भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार विक्रम साराभाई यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ रोजी झाला.
विक्रम साराभाई यांचे वडील हे एक उद्योगपती होते. शिवाय ब-याच राजकीय व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने त्या लोकांचे (रविंद्रनाथ टैगोर, जवाहरलाल नेहरू, सरोजनी नायडू , महात्मा गांधी) त्यांच्या घरी जाणे-येणे होते. त्यामुळे खरंतर विक्रम साराभाईंना उद्योग क्षेत्रात अथवा राजकारणात जम बसवण्यासाठी पोषक वातावरण होते. पण त्यांच्या नशिबात काही वेगळेच लिहले होते आणी ते संपूर्ण भारत देशाचे नशीब बदलणारे असे काहीतरी होते. त्यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वत:ची माँटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच यूरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे विक्रम साराभाईंचे शिक्षण झाले. त्यांना लहानपणापासूनच गणित आणि भौतिक शास्त्र हे विषय विशेष आवडीचे होते. आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते कैंब्रिज विश्वविद्यालय येथे शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोर मधील ‘इंडियन इंस्टीट्यूट आफ साइंस’ मध्ये नोबेल पुरस्कार विजेते सर सी.वि.रमण यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कोस्मिक किरणा’वर संशोधन केले. १९४२ साली त्यांनी भरतनाटयम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मा.मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणी मल्लिका ही दोन अपत्ये झाली.
१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर ते ब्रिटनमध्ये परत गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून पी.एच.डी. पदवी मिळवली. आणि त्याच वर्षी मायदेशी परत आले. ११ नोव्हेंबर १९४७ ला अहमदाबादला Physical Research Laboratory ची स्थापना केली हे त्यांचे पहिले पाउल. पुढे जाऊन अवकाश संशोधनात त्यांनी जे कार्य केले त्याबद्दल काही सांगायला नकोच. केरळजवळील थुंबा हे ठिकाण लॉन्च पेड़साठी निश्चित झाले होते कारण हे ठिकाण मैग्नेटिक इक्वेटर लाइन (चुंबकीय भूमध्य रेखा) च्या अगदी जवळ होते. पण त्या ठिकाणी शंभरेक घरे आणि एक चर्च होते. आणि ते लोक तिथून बाजुला हटण्यास तयार नव्हते. त्या जागेच्या भौगोलिक आणि वैज्ञानिक महत्वामुळे त्या जागेसाठी केरळ सरकारची मदत मागितली गेली पण केरळ सरकारही ती जमीन मिळवण्यात अपयशी ठरले. मग एके दिवशी स्वत: विक्रम साराभाई त्या चर्चच्या फादर कड़े गेले आणि त्यांना सगळे पटवून दिले. आणि काय चमत्कार दुस-याच दिवशी फादर आणि तिकडचे लोक तिथून बाजूला होण्यास तयार झाले. पुढे तिथे ‘थुंबा रॉकेट लौन्चिंग स्टेशन’ ची स्थापना केली गेली.
२१ नोव्हेंबर १९६५ ला तिथून पहिल्या रॉकेटचे प्रक्षेपण केले गेले. पुढे या केंद्राला संयुक्त राष्ट्रने अंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून मान्यता दिली. हा चमत्कार घडवणारे ते विक्रम साराभाईच. म्हणूनच की काय पुढे या केंद्राला विक्रम साराभाई स्पेस सेंटर असे नाव दिले गेले. इंग्लंडच्या प्रयोगशाळेत संशोधन करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांना भारताच्या मोहिमेत सहकार्य करण्याचं आवाहन करून डॉ. विक्रम साराभाई यांनी भारतात आणलं होतं. ”ब्रिटनप्रमाणे वातानुकुलित लॅब्ज आणि ऑफिससारख्या सोयी आम्ही देऊ शकणार नाही, पण बसायला एक टेबल, खुर्ची आणि एक कपाट नक्कीच देऊ शकतो”, असं म्हणून डॉ. साराभाईंनी देशापुढील आव्हानही स्पष्ट केलं होतं. कारण त्यावेळी संशोधनासाठी विशेष बजेट वैगेरे नव्हते. डॉ. विक्रम साराभाई यांनी शास्त्रज्ञांना स्वप्न दाखवलं, नवी दिशा दिली. खंबीर नेतृत्व हाही त्यांचा एक व्यक्तिविशेष. डॉ. अब्दुल कलाम यांनीही आपल्या अग्निपंख या आत्मचरित्रात साराभाई यांच्या नेतृत्व गुणाचे कौतुक केले आहे. ते स्वप्न पाहायचे आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हवी ती मेहनतही घ्यायचे. त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य त्यांच्या सहका-यांसाठी नेहमीच एक प्रेरणा स्रोत ठरले आहे.
त्यांनी त्यांच्या सहका-यांना एक वेगळी दृष्टी दिली. अंतराळ संशोधनात बजावलेल्या मोलाच्या कामगिरीसाठी इंटरनॅशनल अस्ट्रोनॉमिकल युनियनतर्फे भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार ठरलेल्या अश्या डॉ. विक्रम साराभाई यांचे नाव चंद्रावरील मोठ्या विवरांना देण्यात आल आहे. (भारताच्या अणुऊर्जा तंत्रज्ञानातील जनक डॉ. होमी भाभा आणि नोबेल पारितोषिक विजेते सी. व्ही. रामन यांचीही नावे चंद्रावरील विवरांना दिली गेली आहेत.) डॉ. विक्रम साराभाई यांच्या अथक परिश्रमानंतरच १९६९ साली भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्त्रो) स्थापना झाली. आईआईएम अहमदाबादच्या स्थापनेतही डॉ. विक्रम साराभाई यांची मुख्य भूमिका होती. होमी भाभा यांच्या मृत्यु नंतर ते १९६६ मध्ये परमाणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष झाले. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची अध्यक्षपदे त्यांच्याकडे होती. अवकाश संशोधनाबरोबरच त्यांनी टेक्स्टटाईल, फार्मासिटिकल, अणुऊर्जा, कला या क्षेत्रातही विशेष कामगिरी केली आहे. त्यांनी स्थापन केलेल्या ATIRA (Ahmedabad Textile Industry’s Research Association) ने आधुनिक वस्त्रोद्योगाचा पाया रचला. फार्मासिटिकल उद्योगात सर्वप्रथम इलेक्ट्रोनिक डाटा प्रोसेसिंग आणि रिसर्च टेक्निकचा वापर त्यांनीच केला. Electronics Corporation of India Limited (ECIL),Uranium Corporation of India Limited (UCIL) अशा अनेक संस्थांची स्थापना त्यांनी केली.
१९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला, त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली गेली होती. आर्यभट्टच्या सफल संक्षेपणानंतर अनेक उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केले गेले. ज्यासाठी श्री.साराभाई यांची नेहमीच आठवण केली जाते. कारण या सगळ्या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टि आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे. डॉ.विक्रम साराभाई यांना सन १९६६ साली भारत सरकारचा पद्मभूषण आणि १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण हा पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात आला. विक्रम साराभाई यांचे ३० डिसेंबर १९७१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट