नवीन लेखन...

विक्लांत अहिर भैरव

रात्र सरत असताना, रात्रभर वाट बघून देखील, कामनापूर्तीचे समाधान लाभलेले नसताना, अत्यंत नाजूक मानसिक अवस्थेत, पहाट कधीतरी होईल, याची एका बाजूने मनोरम आशा मनात तरळते तर दुसऱ्या बाजूने पहाट झाली खरी परंतु मनातली आशा कितपत फलद्रूप होईल अशा निराशेने काळवंडलेले मन, अशा दुविधेत अडकलेले अस्वस्थ विचार!!खिडकीतून येणारा बोचरा वारा, अधिक खिन्न करीत असावा, आणि त्याचबरोबर आता कुठूनतरी प्रकाशाची तिरीप येईल आणि येताना आपल्या मनासारखे होईल, म्हणून डोळे लावून बसावे!!
आरतीप्रभूंच्या भाषेत लिहायचे झाल्यास,
“जराच फिरली किनखांबीची
     सुई जुईचा उसवीत शेला;
आणि ठणकला गतस्मृतींचा
     काळोखाने कापुरपेला. “
अहिर भैरव रागाच्या बाबतीत अशाप्रकारचे थोडे निराश असे चित्र डोळ्यासमोर  उभे राहते. “कोमल निषाद” आणि “कोमल रिषभ”यांच्या साहचर्याने कदाचित असला विषण्ण भाव मनात येत असेल. या रागात देखील सातही सूर लागतात. बरेचवेळा या रागात “तीव्र मध्यम” स्वराचा वापर करतात पण “शुध्द मध्यम”, काही वेळा इतर शुद्ध स्वरांबरोबर व्यवस्थित नांदतो. वादी स्वर – मध्यम तर संवादी स्वर – षडज आहे. “सा नि(को) ध नि(को) रे(को) रे(को) सा; ग म प ध म; ग म प ध नि(को)” हे स्वरसमूह या रागात वारंवार ऐकायला मिळतात.
याचा अनुषंगाने आता आपण किशोरी आमोणकरांची “मन तू गाओ म्हारा रसिया” ही बंदिश म्हणजे संपूर्ण “अहिर भैरव” असे म्हणता येईल. रागातील प्रत्येक सुराचा स्वभाव ओळखून आणि त्याचे सुराचे नेमके स्थान जाणून घेऊन, त्याप्रमाणे रागाची मांडणी करायची, ही या गायिकेची खासियत. मुळातली “जयपुर” घराण्याची गायिका परंतु पुढे आपल्या व्यासंगाने, ही ओळख जणू संपूर्ण पुसून टाकून, संपूर्ण वेगळ्या धर्तीची गायकी प्रस्थापित केली. किंबहुना, “किराणा”,”आग्रा” इत्यादी घराण्यातील गायकी नेमकी वेचून, आपल्या गायकीत समाविष्ट करून, आपल्या प्रातिभ अभ्यासाचा अप्रतिम नमुना पेश केला.
या रचनेत, नेहमीप्रमाणे अतिशय ठाय लयीत बंदिशीला प्रारंभ करून, प्रत्येक सुराला आपलेसे करून, अत्यंत हळुवारपणे सुरवात केली आहे. सुरवातीला मंद्र सप्तकात, त्याच लयीने हरकती घेतल्या आहेत. किंबहुना, सगळ्या रचनेत, शक्यतो तार स्वरांत जायचा कमीत कमी प्रयत्न करून, बढत देखील मंद्र आणि शुद्ध सप्तकात ठेवली आहे.
इतर कुठल्याही संगीतआविष्कारापेक्षा कलासंगीतात एकलाविष्कारास अधिक वाव असतो. मुख्य प्रयोगकर्ता आणि साथीदार असे विभाजनसुद्धा इतर आविष्कारांपेक्षा राग संगीतात फार स्पष्ट असते. कलासंगीतातील संप्रदाय, संज्ञापद्धती, विश्लेषणपद्धती, आणि सादरीकरणाच्या शैली वगैरे सर्वांवर सूक्ष्मविस्तृत असा कलासंवेदतेचा प्रभाव आढळतो. 
स्वर, लय, ताल वगैरे मुलभूत संगीतघटकांच्या आकृतीबंधाच्या निर्मितीवर आणि मांडणीवर कलासंगीताची सोपानपरंपरा उभारली जात असते. इतर कला आणि कलाप्रकारांशी हातमिळवणी करून संयोगी प्रकारांच्या निर्मितीतही कलासंगीत अग्रेसर राहते. तसेच इतर कलांपासून आपले निराळेपण सिद्ध करण्याचा आग्रहसुद्धा कलासंगीत धरते. याबाबतीत आणखी विवेचन करायचे झाल्यास, रागसंगीताच्या विकासाच्या एका टप्प्यापर्यंत आपल्याला संपूर्ण वाव मिळावा म्हणून कलासंगीत ठाम भूमिका घेते. त्यादृष्टीने विचार करता कलासंगीतास वैचारिक परंपरा आणि प्रयोगशीलता, याचा लाभ मिळत असतो. अर्थात, लिखिताची परंपरा बघता, त्याच्यासमोर प्रयोगपरंपरा दोन पावले पुढेच असते आणि हीच प्रयोगशीलता आपण किशोरी आमोणकरांच्या वरील सादरीकरणात अनुभवू शकतो.   
लेखाच्या सुरवातीला मला जे लिहावेसे वाटले, त्यामागे एका हिंदी गाण्याचा प्रभाव आहे. “मेरी सुरत तेरी आंखे” या चित्रपटात, मन्ना डे यांनी गायलेले, “पुछो ना कैसे मैने रैन बितायी” हे गाणे ऐकले आणि बघितले, तेंव्हापासून माझ्या मनावर या गाण्याचा थोडा प्रभाव आहे. या गाण्यात, आपल्याला, सुरवातीपासून “अहिर भैरव” ऐकायला मिळतो आणि अशा असामान्य गायकीतून आपण या रागाचा आनंद घेऊ शकतो. हिंदी गाण्यात प्रसिद्ध असलेल्या, केरवा तालात हे गाणे बांधले आहे.
“पुछो ना कैसे मैने रैन बिताई,
एक पल जैसे, एक जुग बिता;
जुग बीते मोहे नींद ना आई.”
सारंगीच्या अतिशय करुण सुरांनीच आपल्याला या रागाची ओळख करून दिली जाते. गाण्यातील कवितेचे शब्द देखील त्या भावनेचेच प्रत्यंतर देतात. “पुछो ना कैसे मैने रैन बितायी, एक पल जैसे एक युग बिता, युग बीते मोहे निंद ना आयी”. गायकी ढंगाची चाल आहे आणि लय देखील किती अवघड आहे. जरा सरळ म्हणून लय जात नाही, इतके कंगोरे आहेत आणि तेच या गाण्याचे खरे सौंदर्य आहे. जवळपास ३ मिनिटांचे गाणे आहे पण ऐकताना एखादी “ललित” बंदिश ऐकावी, असा भास होतो. संपूर्ण गाणे अतिशय व्याकूळ सुरांत बांधले आहे पण कुठेही “फोफशे” किंवा “ढिसाळ” नसल्याने, एक असामान्य रचना ऐकल्याचे समाधान मिळते.
आता आपण एक अप्रतिम गझल ऐकायला घेऊ. मेहदी हसन, हे नाव गझल क्षेत्रात फार नावाजलेले नाव. इथे त्यांनी गायलेली – “हमे कोई गम नही था” ही, अहिर भैरव रागाच्या सावलीत गायलेली रचना आहे. खरतर, गझल गायन किंवा सुगम संगीत रचनेत, नेमका राग शोधू नये. याची काही प्रमुख कारणे म्हणजे, इथे शब्दांना न्याय देणे, हे प्राथमिक काम. नंतर मग गायकी अवतरते. इथे रागाला तसे अजिबात महत्व नसते, त्यामुळे रागाने घालून दिलेली बंधने, इथे पाळलीच पाहिजेत अशी गरज नसते. ही रचना, दादरा तालात बांधली आहे. मुलायम गायकी, शक्यतो मंद्र सप्तकात गायन, शब्दानुरूप चालीला वळण देण्याची कोशिश, हाती घेतलेल्या रागाचे “वळण” शक्यतो बिघडणार नाही, याची काळजी घेण्याची प्रवृत्ती, इत्यादी बाबी, मेहदी हसन यांच्या गायकीची वैशिष्ट्ये सांगता येतील.
“हमे कोई गम नहीं था गम-ए-आशिकी के पहले,
न थी दुष्मनी किसी से, तेरी दोस्ती के पहले.”
ही रचना मोठी विलक्षण आहे. चालीचा एकुणात अदमास घेतला तर भावगीताच्या अंगाने रचना जाते, अर्थात वृत्त बघितले तर गझल आहे, हे समजते. परंतु गझलमध्ये, प्रत्येक कडवे म्हणजे स्वतंत्र, सार्वभौम कविता असते आणि तसा प्रकार या कवितेत दिसत नाही, पहिल्या दोन ओळीत, रचनेची “जमीन” स्पष्ट होते पण, पुढील ओळीत, त्याच कल्पनेचा विस्तार वाचायला मिळतो. याचा वेगळा अर्थ, ही रचना, “नज्म” म्हणून स्वीकारता येते. तसेच इतर ठिकाणी, मेहदी हसन, अगदी आळवून, हरकती घेऊन, रचनेचे सौंदर्य वाढवतात परंतु इथे मात्र तसे फारसे घडत नाही आणि म्हणूनच, मघाशी मी, “भावगीत” या शब्दाचा उच्चार केला. असे असून देखील, आपल्याला गायकाच्या गायकीची पूर्ण कल्पना आणि आनंद घेता येतो.
अशाच गायकी धाटणीची रचना, आपल्याला “विजेता” चित्रपटात, आशा भोसले आणि सत्यशील देशपांडे यांच्या आवाजात “मन आनंद आनंद छायो” हे गाणे ऐकायला मिळते. अहिर भैरव रागावरील, ही अशीच लक्षणीय रचना. वास्तविक सत्यशील देशपांडे हे काही, रूढार्थाने सुगम संगीताचे गायक नव्हेत परंतु रचनेची बांधणी अशा प्रकारे केली आहे की तिथे शास्त्रीय संगीत गाणारा गायक आवश्यक आहे. तसे बघितले तर हिंदी चित्रपटात, शास्त्रीय संगीत गायकाने गाण्याची फार मोठी परंपरा आहे आणि बहुतेक प्रथितयश गायकांनी, चित्रपट गीते गायलेली आढळतात. इथे खरतर संगीतकाराची खरी परीक्षा असते. गायक प्रशिक्षित असल्याने, हरकती, मुरकती,ताना यांचे सादरीकरण, ठराविक “मुशीतून” होत असते आणि ते सुगम संगीतात खपणारे नसते, तेंव्हा अशा वेळी, त्यांच्याकडून त्याच्या गळ्याचा “साचा” मोडून काहीशा हलक्या स्वरूपाच्या हरकती काढून घेणे, हेच कौशल्याचे असते. संगीतकार अजित वर्मन यांनी फारच हुशारीने ही रचना बांधली आहे.
“मन आनंद आनंद छायो.
मिट्यो गगन घन अंधकार
अन्खीयन मे जब सुरज आयो,
मन आनंद आनंद छायो.”
या गाण्याच्या पूर्वार्धात, कुठेही ताल वापरला नसून, केवळ तंबोऱ्याच्या सुरांचा आधार आहे आणि त्यामुळे, इथे आशा भोसले यांच्या आवाजाची खरी खुमारी ऐकता येते. चित्रपट गाण्यात जरी रागाचा वापर असला तरी, गायन करताना आपण, राग नसून चित्रपट गीत गात आहोत, याचे नेमके भान दिसते. गाण्याच्या मध्यावर, सत्यशील देशपांडे यांचे गायन सुरु होते आणि गाण्यात थोडी सरगम येते पण तरीही त्याचा वेचक वापर आहे आणि ती सरगम, गाण्याची खुमारी(च) वाढवते. अखेर गाण्याच्या शेवटी, परत केवळ तंबोऱ्याचे सूर आणि तबला, इतक्या(च) साथीने शेवट केला आहे आणि तो देखील किती अप्रतिमरीत्या केला आहे. हे गाणे म्हणजे रसिकांच्या कानांना मेजवानी आहे.
” हम दिल दे चुके सनम” या चित्रपटात, “अलबेला साजन आयो रे” हे गाणे “अहिर भैरव” रागाची समर्थ ओळख करून देते.  या ओळींची “बंदिश” या रागात पारंपारिक पद्धतीने प्रचलित आहे आणि गाण्याच्या चालीचा ढाचा तोच ठेऊन, संगीतकार इस्माईल दरबार यांनी हे गाणे तयार केले आहे. गाण्याला आधुनिक वाद्यमेळाने सजवून अधिक सुरेख केले आहे. “बंदिशी” मधील गायकी भाग टाळून, गाणे कसे रंगतदार करता येते, याचे सुंदर उदाहरण.
“अलबेला सजन आयो रे
मोरा हटवार सुकर आयो रे;
अलबेला साजन आयो रे”.
हे गाणे शंकर/कविता आणि उस्ताद सुलतान खान यांनी मिळून गायले आहे. रचनेत अर्थातच बंदिशी स्वरूपाच्या काही ताना/हरकती आहेत पण एकूण “ठेवण” ललित अंगाने ठेवली असल्या कारणाने आणि चालीची लय द्रुत अंगाने ठेवल्याने, गाणे मनाची पक्कड लगेच घेते.
— अनिल गोविलकर 

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..