पूर्वीच्या काळात प्रत्येकाच्या घरात हक्काने आढळणारी गोष्ट म्हणजे विडाच्या पानाचा डब्बा. ज्यामध्ये ताजी विड्याची पाने, चुना, कात, सुपारी आणि अडकित्ता ठेवलेला असायचा. रोजच्या जेवणानंतर किंवा एखाद्या मेजवानीनंतर घरातील सर्व जण मिळून विड्याचे पान खायचे. घरी पाहुणे आल्यावर त्याच्यापुढे प्रेमाने विडाच्या पानाचा डब्बा पुढे केला जायचा. काळाच्या ओघात जुन्या मंडळीबरोबर विडाच्या पानाचा डब्बाही आपल्या घरातून गायब झालेला आहे. आजही विड्याची पाने आपल्याकडे आवडीने खाल्ली जातात. एखाद्या लग्नसमारंभात किंवा उपहारगृहात आपल्याला विविध प्रकारची सजवलेली विड्याची पाने आवर्जून दिसतात. विड्याची पाने आणि त्यामध्ये असलेल्या इतर पदार्थांमुळे शरीरात अन्नाचे पचन नीट होण्यास मदत होते. म्हणूनच जेवण झाल्यानंतर विडा खाण्याची परंपरा पूर्वीपासून आपल्याकडे आहे. हिरव्या नागवेलीच्या पानात अर्थात विड्याच्या पानात अनेक औषधी गुण असतात. त्यामुळेच जेवणानंतर पान खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
धार्मिक कार्यांमध्ये तसेच होम – हवन करतानाही विड्याच्या पानाचा उपयोग होतो. कुठल्याही शुभकार्यात विड्याच्या पानांचा पहिला मान असतो. अशाप्रकारे विड्याच्या पानांचे आपल्या संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आता आपण ह्या विड्याच्या पानांचे काही महत्त्वाचे उपयोग बघुयात:
१) विड्याच्या पानांमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल तत्व असल्यामुळे विड्याच्या पानाच्या वापराने चेहऱ्यावरील मुरुमे तसेच पुटकुळ्या कमी होण्यास मदत होते. विड्याची थोडी पाने पाण्यामध्ये उकळून घेऊन हे पाणी थंड झाले की, ह्या पाण्याने चेहरा धुतल्यास मुरुमे तसेच पुटकुळ्या कमी होण्यास मदत होते.
२) विड्याच्या पानाची पेस्ट करून त्यात थोडी हळद घालून ती पेस्ट चेहऱ्यावर लावावी आणि थोड्या वेळानी चेहरा धुवावा. त्यांनी चेहऱ्याची त्वचा उजळण्यास मदत होते.
३) हाताला, पायाला किंवा अंगाला खाज सुटत असेल, तर विड्याच्या पानाच्या रसाने खाज कमी होण्यास मदत होते.
४) उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लोकांना घामोळ्याचा त्रास सहन करावा लागतो. अशावेळी आंघोळीच्या पाण्यामध्ये विड्याच्या पानाचा रस घालून त्या पाण्याने आंघोळ केल्यास घामामुळे किंवा अन्य काही कारणाने शरीराला येत असलेली दुर्गंधी निघून जाण्यास मदत होते. तसेच घामोळ्याचा त्रासही कमी होण्यास मदत होते.
५) पिण्याच्या पाण्यामध्ये विड्याची पाने टाकून ते पाणी उकळून घेऊन प्यायल्यास शरीरातील विषारी द्रवे शरीराबाहेर टाकण्यास मदत होते.
६) शरीरावर मस किंवा चामखीळ असतील तर विड्याची पाने वाटून ती पेस्ट त्याठिकाणी लावावी. नियमितपणे काही दिवस ही पेस्ट लावत राहिल्याने मस किंवा चामखीळ सुकून जाऊन नाहीसे होण्यास मदत होते.
७) सर्दी झाली असल्यास विड्याच्या पानात लवंग घेऊन खाण्याने सर्दी कमी होण्यास मदत होते.
८) खोकला दूर करण्यासाठी विड्याचे पान ओव्यासोबत चावून खाल्यास खोकला कमी होण्यास मदत होते.
९) डोकेदुखीचा त्रास असल्यास विड्याच्या पानाची पेस्ट डोक्यावर लावल्यास डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.
१०) सूज आलेल्या ठिकाणी किंवा मुरगळलेल्या जागी, विड्याचे पान गरम करुन बांधल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.
११) विड्याच्या पानाच्या रसामध्ये मध मिसळून पिण्यामुळे शरीरातील अशक्तपणा कमी होण्यास मदत होते.
१२) विड्याचे पान चावून खाल्यामुळे त्यापासून बनलेल्या लाळेने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, म्हणूनच आपल्याकडे जेवणानंतर पान खाण्याची परंपरा आहे.
१३) विड्याच्या पानात असलेले अॅस्कॉर्बिक अॅसिड या अँटिऑक्सिडंट घटकामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी होण्यास मदत होते आणि तोंडाच्या कॅन्सरपासूनही वाचता येते.
१४) कंबर दुखत असल्यास विड्याच्या पानांनी मसाज केल्यास कंबरेला आराम मिळतो.
तर अशा ह्या जिभेची चव वाढवणाऱ्या, विविध गुणांनी युक्त विड्याच्या पानाचा आपल्या रोजच्या जीवनात योग्य प्रमाणात वापर करणे गरजेचे आहे.
— संकेत प्रसादे
Leave a Reply