मी एक तमिळ मुव्ही पाहिली .
अर्थात हिंदी भाषेत डब केलेली .
विक्रम-वेधा हे नाव त्या मुव्हीचे .
२०१७ साली प्रदर्शित झालेल्या या प्रादेशिक भाषेतील मुव्हीने ६० करोडचा व्यवसाय केला म्हणतात .
आर . माधवन आणि विजय सेथुपथी या दोन अभिनेत्यांचा अभिनय , अंडरवर्ल्ड चे विदारक आणि वास्तवपूर्ण चित्रण , पोलिसदलातील अंतर्गत राजकारण , अंडरवर्ल्ड मधील जीवघेणं राजकारण यासाठी ही मुव्ही पाहायलाच हवी .
कुणीतरी म्हणेल मग की हे सारे हिंदी , इंग्रजी मुव्हीत असते . मग यात वेगळेपण काय ?
तर यात तथाकथित लव्हस्टोरी नाही , नग्नतेचे अतिरेक करणारे आणि उबग आणणारे चित्रण नाही , ओढून ताणून आणलेला विनोद नाही , बटबटीतपणा नाही , राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपाचे चित्रण नाही , प्रचंड क्रौर्य नाही , अविश्वसनीय ,अकल्पित चित्रण नाही , पार्श्वसंगीताचा बेसुमार ,अवाजवी भडिमार नाही , बलात्कार नाही , अत्याचार नाही , मानवी भावनांचे बटबटीत प्रदर्शन नाही , मेकअप चा अतिरेक नाही . आणि अर्थहीन गाणीसुद्धा नाहीत .
तरीही हा चित्रपट भावतो .
मग हा चित्रपट का म्हणून पहावा ?
असा कुणालाही प्रश्न पडेल .
त्यासाठी जरा ष्टोरी सांगायला हवी .
तुम्हाला चांदोबातील विक्रम वेताळाच्या कथा आठवतात ?
विक्रमादित्याच्या मानेवर बसलेल्या वेताळाच्या प्रश्नांना उत्तरे देताना आणि त्यासाठी कथा सांगताना आपण विक्रमादित्य राजाला वाचलेले आहे .
अगदी बरोबर !
इथेही चित्रपटाची सुरुवात विक्रमादित्य आणि वेताळाच्या कथेने होते आणि आपण नकळत त्या पौराणिक कथेतून वर्तमानातल्या एन्काऊंटर करण्यात माहीर असणाऱ्या आर माधवन (विक्रम) आणि अंडरवर्ल्ड मधील विजय सेथुपथी ( वेधा ) यांच्या कथेत केव्हा शिरतो ते कळत नाही .
दोघांची भिन्न व्यक्तिमत्वे , हुशारी , एकमेकांवर करण्यात येणाऱ्या कुरघोडी , वेधा चा गोष्टी सांगण्याचा स्वभाव आणि त्या गोष्टीतून विक्रमला मिळणारी खबर अशा अनेक गोष्टीत आपण रमतो .
त्या दोघांच्या आयुष्यातील चढउतार , त्यांचे नातलग , त्याविषयीच्या भावना , पुढे काय होणार याची लागणारी प्रचंड उत्कंठा , विक्रम वेताळ कथेचे येणारे संदर्भ , प्रत्येक प्रसंगातून कळणारे सहजसुगम तत्वज्ञान , प्रत्येक फ्रेमचे आर्टवर्क , पोलिसदलातील भ्रष्टाचार अशा अनेक गोष्टीवर हा चित्रपट भाष्य करीत जातो .
वेधा चा एन्काऊंटर करायचा असूनही दरवेळी विक्रमला ते का जमत नाही याचेही गूढ वाटत राहते आणि ते चित्रपटाच्या शेवटी उलगडते .
चित्रपटाचा शेवट मी सांगणार नाही , कारण दिग्दर्शकाने शेवट काय असावा हे आपल्यावर सोडले आहे . पण इतकेच सांगेन की विक्रमादित्य आणि वेताळ यांची कथा आठवा .
मला हा चित्रपट बेहद्द आवडला .
तो बघा आणि मग मला सांगा की त्यात काय , किती आणि कसे वेगळेपण भरले आहे .
तो युट्युबवर उपलब्ध आहे .
— डॉ. श्रीकृष्ण जोशी,
रत्नागिरी
Leave a Reply