नवीन लेखन...

विकल भैरवी

“झिमझिम पाऊस,आभाळ भरून.

शिरशिर गारवा, वाराभरुन.
कातरवेळा, अंधारभरून.
मिणमिण दिवे, सांवल्याभरून.
मुकें घर. दालन दालन.
मुकें तन. मुकें मन.
मुकें काहूर. इथून-तिथून.
मुका ताण पदर भरून.
कवियत्री इंदिरा संत यांच्या “पदर भरून” या कवितेच्या या ओळी, भैरवी रागीणीच्या भावछटा नेमक्या दर्शवून देतात. या रागिणीचे सूर असेच आहेत, पहिल्या सुरांपासून विरहाची तसेच विकल भावनेची आर्तता दर्शवतात. मनात एकप्रकारची पोकळी निर्माण करतात आणि रितेपण दाखवतात. अर्थात हे झाले भैरवी रागिणीचे एक भावविश्व. भारतीय रागदारी संगीत हे बहुतेकवेळा भावनांच्या वेगवेगळ्या छटा दर्शवून रसिकांना चकित करण्याची किमया करते आणि याला ही रागिणी देखील अपवाद नाही इथे ज्या प्रमाणात विरही छ्टा आहेत, त्याचबरोबर भजनातून येणारा समर्पित भाव देखील विपुल प्रमाणात आढळतो.
उस्ताद अली अकबर खान साहेब म्हणजे सरोद वादनातील अपूर्व नाव. द्रुत लय चालू असताना, मध्येच खंडित तान घेऊन, त्यातून “मिंड” काढायचे त्यांचे कौशल्य केवळ असामान्य असेच म्हणायला हवे. वादन करताना, प्रत्येक सूर आणि त्याचे सादरीकारण, यात सतत वैविध्य आणण्याचे त्यांचे कसब लाजवाब म्हणायला लागेल. वास्तविक सरोद म्हणजे तंतुवाद्य, तेंव्हा त्यातून निघणारे स्वर हे नेहमीच “तुटक” असणार पण तरीही तारेची खेच आणि तारेवर दाब देऊन, निर्मिलेली रचना रसिकांना नेहमीच चकित करून सोडते. भैरवी सारखी अत्यंत लवचिक रागिणी सादर करताना,  “सा ग रे ग म” ही स्वरसंहती  ऐकण्यासारखी आहे. “गंधार” आणि “मध्यम” घेताना, ज्याप्रकारे “षडज” स्वरावर “उतरतात” हे ऐकणे अतिशय विलोभनीय आहे.यात आणखी एक मजेशीर बाब आढळते. सरोदवर भैरवीचे सूर ऐकायला मिळत असताना, एकदम “सिंध भैरवी”चे सूर देखील ऐकायला मिळतात. वास्तविक, “सिंध भैरवी” ही रागिणी “भैरवी” कुटुंबातील सदस्य पण, फरक इतकाच आहे, “सिंध भैरवी” ही लोकसंगीताच्या आधारे सादर केली जात असल्याने, त्यात सुरांना बरेच स्वातंत्र्य मिळते आणि रचनेची शोभा अधिक खुलून येते.
माडगूळकरानी “गीत रामायण” लिहून, गेयताबद्ध कवितेचा एक मानदंड निर्माण केला असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. गीत रामायणातील कुठलेही गीत, ही आधी अप्रतिम कविता आहे, याचे आपल्याला भान येऊ शकते. गाण्यासाठी लेखन करताना, आपली शैली चित्रदर्शी असावी म्हणजे सगळा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर विनासायास येऊ शकतो आणि ही अट, गीत रामायणात पूर्णांशाने झालेली दिसते. भारतीय समाजाच्या मानसिकतेचे खरे प्रतिबिंब या काव्यातून दिसून येते. या गीत रामायणाचा शेवट करताना, माडगूळकरांनी,
रघुराजाच्या नगरी जाऊन,
गा बाळांनो, श्रीरामायण.
अशा ओळीने केला आहे. प्रसंग असा – रामाचे चरित्र सांगून पूर्ण झाले असताना, आता चरित्राची “सांगता” करण्यासाठी योजलेले हे गीत. एका अर्थाने अतिशय प्रभावी समारोप. एक मोठा कालखंड संपल्याची इतिश्री पण त्याचबरोबर योजलेले काम यशस्वीपणे पूर्ण केल्याचा आनंद, हे दोन्ही भाव या गाण्यातून व्यक्त होतात.
अर्थात, सुधीर फडक्यांनी अत्यंत समयोचित अशी भैरवी रागिणी इथे योजलेली आहे. “रघुराजाच्या नगरी जाऊन” या पहिल्याच ओळीत आपल्याला भैरवी दिसते आणि पुढे संपूर्ण रचना याच रागीणीच्या छायेत वावरते. संगीत रचना अतिशय द्रुत लयीत आहे आणि याचे मुख्य कारण, एका भव्य समारंभाचा अंत देखील तितक्याच सहजतेने आणि कायमस्वरूपी रहावा, हीच इच्छा. इथे देखील सुधीर फडक्यांचे अतिशय विशुद्ध, भावपूर्ण गायन, हेच वैशिष्ट्य आढळते. गायनात स्पष्टोच्चार असावेत पण त्याच जोडीने भावपूर्ण गायनाला कुठेही “ढळ” लागता कामा नये, अशी दुहेरी कसरत करायची. वरती ज्या प्रमाणे, मी माडगूळकरांचा मानदंडाबद्दल लिहिले, त्याच शब्दात सुधीर फडक्यांच्या गायनाबाबत लिहावे लागेल.
मघाशी मी म्हटल्याप्रमाणे, भैरवीत भजनी अंग देखील सुंदररीत्या रंग भरते आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे, ज्ञानेश्वरांची “अजि सोनियाचा दिनू” ही रचना. संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी ज्ञानेश्वरी स्वरबद्ध केली त्यात, ही रचना आहे. मुळात, ज्ञानेश्वरांची रचना म्हणजे प्रासादिक रचनेचा आदिनमुना!! अत्यंत लयबद्ध शब्दकळा, हे तर वैशिष्ट्य आहेच पण त्याला जोडून, आशयाची अभिवृत्ती आपला वाचिक अनुभव श्रीमंत करणारी. काहीवेळेस, रचना काहीशी गुढार्थात शिरते परंतु संपूर्ण रचना वाचायला घेतल्यावर आशयघनता संगीतकाराला आव्हान देणारी.
अजि सोनियाचा दिनु,
वर्षे अमृताचा घनु.
स्वररचना करताना, संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी फक्त “एकतारी” आणि “चिपळ्या” यांचाच वापर केला. त्यामुळे, रचनेतील ज्ञानेश्वरांची शब्दकळा आपल्याला, गाण्याच्या स्वरुपात ऐकताना देखील स्वच्छपणे समजून घेता येते. आता एकूणच शब्दकळा बघितली तर, आज ईश्वराचा साक्षात्कार शाल आहे आणि आता आयुष्यात आणखी काही बघायचे, अनुभवायचे राहिले नाही, या विरक्तीची जाणीव लखलखित दिसते आणि मग अशा आशयाला भैरवीचे सूर आत्ममग्न स्वरूप नेहमीच प्रदान करतात. गाण्याच्या पहिल्या सुरापासून, भैरवीची आळवणी सुरु आहे आणि ती संपूर्ण गाणे भारून टाकणारी आहे.
मराठी संगीत नाटक “संन्यस्त खड्ग” मध्ये अशीच एक असामान्य रचना, भैरवी रागाचे अनोखे रूप दाखवणारी आहे. नाटककार आणि कवी सावरकरांनी इथे दोन्ही भूमिका बजावलेल्या आहेत. नाटक सरळ, सरळ ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या विरोधात लिहिलेले आहे, त्यामुळे बरेचसे प्रचारकी झालेले आहे. असो, तो भाग वेगळा. नाट्यगीताच्या बाबतीत एक बाब अवश्यमेव घडत असते आणि ती म्हणजे, गायक कलाकाराच्या मगदुरानुसार संगीत रचनेत बदल घडू शकतात, क्वचित प्रसंगी चाल देखील बदलली जाते. “शत जन्म शोधिताना” ही मुळातली कविता, आधी मास्टर दीनानाथांनी प्रसिद्ध केली. नंतर मग वसंतराव देशपांड्यांनी त्यात आणखी वेगळे रंग भरले आणि ही रचना अधिक श्रीमंत केली. कविता म्हणून देखील ही रचना अतिशय समृद्ध आणि आशयाधिष्ठीत आहे. पहिल्या वाचनात आकळून घेणे, सगळ्यांना जमेलच असे नाही. सावरकर, कवी म्हणून आपली ओळख नव्याने आणि फार वरच्या दर्जाने करून देतात.
शत जन्म शोधिताना, शत आर्ती व्यर्थ झाल्या;
शत सूर्यमालिकांच्या, दीपावली विझाल्या.
संगीतरचना म्हणून देखील हे गाणे फारच सुंदर आहे. मध्य लयीत सुरु होते आणि बघत, बघत द्रुत लयीत शिरते. मास्टर दीनानाथ काय किंवा वसंतराव देशपांडे काय, गायनाचा आवाका प्रचंड आणि ऐकणाऱ्याला दिपवून टाकणारा, अस्वस्थ करणारा. भैरवी रागिणीचा विचार करता, या रचनेत भैरवी सरळ समोरून आपल्याला भेटत नाही. एकूणच सगळी रचना एकदम अंगावर येत असल्याने, आपल्याला शांतपणाने ऐकण्याची चैन घेता येत नाही आणि त्यामुळे भैरवी नेमकी कुठे आहे, याचा संभ्रम पडतो.अर्थात, जरा शांतपणे आस्वाद घेण्याचे ठरवले तर गाण्यातील भैरवीचे अंग समजून घेता येईल.
मुळातल्या रागदारी गायिका तरीही सुगम संगीतात देखील सहज विहार करणाऱ्या गायिका म्हणून किशोरी आमोणकरांचे नाव घ्यावेच लागेल. गळ्यावर “जयपुर” घराण्याचा ठसा तरी देखील रागदारी गायनात इतर घराण्यातील सौंदर्यस्थळांचा सहज आढळ!! एकूणच रागदारी गायन म्हणजे बुद्धीगम्य गायन, हा विचार ठामपणे मांडणारी गायिका. भैरवी रागातील काही अप्रतिम भजनांपैकी “अवघा रंग एक झाला” या भजनाचे स्थान अनन्यसाधारण आहे. अर्थात जरी भजन गायन असले तरी, गळ्यावरील रागदारी गायनाचा ठसा पुसणे अशक्य आणि हे तर सगळ्याच शास्त्रीय गायन करणाऱ्या कलाकारांबाबत म्हणता येते. सततच्या रागदारी गायनाच्या रियाजाने, कलाकाराचा गळा “जड” होतो आणि त्यामुळे स्वरांची फेक देखील त्याच अनुषंगाने होत असल्याने, सुगम संगीतात जो सहजपणा आवश्यक असतो तिथे बरेचवेळा हे कलाकार अपुरे पडतात.
अवघा रंग एक झाला,
रंगी रंगला श्रीरंग.
या रचनेत, भैरवी रागाचे सूचन पहिल्या झटक्यात आपल्या लक्षात येते रचना सरळ, सरळ भजनी अंगाने विस्तारलेली आहे. ” अवघा रंग एक झाला” या ओळीत, “झाला” या शब्दावर भैरवीचे “तोंड” दिसते. भजनी ठेका आहे. अर्थात, मघाशी मी म्हटल्याप्रमाणे, गाण्यातील हरकती, ताना इत्यादींवर रागदारी गायनाचा पगडा दिसतो. अर्थात, इथे आणखी वेगळा मुद्दा मांडता येतो. ज्या हिशेबात गझल गायन देखील “भावगीत” अंगाने तसेच “मैफिली” अंगाने, दोन्ही प्रकारे सादर करता येते तर मग भजन देखील त्याच वळणाने सादर होऊ नये?  अर्थात कलाकाराला सुरांची नेमकी जाण असल्याने, एकूणच सगळी रचना समृद्ध होते, हे निश्चित.
मराठी चित्रपट “एक  गाव,बारा भानगडी” – या चित्रपटात, सुमन कल्याणपूर यांनी अतिशय सुश्राव्य असे गाणे गायले आहे. “कशी गौळण राधा बावरली, बावरली”. संगीतकार राम कदमांची चाल आहे. संगीतकार राम कदम, यांच्या चालीवर मराठी लोकसंगीताचा नेहमीच प्रभाव जाणवतो. इथे तर चित्रपटातील नायिका तमाशामधील असल्याने, खास मराठी लोकसंगीताचा ठसा उमटणे साहजिक ठरते. कवियत्री शांताबाई शेळक्यांची शब्दरचना आहे. शांताबाई मुळातल्या भावगीत लेखिका, याचा परिणाम या गाण्यात देखील दिसून यतो. जसे वरती माडगूळकरांच्या रचनेबद्दल लिहिले आहे, तेच शब्द इथे शांताबाईंच्या कवितेबद्दल लिहिता येतील. सहज, सोप्या शब्दातील रचना परंतु आशयसंपन्न. त्यामुळे संगीतकाराला चाल बांधायला हुरूप देणारी.
कशी गौळण राधा बावरली, बावरली.
जलभरणा यमुना गेली, शीळ खुणेची अवचित आली;
रोमांचित काया थरथरली, कशी गौळण राधा बावरली.
सुमन कल्याणपूर यांच्या गायकीशी किंचित फटकून वागणारी ही रचना आहे पण, मुळात चालीत गायकी अंग असल्याने, गायनात तितकाच उठाव मिळतो. गाण्यात बारीक हरकती आहेत पण त्या हरकती सहजगतीने गळ्यावर चढणाऱ्या नाहीत. गाण्यातील “गौळण” शब्द या दृष्टीने ऐकावा. किंचित स्वरांत हेलकावा आहे पण सुरांचे जराही ओझे होत नसून, गाण्यातील सौंदर्य वाढवणारे आहे. भैरवी रागिणीचे हे देखील अनोखे तितकेच अप्रतिम विलोभनीय रूप.
— अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..