राज कपूर (१९८८), तात्यासाहेब (१९९९) या दोघांबद्दल सलग दोन दिवस लिहिले, आज विक्रम गोखले यांच्याबद्दल मृत्युलेख !
सुप्रसिद्ध लेखक रवींद्र पिंगे यांची खासियत मृत्युलेखांबद्दल होती. अतिशय समयोचित, हृद्य आणि बिलगणारे लेखन ते करीत. प्रत्यक्ष भेटीत मी इस्लामपूरला त्यांना विचारलेही होते- लहान तोंडी मोठा घास घेत !
ते दीर्घ श्वास घेऊन म्हणाले होते- ” देशपांडे, सुहृदांच्या जाण्याने पडणारे खड्डे बुजवत असतो मी ! तुम्हां वाचकांना ते भिडतं कारण ते खरंखुरं लेखन (प्रत्यक्षात माझा हुंदका) असतं.”
१९८० साली दळवींच्या विजयाबाई मेहतांनी दिग्दर्शित केलेल्या “महासागर ” चा प्रयोग सांगलीच्या “जनता नाट्यगृहात” होता. विक्रम गोखले, नाना पाटेकर, उषा नाडकर्णी, भारती आचरेकर, नीना कुलकर्णी असा दमदार संच असल्याने मी आणि माझा वालचंदी मित्र जयंत असनारे ते चुकविणे शक्य नव्हते.
मध्यंतरात प्रघातानुसार सेट बघणे आणि कलावंतांच्या सह्या घेण्यासाठी आम्ही गेलो. राजबिंड्या विक्रम गोखलेंची ती जवळून पहिली भेट !
ते म्हणाले- ” मी ऑटोग्राफ देईन, पण माझी एक अट आहे. मी कोकणात माझ्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक शाळा बांधतोय. सध्या भिक्षांदेही सुरु आहे. तुम्हीं काहीतरी देणगी द्या, मी सही देतो.”
त्याकाळात आर्थिक दृष्ट्या शक्य असलेली प्रत्येकी एक रुपयांची देणगी आम्ही त्यांच्या हाती ठेवली. गृहस्थाने पटकन पावती लिहून आमच्या हाती दिली आणि मग लफ्फेदार सही चितारली.(त्यांचे पिताश्री चंद्रकांत गोखले गाजावाजा न करता दरवर्षी सीमेवरच्या जवानांसाठी निधी पाठवीत ही नंतर पदरी आलेली माहिती)
मी के एस बी पंप्स मध्ये काम करीत असताना विक्रम गोखलेंची बहीण आमच्याकडे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करीत होती. हे आम्हांला माहीत असण्याचं काही कारण नव्हतं- तिचं सासरचं आडनांव “रावणशेड “असल्याने !
एके दिवशी सिक्युरिटी प्रमुख शेख माझ्याकडे आले अभ्यागतांचे रजिस्टर घेऊन ! त्यांत नोंद होती- ” चंद्रकांत गोखले आणि विक्रम गोखले”. मी दचकलो.
शेख म्हणाले “ते अधून मधून येतात आपल्या कंपनीत, मॅडम ना भेटायला.”
मी शेख ना बजावले- “पुन्हा कधी ते आले तर मला आधी कळवा.”
त्या दिवशी कंपनीत भेट हुकली आणि तो योग पुन्हा नाही जुळून आला.
गेले तीन दिवस त्यांच्याबद्दल हुलकावणाऱ्या देणाऱ्या बातम्या येत होत्या आणि प्रत्येक व्हाट्सअप ग्रुपवर मी “फेक न्यूज ” म्हणत मी त्या नाकारत होतो. काल मात्र दुपारी ते वृत्त आले आणि शहानिशा करून मीच सगळ्या ग्रुप्सवर ती बातमी दिली.
त्यानंतर “सहयाद्री ” वाहिनी वर नीना कुळकर्णीशी गप्पा मारणारे विक्रम गोखले मी आणि पत्नी बघत बसलो- सदेह,मिश्किल, रुबाबदार !
शक्य असूनही ना बालगंधर्वला गेलो अंत्यदर्शनासाठी की वैकुंठात अंत्ययात्रेसाठी !
कारणे दोन-
एकतर ” बाळा गाऊ “, ” बॅरिस्टर” चे देखणे रूप कायमचे डोळ्यांना आठवावे म्हणून! मराठीतील नाट्य-चित्र सृष्टीतील सुंदर पुरुषांची माझी यादी म्हणजे लागू, गोखले आणि प्रशांत दामले तथा सुबोध भावे ! द एंड ! या यादीतील पहिले दोघे आता नाहीत.
दुसरे कारण म्हणजे नुकतेच १३ नोव्हेंबरला ” गोदावरी ” मध्ये विक्रमजींच्या अंत्यविधीचे अगदी रक्षा सावडेपर्यंतचे यथासांग चित्रीकरण बघितले होते.
काल त्यापेक्षा काय वेगळे दिसणार होते ?
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply