरच दुसर्‍या चेतनामय सृजनशील शरीराला (प्राणी, वनस्पती) जन्म देऊ शकते, प्राण्यांच्या
आणि वनस्पतींच्या प्रजाती (योनी) निर्माण होतात आणि प्रत्येक प्रजातीतील चेतनामय शरीरांची संख्या वाढतेच आहे इत्यादी निरीक्षणे त्या काळी केली गेली आणि तेच अनुभव आजही आपल्याला येत आहेत.
चेतनामय, स्वयंचलित, वाढणारा, प्रजोत्पादन करू शकणारा असा त्याच प्रजातीतला गर्भ, नरमादीच्या समागमानंतर मादीच्या शरीरात निर्माण होतो या निरीक्षणाचा अन्वयार्थ म्हणजे, ही चेतना, गर्भाच्या शरीरात, कुणीतरी संक्रमित करीत असला पाहिजे, ती चेतना जोपर्यंत त्या शरीरात आहे तोपर्यंत ते शरीर जिवंत असते आणि ती चेतना निघून गेली की ते शरीर अचेतन होऊन नाश पावते या संकल्पनेचा उदय. चेतना घालणारा तो परमात्मा आणि ती चेतना म्हणजे त्या शरीराचा आत्मा. पुनरुत्पादनाची ही क्रिया सतत चालू असते, म्हणजे, एका शरीरातून निघून गेलेली ती दिव्य चेतना दुसर्‍या शरीरात प्रवेश करीत असली पाहिजे या कल्पनेतून, आत्मा जन्ममृत्यूच्या फेर्‍यात अडकला आहे, बंधनात अडकला आहे, त्याला मुक्ती मिळाली पाहिजे हा विचार दृढ झाला. ज्या शरीरांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्या शरीरातील आत्म्यांना दुसर्‍या शरीरात प्रवेश मिळत नाही, असे अतृप्त आत्मे पिशाच्ययोनीत जातात आणि अवकाशात भटकत राहतात. हे सर्व दिव्य विचार सामावणारा, भगवत् गीतेतला हा श्लोक आहे.
गीतेच्या एका अधिकृत पुस्तकात, या श्लोकावर केलेले भाष्य….
अणुरूप आत्म्याकडून होणारे शरीराचे स्थानांतर हे एक सर्वमान्य सत्य आहे. आधुनिक वैज्ञानिकांचा आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही. तसेच त्यांना ह्रदयातून उगम पावणार्‍या शक्तीचे स्पष्टीकरणही देता येत नाही. अणुरूप जीवात्म्याचे दुसर्‍या शरीरात होणारे संक्रमण हे परमात्म्याच्या कृपेमुळे शक्य होते. सजीवांचा आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. परमात्म्याचे अगणित अंश होऊ शकतात म्हणूनच या पृथ्वीवर सजीवांची संख्या वाढते आहे.
विज्ञानीय दृष्टीकोनातून केलेली निरीक्षणे आणि वारवार पडताळून अनुभवता येतील अशी विज्ञानीय स्पष्टीकरणे, अन्वयार्थ :::
आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतानुसार, सजीवांच्या शरीरातील आनुवंशिक तत्व (जेनेटिक मटेरियल) हाच आत्मा असतो. त्यामुळे तो अणूरूपच आहे. या विश्वाची निर्मिती हे वास्तव आहे. या निर्मितीस जे काही कारणीभूत आहे तोच ईश्वर असे वैज्ञानिक मानतात. पण तो, अध्यात्मात वर्णन केल्यानुसार नाही असेही मानतात. कार्बन, हैड्रोजन, ऑक्सीजन, नायट्रोजन, कल़्शियम, फॉस्फोरस वगैरे सारख्या अचेतन मूलद्रव्यांपासून, सजीवांचे चेतनामय शरीर ज्या कारणामुळे निर्माण होते तो आत्मा असे वैज्ञानिक मानतात. आनुवंशिक तत्व हे आत्म्याचे वास्तव स्वरूप आहे.
जर मानवाचा किंवा सजीवाचा एक आत्मा एका शरीराला सोडून दुसर्‍या एकाच शरीरात प्रवेश करीत असता तर या पृथ्वीवरील सजीवांची आणि मानवांची संख्या वाढली नसती, स्थिर राहिली असती, कायम राहिली असती. पण तसे झाले नाही. प्रजातींची आणि प्रत्येक प्रजातीतील सजीवांची संख्या वाढतेच आहे. मानव, प्राणी, पक्षी, जलचर, कीटक, सर्व प्रकारच्या वनस्पती यांनाही आत्मा आहे. वासांसि जीर्णानि……. हा श्लोक त्यांनाही लागू पडायला हवा.
मरण हे फक्त म्हातार्‍या सजीवांनाच येते असे नाही. बाल्यावस्थेत आणि तरुणपणीही सजीव मरतात, त्यांची शरीरे जीर्ण झालेली नसतात. काही बालके तर मृतावस्थेतच जन्मतात. अपघातात आणि युद्धात अल्पवयीन मृत्यू होतात, त्यांची शरीरे जीर्ण झालेली नसतात. नैसर्गिक आपत्ति, म्हणजे भूकंप, वादळे, सुनामी, महापूर वगैरेमुळेही सजीवांचे मरण ओढवते. युध्दे, लढाया, दंगली वगैरेमुळे कित्येक माणसे मारली जातात. जीवो जीवस्य जीवनम् या न्यायानुसार, दररोज लाखो सजीवाची शरीरे अन्न म्हणून खाल्ली जातात. अगदी क्षुल्लक कारणावरून खून केले जातात तर जीवाला कंटाळून कित्येक माणसे आत्महत्या करतात.
या

सर्व मरणांनंतर, अचेतन झालेल्या शरीरांतून निघालेले आत्मे दुसर्‍या शरीरात प्रवेश करून पुनर्जन्म घेतात का? विचार करण्याची बाब आहे. आत्म्याच्या आनुवंशिक तत्व शिध्दांतानुसार या शरीरातील आनुवंशिकतत्व नाश पावते, पृथ्वीच्या पर्यावरणात मिसळते.
आता जैवविज्ञानाने सिद्ध केले आहे की सजीवांच्या शरीरातील जिवंत पेशींची संख्या, त्यांचे विभाजन होऊन वाढते. जुनी आणि नवी पेशी दोन्हीही जिवंत पेशी असतात. पेशींच्या केंद्रकात आनुवंशिक तत्व सामावलेले असते. पेशींची संख्या वाढते त्या बरोबरच केन्द्रकांची म्हणजे आनुवंशिक तत्वातील गुणसूत्रे, जनुके, डी एन ए वगैरेंचीही संख्या वाढते.
सजीवाच्या पेशीच्या वरील चित्रात, केंद्रकाची (Nucleus) जागा दाखविली आहे. तेथेच आनुवंशिक तत्व असते. तोच शरीरातील आत्मा. पेशीतील मायटोकॉनड्रिया हा घटक म्हणजे पेशीचे उर्जास्थान, पर्यायाने सचेतन शरीराचेही उर्जास्थान. येथेच, रक्तातील ग्लुकोज आणि ऑक्सीजन यांचा संयोग होऊन उर्जा निर्माण होते. येथून शरीराल उर्जा मिळेनाशी झाली म्हणजे पेशी मरू लागतात. खूप पेशी मेल्या तर शरीराची इंद्रिये आणि अवयव अकार्यक्षम होतात आणि शेवटी शरीर अचेतन होते, मरते.
मातापित्यांच्या दोन शरीरात दोन, थोड्या फरकाने निराळी असलेली, आनुवंशिक तत्वे आणि आनुवंशिक आज्ञावल्याही असतात. त्यांना चार मुले झाली की एकूण सहा शरीरे होतात आणि त्या सहाही शरीरात त्या कुलातील आनुवंशिक तत्वे आणि आनुवंशिक आज्ञावल्या असतात. आनुवंशिक तत्व आणि आनुवंशिक आज्ञावल्या यांच्यामुळेच सजीवांच्या शरीराचे, मरेपर्यंतचे सर्व व्यवहार सुरळीतपणे काळू राहतात. पृथ्वीवरील सर्व सजीवांना हा नियम लागू आहे.
आनुवंशिक तत्व, एका जिवंत शरीरातून दुसर्‍या जिवंत शरीरात प्रवेश करते, मेलेल्या शरीरातून जिवंत शरीरात नाही. मातापित्याची (नरमादीची) एक जोडी, त्यांच्यातील आनुवंशिक तत्व, अपत्यांच्या स्वरूपातील अनेक शरीरात संक्रमित करू शकते. आनुवंशिक तत्वच जन्म घेते, ते अपत्यांच्या स्वरूपात पुढच्या पिढीत संक्रमित झाले म्हणजे त्या आनुवंशिक तत्वाचाच पुनर्जन्म होत असतो.
आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिद्धांतानुसार, जिवंत शरीरातील आनुवंशिक तत्व आणि आनुवंशिक आज्ञावल्या म्हणजेच त्या शरीराचा आत्मा असल्यामुळे, पृथ्वीवरील सजीवांची संख्या का वाढते याचे स्पष्टीकरण विज्ञानीय दृष्टीकोनातून देता येते. वर उद्भवलेल्या सर्व शंकांचेही निरसन होते.

— गजानन वामनाचार्य

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..